अ परफेक्ट मर्डर’ परफेक्ट नाटक

अ परफेक्ट मर्डर’ परफेक्ट नाटक

A Perfect Murder

मुंबईत होणार्‍या हिंदी, इंग्रजी, गुजराती नाटकांचा मागोवा घेतला तर एकंदरीत मराठीबरोबर अन्य भाषेतही नाटकांची सांस्कृतिक देवाण-घेवाण होताना दिसते आहे. विशेषत: गुजरातीत गाजलेली बरीचशी नाटके ही मराठी रंगभूमीवर आलेली आहेत आणि मराठी रंगभूमीवर गाजलेली नाटके अन्य भाषेतही होताना दिसतात. असे जरी मानले तरी सध्यातरी प्रेक्षकांना काय हवे आहे याचा विचार प्रामुख्याने निर्माते करताना दिसतात. एखाद दुसरा निर्माता असतो तो या लाटेला फारसं काही महत्त्व देत नाही. मधल्या काळात रहस्यमयी, उत्कंठा वाढवणार्‍या नाटकांकडे दुर्लक्ष झाले होते. ‘कुणी तरी आहे तिथं’ या नाटकानंतर तेवढ्याच ताकदीचे थरार निर्माण करू शकेल असे नाटक रंगमंचावर काही आले नाही. परंतु, सध्यस्थितीत असलेल्या नाटकांचा मागोवा घेतला तर ‘ओवी’, ‘गुमनाम है कोई’ यांच्याबरोबर उत्कंठा वाढवणारे थरार नाटक ‘अ परफेक्ट मर्डर’ रंगमंचावर दाखल झालेले आहे. निरज शिरवईकर लिखित या नाटकाचे दिग्दर्शन विजय केंकरे यांनी केलेले आहे. पुष्कर श्रोत्री, सतीश राजवाडे यांच्यासारखे मुरब्बी अभिनेते या नाटकात मुख्य भूमिका निभावत असल्यामुळे नाटक पाहण्यासाठी जो चोखंदळपणा आवश्यक असतो तो इथे अनुभवता येतो.

‘अ परफेक्ट मर्डर’ या नाटकात मीरा ही एका बंगल्याची मालकीण आहे. निरंजन हा तिचा पती आहे ज्याला ही संपत्ती स्वत:च्या नावावर करून घ्यायची आहे. काय केले म्हणजे आपण या संपत्तीचे मालक होऊ या विवंचनेत असताना तो स्वत: पत्नीच्या खुनाचे षड्यंत्र रचतो की ज्यात आपण पकडले जाणार नाही याची तो काळजी घेतो. करमरकर हा त्याचा कॉलेजचा मित्र. दोघेही आपापल्या क्षेत्रात कर्तृत्त्व सिद्ध करून असल्यामुळे त्यांची तोंडओळख असते. निरंजन हा क्रिकेटमध्ये तरबेज असतो. करमरकरची आर्थिक गरज आणि त्यासाठी कोणताही गुन्हा करण्याची तयारी ही त्याची वृत्ती निरंजनला माहीत असते. त्याला आपल्या हाताशी धरुन जे कुटील कारस्थान रचले जाते, ते म्हणजेच ‘अ परफेक्ट मर्डर’ हे नाटक सांगता येईल. मीराच्या जीवनात दिव्यजीत हा डोकावत असतो. त्यामुळे त्यांच्यात होणारा पत्रव्यवहार, गाठीभेटी याबद्दल निरंजनला माहीत असतात. या मर्डरमधून आपली सहज सुटका होईल असे त्याला वाटत असते. पण इन्स्पेक्टर घारगे स्वत:ची शक्कल आणि पोलीस कार्यपद्धती वापरुन त्या मर्डरचा छडा लावतो. नाटकात अशी काय गुंतागुंत आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला नाटक पहावेच लागेल.

संपत्तीसाठी केलेला सराईत कट हा या नाटकाचा विषय आहे. तो साध्यासरळ पद्धतीने लेखकाने आणि दिग्दर्शकाने मांडला असला तरी प्रेक्षकांत कुतूहल निर्माण होईल असा प्रयत्न लेखक, दिग्दर्शकाने केलेला आहे. रहस्यमयी नाटक म्हटलं की प्रसंगांबरोबर संवादही तेवढेच प्रभावी असावे लागतात. निरजने आपल्या लेखनात तशी काळजी घेतलेली आहे आणि ते थेट कथेच्या गरजेप्रमाणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल हे दिग्दर्शक विजय केंकरे यांनी पाहिलेले आहे. अजित परब याचे संगीत, निरजचे नेपथ्य, शीतल पळपदे याची प्रकाश योजना या सार्या गोष्टी छान जुळून आल्यामुळे नाटक परिणामकारक झालेले आहे. कथानकाला साजेल असे गीत इथे ऐकायला मिळते. ते क्षीतिज पटवर्धन याने लिहिले असून धीरगंभीर स्वरात मुग्धा कर्‍हाडे हिने गायिलेले आहे.

निरंजनची मुख्य व्यक्तीरेखा पुष्कर श्रोत्री याने साकार केलेली आहे. गुन्हा करायचा म्हणजे भूमिकेत त्याविषयीची घालमेल, ताठरपणा त्याने पद्धतशीरपणे आणलेला आहे. सतीश राजवाडे याने इन्स्पेक्टर घारगेची व्यक्तीरेखा साकार केलेली आहे. बोलीभाषेचा अभिमान बाळगुण गावरान भाषेत साधलेला सुसंवाद प्रभावी वाटला असला तरी इन्स्पेक्टरच्या व्यक्तीरेखेसाठी वेशभूषा, रंगभूषा यांच्याबाबतीत अजून विचार व्हायला होता असे वाटते. यात सर्वाधिक लक्ष वेधून घेणारी श्वेता पेंडसे ही कलावती महत्त्वाची वाटते. तिने यात मीराची व्यक्तीरेखा साकार केलेली आहे. प्रियकराचे अधूनमधुन येणे, दुसरीकडे पतीबद्दल आस्था दाखवणे आणि मोठ्या घातपाताला सामोरे गेल्यानंतर जी मानसिक अवस्था होते त्या सार्‍या गोष्टी बोलण्यातून, वागण्यातून, अभिनयातून दाखवण्यात ती यशस्वी झालेली आहे. आवर्जून कौतुक करावे अशी तिने भूमिका साकारलेली आहे. यात अभिजित केळकर(दिव्यजीत), सुबोध पंडे(करमरकर) यांच्याही भूमिका कथानकाला साजेल अशा झालेल्या आहेत. मंगला केंकरे यांनी वेशभूषेची बाजू सांभाळलेली आहे. या नाटकात साधारण सत्तरच्या दशकातील काळ घेतलेला आहे जो वेशभूषेत, नेपथ्यात दिसलेला आहे.

First Published on: January 17, 2019 5:28 AM
Exit mobile version