वाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

म्हणौनि आपलीं आपणपेया| जरी इंद्रियें येती आया| तरी अधिक कांहीं धनंजया| सार्थक असे?||
म्हणून धनंजया, आपली इंद्रिये स्वाधीन झाली म्हणजे मग ह्यापेक्षा अधिक सार्थक ते काय आहे?

देखैं कूर्म जियापरी उवाइला अवेव पसरी। ना तरी इच्छावशें आवरी। आपणपेंचि||
पाहा की- ज्याप्रमाणे कासव आपले पसरलेले अवयव स्वेच्छेने स्वतःच आवरतो,

तैसीं इंद्रिये आपैतीं होती। जयाचें म्हणितलें करिती| तयाची प्रज्ञा जाण स्थिती| पावली असे||
त्याप्रमाणे ज्यांची इंद्रिये स्वाधीन असून तो म्हणेल त्याप्रमाणे वागतात, त्यांचीच बुद्धी स्थिर झाली आहे असे समज.

आतां आणिक एक गहन| पूर्णाचें चिन्ह। अर्जुना तुज सांगेन| परिसपां||
अर्जुना, आता ज्ञान्यास ओळखण्याची आपली एक सूक्ष्म खूण तुला सांगतो, ती ऐक.
देखैं भूतजात निदेले। तेथेंचि जया पाहलें। आणि जीव जेथ चेइले | तेथ निद्रितु जो||
सर्व प्राण्यांत अज्ञात असलेल्या आत्मस्वरूपाविषयी ज्याला पूर्ण ज्ञान आहे आणि ज्या व्यावहारिक विषयाच्या प्राप्तीविषयी प्राणीमात्र जागे आहेत, त्या विषय सुखाचे ठिकाणी जो निजलेला आहे.

तोचि तो निरुपाधि। अर्जुना तो स्थिरबुद्धि। तोचि जाणें निरवधि | मुनीश्वर||
तोच अर्जुना, उपाधिरहित, स्थिरबुद्धि, गंभीर आणि मुनीमध्ये म्हणजे मनन करणार्‍यांमध्ये श्रेष्ठ आहे असे समज.

पार्था आणीकही परी। तो जाणों येईल अवधारीं। जैसी अक्षोभता सागरीं। अखंडित||
पार्था, आणखी एका प्रकाराने तो स्थितप्रज्ञ मनुष्य ओळखता येतो, तो प्रकार कोणता, तो ऐक. सागर जसा निरंतर शांत असतो तसा स्थितप्रज्ञ असतो.

जर्‍ही सरितावोघ समस्त| परिपूर्ण होऊनि मिळत। तरी अधिक नोहे ईषत्। मर्यादा न संडी||
जरी पावसाळ्यात नद्याचे प्रवाह तुडूंब भरून सागरास मिळतात, तरी तो किंचितहि वाढत नाही व आपली मर्यादा ओलांडत नाही.

First Published on: April 13, 2023 4:15 AM
Exit mobile version