एकाच दिवशी ‘९’ मराठी चित्रपटांची मेजवानी

एकाच दिवशी ‘९’ मराठी चित्रपटांची मेजवानी
मराठी चित्रपट प्रेमींसाठी आगामी शुक्रवार हा आनंदाची पर्वणी ठरणार आहे. येत्या शुक्रवारी म्हणजे ८ फेब्रुवारीला प्रेक्षकांसाठी मराठी चित्रपटांची मेजवानी असणार आहे. या एकाच दिवशी राज्यभरात एकूण ९ मराठी चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. त्यामुळे येत्या शुक्रवारी बॉक्स ऑफिसवर मराठमोळं वातावरण पाहायला मिळणार आहे. यातील आणखी एक बाब म्हणजे एकाच दिवशी मराठीतील ९ चित्रपट प्रदर्शित होत असल्यामुळे त्यांच्यात जोरदार टक्कर होणार हे निश्चित आहे. आता या ९ चित्रपटांपैकी कोणत्या चित्रपटाला प्रेक्षक अधिक पसंती देणार? आणि कोणता चित्रपट या स्पर्धेत बाजी मारणार? हे येणारी वेळच सांगेल. मात्र, त्याआधी एक नजर टाकूया शुक्रवारी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटांवर…

‘भाई- व्यक्ती की वल्ली’ (उत्तरार्ध)

महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘भाई- व्यक्ती की वल्ली’ या चित्रपटाच्या पहिल्या भागाला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं होतं. याच चित्रपटाचा उत्तरार्ध आता प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, पहिल्या भागातील काही दृष्यांवर आक्षेपदेखील नोंदवण्यात आला होता. त्यामुळे दुसरा भाग काय कमाल दाखवतो याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

‘लकी’ (७ फेब्रुवारी)

संजय जाधव दिग्दर्शित ‘लकी’ हा चित्रपट शुक्रवार आणि शनिवार असा वीकेंडचा फायदा मिळावा, या उद्देशाने एक दिवस आधीच प्रदर्शित केला जाणार आहे. अभय महाजन आणि दीप्ती सती या कलाकारांची यात मुख्य भूमिका आहे. या चित्रपटाचं हटके पोस्टर सध्या चर्चेत आहे.

‘रेडिमिक्स’

वैभव तत्ववादी, नेहा जोशी आणि प्रार्थना बेहेरे यांच्या मुख्य भूमिका असलेल्या रेडिमिक्स चित्रपटाती सर्वांनाच उत्सुकता आहे. एकाच मुलाच्या प्रेमात पडलेल्या दोन मुलींची कथा या चित्रपटात आहे.

‘आसूड’

या चित्रपटात समाजव्यवस्थेच्या विरोधात उभ्या ठाकलेल्या तरुणाची गोष्ट प्रेक्षकांना पाहायला मिळेल. निलेश जळमकर यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

‘प्रेमवारी’ आणि ‘प्रेमरंग’

प्रेमाचा महिना अशी ओळख असलेल्या फेब्रुवारी महिन्यात, ‘प्रेमवारी’ आणि ‘प्रेमरंग’ हे २ प्रेमावर आधारित रोमँटिक धाटणीचे चित्रपट रिलीज होणार आहे.

‘दहावी’ आणि ‘उनाड मस्ती’ 

बेदुंध तरूणाईचं भावविश्व आणि तरूणाईचे प्रश्न उलगडून सांगणारे ‘दहावी’ आणि ‘उनाड मस्ती’ हे दोन चित्रपट याच आठवड्यामध्ये रिलीज होणार आहेत.

एकीकडे मराठी चित्रपटांना थिएटर मिळत नसल्याची ओरड होत असताना दुसरीकडे अशाप्रकारे एकाच दिवशी ९ चित्रपट प्रदर्शित होणं, ही सुखावह बाब म्हणावी लागेल. दरम्यान, गेल्या आठवड्यात प्रदर्शित झालेले  ‘मी पण सचिन’, ‘सर्व लाईन व्यस्त आहेत’ आणि ‘धप्पा’ हे चित्रपट प्रेक्षकांची मनं जिंकण्यात यशस्वी झाली आहेत.

First Published on: February 6, 2019 11:30 AM
Exit mobile version