वाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

अर्जुना तुझें चित्त । जर्‍ही जाहलें द्रवीभूत । तर्‍ही हें अनुचित । संग्रामसमयीं ॥
अर्जुना तुझ्या मनात जरी दया उत्पन्न झाली आहे, तरी ती या युद्धप्रसंगी अयोग्य आहे.
अगा गोक्षीर जरी जाहलें । तरी पथ्यासि नाहीं म्हणितलें । ऐसेनिहि विष होय सुदलें । नवज्वरीं देतां ॥
अरे असे पहा की, गाईचे दूध उत्तम असले तरी ते नवज्वराच्या मनुष्याला दिले तर विषवत होते;
तैसें आनींआन करितां । नाशु होईल हिता । म्हणौनि तूं आतां । सावध होईं ॥
त्याचप्रमाणे, भलत्याने भलतेच म्हणजे ब्राह्मणाने क्षत्रियादिकांच्या कर्माचे किंवा क्षत्रियादिकांनी ब्राह्मणादिकांच्या कर्माचे आचरण केले तर त्याच्या हिताचा नाश होतो; म्हणून तू आता सावध हो.
वायांचि व्याकुळ कायी । आपुला निजधर्मु पाहीं । जो आचरितां बाधु नाहीं । कवणें काळीं ॥
उगाचच दुःखी होऊ नको; आणि ज्याचे आचरण केले असता कोणतेही काळीं दोष घडत नाही त्या आपल्या क्षत्रियधर्माकडे लक्ष दे.
जैसें मार्गेंचि चालतां । अपावो न पवे सर्वथा । कां दीपाधारें वर्ततां । नाडळिजे ॥
ज्याप्रमाणे सन्मार्गाने चालले म्हणजे कधीही हानी होत नाही किंवा दिव्याच्या उजेडात चालले असता आडखळत नाही,
तयापरी पार्था । स्वधर्में राहाटतां । सकळ कामपूर्णता । सहजें होय ॥
त्याप्रमाणे अर्जुना, जो स्वधर्माने वागतो त्याच्या सर्व इच्छा सहज पूर्ण होतात.
म्हणौनि यालागीं पाहीं । तुम्हां क्षत्रियां आणीक कांहीं । संग्रामावांचूनि नाहीं । उचित जाणें ॥
यासाठी तू असे समज की, तुम्हां क्षत्रियांना संग्रामावाचून दुसरे काही योग्य नाही.
निष्कपटा होआवें । उसिणा घाईं जुंझावें । हें असो काय सांगावें । प्रत्यक्षावरी ॥
मनात कपट न धरता समोरासमोर उभे राहून एकमेकांवर प्रहार करून युद्ध करावे हे प्रत्यक्ष तुला माहीत आहेच; आणखी आम्ही काय सांगावे?

First Published on: March 17, 2023 4:00 AM
Exit mobile version