वाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

 

तूं जरी हें ऐसें मानिसी । तरी खेदु कां करिसी? । काय जाणतुचि नेणसी । धनुर्धरा ॥
अर्जुना, तू जरी आत्म्याला अंतवत मानीत असलास तरी खेद का करतोस? आणि समजून उमजून वेडात का शिरतोस?
एथ आणीकही एक पार्था । तुज बहुतीं परीं पहातां । दु:ख करावया सर्वथा । विषो नाहीं ॥
पार्था एक गोष्ट तुला सांगतो, पुष्कळ प्रकाराने जरी विचार केला तरी तुला दुःख करायचे काहीच कारण दिसत नाही.
जिये समस्तें इयें भूतें । जन्माआदि अमूर्तें । मग पातलीं व्यक्तीतें । जन्मलेया ॥
हे सर्व प्राणी उत्पत्तीपूर्वी आकाररहित असतात. जन्म धारण केल्यावर आकाराला येतात.
तियें क्षयासि जेथ जाती । तेथ निभ्रांत आनें नव्हती । देखैं पूर्वस्थितीच येती । आपुलिये ॥
ते जेथे लय पावतात, तेथेही ते निःसंशय दुसर्‍या स्थितीत जात नाहीत, तर आपल्या पूर्व म्हणजे अव्यक्त स्थितीला प्राप्त होतात;
येर मध्यें जें प्रतिभासे । तें निद्रिता स्वप्न जैसें । तैसा आकारू हा मायावशें । सत्स्वरूपीं ॥
आणि उत्पत्ती व नाश यांच्या मध्यावस्थेत जे साकार वस्तुजात दिसते ते निद्रिताला जसे स्वप्न त्याप्रमाणे मायेच्या योगाने ब्रह्मस्वरूपावर भासतात.
ना तरी पवनें स्पर्शिले नीर । पढियासे तरंगाकार । का परापेक्षा अळंकार । व्यक्ती कनकीं ॥
किंवा वार्‍याने हलविलले पाणी जसे लाटांच्या आकाराने भासते किंवा सुवर्णाच्या ठिकाणी अलंकाराचा आकार व्यक्त होतो,
तैसें सकळ हें मूर्त । जाण पां मायाकारित । जैसें आकाशीं बिंबत । अभ्रपटल ॥
त्याप्रमाणे हे सर्व साकार जग मायेने उत्पन्न झाले आहे, असे समज.

 

First Published on: March 14, 2023 4:30 AM
Exit mobile version