प्रयोगशील नाट्यनिर्मितीचा यशस्वी प्रयोग !

प्रयोगशील नाट्यनिर्मितीचा यशस्वी प्रयोग !

सोळा वर्षांपूर्वी त्याची रंगभूमीवर एन्ट्री झाली. कोणत्याही नाटकाचा नायक किंवा लेखक-दिग्दर्शक म्हणून नव्हे, तर मराठी नाटकाचा निर्माता होण्याचे धाडस त्याने दाखवले होते. त्याच्या प्रयत्नांना मैत्रीचे पाठबळ मिळाले आणि राहुल भंडारे या तरुण धाडसी निर्मात्याची ‘अद्वैत थिएटर्स’ ही नाट्यसंस्था नाट्य निर्मितीच्या क्षेत्रात दिमाखात उभी राहिली. या वर्षाच्या अखेरीस रंगभूमीवर पदार्पण करत असलेले ‘थँक्स डियर’ हे राहुल भंडारे निर्मित पंचविसावे नाटक आहे.

राहुल भंडारे यांना नाट्यनिर्मात्याने विविध विषयांना स्पर्श करणारी नाटकं रंगभूमीवर आणली. त्याने जागो मोहन प्यारे, करून गेलो गाव, प्यार किया तो डरना क्या, मी शारुक मांजरसुंभेकर, टॉम आणि जेरी, एकदा पहावं न करून अशा निव्वळ मनोरंजन करणाऱ्या नाटकांसोबत शिवाजी अंडरग्राऊंड भीमनगर मोहल्ला, ठष्ट, स्टॅच्यू ऑफ लिबर्टी अशा प्रबोधनात्मक नाटकांचेही प्रयोग यशस्वी करून दाखवले. राहुलच्या प्रयोगशील व धाडसी वृत्तीचा दुसरा पुरावा म्हणजे रत्नाकर मतकरी लिखित ‘आरण्यक’ हे पौराणिक नाटक त्याने 44 वर्षानंतर पुन्हा एकदा रंगभूमीवर आणले. महाभारतावर आधारित या अभिजात नाटकामध्ये दिलीप प्रभावळकर, रवी पटवर्धन, प्रतिमा मतकरी असे दिग्गज होते. राहुलने ‘अलबत्या गलबत्या’ आणि ‘निम्मा शिम्मा राक्षस’ निर्मित करून थांबलेल्या बालनाट्य चळवळीमध्ये प्राण फुंकले. ‘अलबत्त्या गलबत्या’ बालमित्रांनी तर अक्षरशः डोक्यावर घेतले. त्याचे सहाशेहून अधिक प्रयोग झाले. त्यामुळे राहुलला ‘प्रयोगशील नाट्यनिर्माता’ म्हणून ओळखला मिळाली.

राहुल त्याच्या एकूण प्रवासाबद्दल सांगतो की, “ अर्थातच हा प्रवास सोपा नव्हता, संघर्षाचा होता. कॉलेजमध्ये एकांकिका किंवा हौशी नाटकं करत असताना किंवा चळवळीची पथनाट्य करताना कधी वाटलं नव्हतं की, मराठी रंगभूमीवर एक यशस्वी निर्माता म्हणून मी उभा राहीन.परंतु सुसंस्कृत मन आणि सामाजिक जाणीव या भांडवलावरच मी या मराठी रंगभूमीवर यशस्वी होऊ शकलो. माझ्या संस्थेचे ब्रीदवाक्य आहे, ‘Patience & Passion Is Equal To Adwait Production’ …म्हणजे तुमच्याकडे पेशन्स आणि पॅशन या दोन गोष्टी असतील तर तुमचा प्रवास सुखद ठरेल.

‘अद्वैत थिएटर्स’ हे तीन मित्रांचे स्वप्न आहे. राहुल या तीन मित्रांना ‘थ्री इडियट्स’ असे म्हणतो . यातला पहिला इडियट आहे, प्रियदर्शन जाधव, ज्याला दिग्दर्शनाची आवड होती, तो दिग्दर्शक झाला. दुसरा इडियट आहे, सिद्धार्थ जाधव. ज्याच्याकडे अभिनयाचे अंग असल्यामुळे तो मराठीतला सुपरस्टार आहे आणि हिंदी चित्रपटसृष्टीतही तो आहे. आणि तिसरा म्हणजे स्वतः राहुल भंडारे. या तिघांच्याही स्वप्नाचा प्रवास रुपारेल कॉलेजमध्ये सुरू झाला. राहुल ‘अद्वैत थिएटर्स’ हे स्वप्न आज जगतो आहे. राहुल सांगतो की, “ गेली पंधरा वर्षे मी फक्त आणि फक्त शिवाजी मंदिरच्या फुटपाथवरच रमलो आहे, मोह होतो प्लाझाच्या फुटपाथवर जाण्याचा परंतु सध्या मी त्या मोहाला आवर घातलेला आहे. पण येणाऱ्या काळामध्ये नक्कीच ते शिवाजी मंदिर ते प्लाझाच्या फूटपाथमधील साठ फुटाचं अंतर पार करण्याचं धाडस करेन.”

