वाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

तैसें भलतेथ भलतेणें भावें । भलतेंही हो अथवा नोहावें । परि तें मी ऐसें आघवें । होऊनि ठेले ॥
त्याचप्रमाणे, पाहिजे तेथे पाहिजे त्या भावनेने पाहिजेल ते होवो अथवा न होवो, परंतु ते सर्व ‘मीच आहे’ अशी ज्यांचे मनाची वृत्ती होऊन गेली आहे.
अगा हे जेव्हडी माझी व्याप्ती । तेव्हडीचि तयांची प्रतीती । ऐसे बहुधाकारी वर्तती । बहुचि होउनी ॥
अर्जुना माझ्या स्वरूपाची जितकी व्यापकता आहे, तेवढाच त्यांचा बोध आहे; म्हणून अनेकप्रकाराने जग दिसले तरी त्या अनेक रूपात मीच आहे, असा ते व्यवहार करतात.
हें भानुबिंब आवडे तया । सन्मुख जैसें धनंजया । तैसे ते विश्वा या । समोर सदा ॥
ज्याप्रमाणे सूर्यबिंब सर्वांना आपल्यासमोर सारखेच दिसते, त्याप्रमाणे ते सर्व विश्वाला बोधाने व्यापक असल्यामुळे सन्मुखच असतात.
अगा तयांचिया ज्ञाना । पाठी पोट नाहीं अर्जुना । वायु जैसा गगना । सर्वांगीं असे ॥
अर्जुना, त्यांच्या ज्ञानाला आतबाहेर असा भेद नाही, ज्याप्रमाणे वायू हा आकाशात सर्वत्र भरलेला आहे.
तैसा मी जेतुला आघवा । तेंचि तुक तयांचिया सद्भावा । तरी न करितां पांडवा । भजन जहालें ॥
त्याप्रमाणे मी जेवढा संपूर्ण आहे, तेवढाच त्यांचा अस्तित्वभाव आहे. म्हणजे दोघांचे माप सारखे आहे, असा ज्याचा बोध आहे, त्याने भजन जरी न केले तरी ते सहजच घडते.
एर्‍हवीं तरी सकळ मीचि आहें । तरी कवणीं कें उपासिला नोहें? । एथ एके जाणणे नवीण ठाये । अप्राप्तासी ॥
एर्‍हवी तरी मी सर्वत्र भरलेला आहे. माझी कोण उपासना करीत नाहीत? सर्वांची सर्व ठिकाणी सहजच उपासना चालली आहे, असे असूनही ज्यांना मी अप्राप्त आहे, त्यांची उपासना माझे यतार्थ ज्ञान नाही म्हणून थांबल्यासारखी झाली आहे.

First Published on: March 15, 2024 4:30 AM
Exit mobile version