वाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

लोकपाळ रांगेचे । राउत जिये पदवीचे । उचैं:श्रवा खांचे । खोळणिये ॥
ज्यांच्या सभोवती लोकपालांसारखे राजे चालत असून जय मिळविलेले पदवीधर सरदार आहेत व उच्चैःश्रवा नामक खासगी कोतवाल घोडा आहे.
हें असो बहु ऐसे । भोग इंद्रसुखासरिसे । ते भोगिजती जंव असे । पुण्यलेशु ॥
हे असो, याप्रमाणे जोपर्यंत पुण्याचा अंश आहे, तोपर्यंत ते इंद्राच्या सुखासारखे पुष्कळ भोग भोगतात.
मग तया पुण्याची पाउटी सरे । सवेंचि इंद्रपणाची उटी उतरे । आणि येऊं लागती माघारे । मृत्युलोका ॥
मग त्यांच्या पुण्याची पुंजी संपताक्षणीच इंद्रपणाच्या ऐश्वर्यावरून उतरून पुन्हा ते मृत्युलोकी येतात.
जैसा वेश्याभोगीं कवडा वेंचे । मग दारही चेपूं न ये तियेचें । तैसें लाजीरवाणें दीक्षितांचें । काय सांगों ! ॥
ज्याप्रमाणे वेश्येच्या पायी एखाद्याने आपले सर्व द्रव्य खर्च केल्यानंतर त्याला तिच्या दाराला बोट देखील लावण्याची सत्ता नसते, त्याप्रमाणे या यज्ञकर्त्याची स्थिती फार लाजीरवाणी होते. ती तुला काय सांगू!
एवं थितिया मातें चुकले । जींहीं पुण्यें स्वर्ग कामिलें । तयां अमरपण तें वावों जालें । अंतीं मृत्युलोकु ॥
याप्रमाणे ज्या वेळेस जपावयाचे, त्या वेळेस मला चुकून ज्यांनी पुण्यमार्गाच्या आचरणाने स्वर्गप्राप्ती करून घेतली, त्यांचे अमरत्व वाया जाऊन शेवटी ते मृत्युलोकात परत येतात.
मातेचिया उदरकुहरीं । पचूनि विष्ठेच्या दाथरीं । उकडूनि नवमासवरी । जन्मजन्मोनि मरती ॥
नंतर मातेच्या उदररूप गुहेत विष्ठेच्या थरात नऊ महिनेपर्यंत उकडून पक्वदशेत येतात आणि पुन्हा पुन्हा जन्माला येऊन मरण पावतात.
अगा स्वप्नीं निधान फावे । परि चेइलिया हारपे आघवें । तैसें स्वर्गसुख जाणावें । वेदज्ञाचें ॥
अरे स्वप्नांत प्राप्त झालेला ठेवा जसा जागृत झाल्यावर नाहीसा होतो, त्याप्रमाणे यज्ञकर्त्याचे सुख आहे, असे समज.

First Published on: March 28, 2024 6:30 AM
Exit mobile version