वाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

 

म्हणौनि हा आश्रोचि न करावा । मनेंहि आठवो न धरावा । एकु निजवृत्तीचा वोलावा । नासों नेदीं ||
आणि या विषयांना थारा न देता मनाला त्याची आठवणदेखील होऊ देऊ नको. तसेच आत्मज्ञानाचा ओलावा नाहीसा होऊ देऊ नको.
अगा स्वधर्मु हा आपुला । जरी कां कठिणु जाहला । तरी हाचि अनुष्ठिला । भला देखैं ||
अरे, आपला धर्म जरी आचरण्यास सोपा नसला, तरी त्याचेच आचरण करणे योग्य आहे, असे तू समज.
येरु आचारु जो परावा । तो देखतां कीर बरवा । परी आचरतेनि आचरावा । आपुलाचि ||
दुसर्‍याचा धर्म खरोखर दिसण्यात जरी चांगला असला तरी पालन करणार्‍यांनी आपल्याच धर्माचे पालन केले पाहिजे.
हें अनुचित कैसेनि कीजे । अग्राह्य केवीं इच्छिजे । अथवा इच्छिलेंही पाविजे । विचारीं पां ||
असे हे अनुचित कर्म कसे करावे? आणि जी गोष्ट घेण्यास योग्य नाही, तिची इच्छा कशी करावी? अथवा जरी इच्छित प्राप्त झाले, तरी ते घ्यावे का? याचा विचार कर.
तरी लोकांचीं धवळारें । देखोनियां मनोहरें । असतीं आपुलीं तणारें । मोडावीं केवीं ||
तसेच, लोकांचे मोठमोठे सुंदर वाडे पाहून आपल्या गवती झोपड्या मोडाव्या का?
हें असो वनिता आपुली । कुरूप जरी जाहली । तर्‍ही भोगितां तेचि भली । जियापरी ||
हे असो; आपली स्त्री कुरूप असली तरी तीच आपल्यास भोगण्यास ज्याप्रमाणे योग्य असते.

 

 

First Published on: May 22, 2023 4:00 AM
Exit mobile version