‘आईच्या गावात’ म्हणत ‘गर्ल्स’ने घातला धिंगाणा

‘आईच्या गावात’ म्हणत ‘गर्ल्स’ने घातला धिंगाणा

मुलींच्या निराळ्या तरीही आकर्षक आणि वैविध्यपूर्ण अशा विश्वावर आधारित ‘गर्ल्स’ हा चित्रपट येत आहे. ‘गर्ल्स’ नक्की कोण? या प्रश्नाला उत्तर मिळताच, या ‘गर्ल्स’ नक्की करणार काय? हा नवीन प्रश्न निर्माण झाला आहे. या ‘गर्ल्स’ चित्रपटात किती मजामस्ती करणार आहेत, याची झलक आपल्याला पाहायला मिळणार आहे ‘आईच्या गावात’ या गाण्यातून ‘गर्ल्स’ सिनेमाचे पहिले ‘आईच्या गावात’ गाणे नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे.

‘आईच्या गावात’ या गाण्यात ‘गर्ल्स’ धमाल करताना दिसत आहेत. नेहमीच्या रटाळ दैनंदिन आयुष्यातून वेळ काढून ‘गर्ल्स’ स्वतःसाठी जीवन जगत आहेत. अशा स्वछंदी आयुष्याचा आनंद घेताना केली जाणारी मजा या गाण्यातून दिसत आहे. मुलांसारखेच किंबहुना मुलांनाही हेवा वाटेल असे आयुष्य ह्या ‘गर्ल्स’ जगत आहे.

‘आईच्या गावात’ हे गाणे प्रफुल आणि स्वप्निल यांनी संगीतबद्ध केले आहे. हे गाणं प्रफुल, स्वप्निल यांनी तब्बल तेरा वेळेस संगीतबद्ध केले. गाणं पूर्ण झाले की, गाण्यात काहीतरी अपूर्ण असल्याची भावना सगळ्यांना जाणवायची. पुन्हा नव्याने गाणे संगीतबद्ध केले जायचे असे तेरा वेळा झाले. अखेर चौदाव्या वेळेस सर्वांना अपेक्षित गाणे मिळाले. या संपूर्ण प्रक्रियेत प्रफुल, स्वप्निल यांनी त्यांची जिद्द कायम ठेवत एकच गाणे चौदा वेळा संगीतबद्ध केले.

या गाण्याच्या अनुभवाबद्दल प्रफुल आणि स्वप्निल सांगतात, “हे गाणं जेव्हा जेव्हा तयार झाले तेव्हा मनात काहीतरी राहतंय, अशी भावना येत होती. सरतेशेवटी आमच्या चौदाव्या प्रयत्नातून आम्हाला आमचे हवे असलेले गाणे मिळाले. या गाण्याला तयार करण्यासाठी बरेच दिवस लागले मात्र आम्ही दोघांनी आमची जिद्द आणि आमचे प्रयत्न सोडले नाहीत. मागच्या गाण्यात आपण कुठे कमी पडलो याचा विचार करून नवीन गाणे करत गेलो आणि गाणे तयार केले.” ‘गर्ल्स’ हा सिनेमा २९ नोव्हेंबरला प्रदर्शित होत आहे.

First Published on: October 30, 2019 7:28 PM
Exit mobile version