राहुल या क्षेत्रात येताना त्याच्याकडे कुठलाही वारसा नव्हता. नाटक आणि सिनेमा फक्त प्रेक्षक म्हणून पाहायचा एवढंच… नाट्यसंस्था वगैरे काढणे ही गोष्टच खूप दूरची होती. पण त्याच्या निरीक्षणाअंती असे लक्षात आले की, गेल्या पंचवीस वर्षांमध्ये रंगभूमीवर कुणी नवा निर्माता तयार झालाच नाही. जे कोणी होते, ते पूर्वापारपासून चालत आलेले होते. त्यातही काही संस्था डबघाईला आलेल्या होत्या. हे चित्र पाहून वाटले की, मराठी रंगभूमीला जर योगदान द्यायचे असेल तर त्याकडे गांभीर्याने बघणे गरजेचे आहे. म्हणूनच सिद्धार्थ जाधव आणि प्रियदर्शन जाधव या मित्रांचा हात धरून तो या क्षेत्रात आला. राहुल म्हणतो की, “अर्थातच माझ्याकडे आर्थिक पाठबळ नव्हतं पण प्रत्येक प्रश्नावर काहीतरी उत्तर असतंच, ते मी शोधत गेलो आणि मला सापडलं !”

राहुलल नाटकासाठी तारखा मिळण्याबाबत अडचणी निर्माण झाल्या होत्या. नाटक चालवायचं म्हणजे चांगल्या नाट्यगृहात योग्य त्या तारखा मिळणे खूप गरजेचे असते, तरच नाटक अधिक लोकांपर्यंत पोहोचते. याबाबत प्रतिस्पर्ध्यांसोबत स्पर्धा करणे खुप कठीण असते. राहुल सांगतो की, “नाट्य क्षेत्रामध्ये व्यवस्थापन कसं करायचं याची कुठल्याही प्रकारची पुस्तकं नाहीत. प्रत्येक नाटक हे बाईचं बाळंतपण असतं. बाळंतपण अवघड असलं तरी तेवढंच सुंदरही असतं. त्यामुळे मी हे समजून होते की, खूप अलगद, नाजूकपणे आणि डोकं शांत ठेवून करण्याची ही प्रक्रिया आहे. मी ते त्याप्रमाणे हाताळलं.” इथे त्याने स्वतःचे पेशन्स आणि फॅशनचे सूत्र अंमलात आणल्याचे दिसते.

प्रबोधनात्मक नाटक म्हणजे अनेकांच्या टीकेचा विषय असतो. त्यामध्ये प्रस्थापित समाज-व्यवस्थेवर भाष्य केलेले असते. अशा वेळी व्यावसायिक रंगभूमीवर ही नाटकं करण्यामध्ये धोका पत्करावा लागतो. परंतू तरीही राहुलने ठष्ट, स्टॅच्यू ऑफ लिबर्टी, शिवाजी अंडरग्राऊंड भीमनगर मोहल्ला अशी सामाजिक रूढींवर रोखठोख भाष्य करणाऱ्या नाटकांची निर्मिती केली याबद्दल तो म्हणतो की, “मला चळवळीचं बाळकडू मिळालंय पण मी स्वतःला उद्योजक समजतो. ‘शिवाजी अंडरग्राउंड…’च्या वेळी नक्कीच प्रॉब्लेम झाला होता. मला थिएटर मिळू दिली नाहीत. माझ्या जाहिरातीही केल्या गेल्या नाहीत. परंतु एक इच्छाशक्ती होती. ‘शिवाजी अंडरग्राऊंड…’ हे खणखणीत नाणं होतं याची मला पूर्ण जाणीव होती. म्हणूनच तर सिंगापूरमध्ये त्याला मिफ्ता क्रिटिक अवॉर्ड, झी गौरव अवॉर्ड मिळाला. परंतू मी ‘आरण्यक’सारखं पौराणिक नाटक ही यशस्वीरित्या केलंय.”

‘आरण्यक’ आणि ‘अलबत्या गलबत्या’ या नाटकांनिमित्त लेखक रत्नाकर मतकरींसोबत त्यांच्या शेवटच्या दिवसांमध्ये राहुलची जवळीक निर्माण झाली. त्याबद्दल राहुल मतकरी-काकांबद्दल भरभरून बोलतो, “ ‘आरण्यक’च्या निमित्ताने एक दिग्दर्शक म्हणून एक अभिजात नाटक कसं असतं हे मला त्यांच्याकडून शिकायला मिळालं. तुम्हाला माहित नसावं कदाचित पण सामाजिक बांधिलकी म्हणून मतकरी काकांचं एक वेगळं योगदान आहे. त्यांनी ठाण्यामध्ये वस्तीतल्या मुलांचा ‘वंचितांची रंगभूमी’ म्हणून एक वेगळा ग्रुप बांधला होता. निर्भय बनो आंदोलनाच्या वेळी मी मतकरी काकांना भेटायचो त्यांच्याशी बोलणंही व्हायचं. त्यावेळीच मला, त्यांची एक गोष्ट खूप भावली होती. एक लेखक म्हणून त्यांच्याकडे सामाजिक जाणीव होती. व्यावसायिक नाटकं करूनही हा माणूस आंदोलनामध्ये उतरतो, हा माणूस भूमिका घेतो. भूमिका घेणं अवघड असतं, खासकरून तेंव्हा, जेंव्हा तुम्ही एक व्यावसायिक असता. परंतू ते ठामपणे भूमिका घेणारे होते. त्यांनी मला शेवटच्या दिवसांमध्ये एक नाटक दिलेलं आहे. ‘गांधी अंतिम पर्व’ हे त्या नाटकाचं नाव आहे. भविष्यात मला जसा वेळ मिळेल त्यानुसार मी हे नाटक नक्कीच करेन.”

राहुल स्वतः एक यशस्वी नाट्यनिर्माता असूनही दिवंगत मच्छिंद्र कांबळी, लता नार्वेकर आणि विक्रमवीर प्रशांत दामले यांना नाट्य-निर्मिती क्षेत्रातील आदर्श मानतो. कुठल्याही प्रकारची पार्श्वभूमी नसताना मच्छिंद्र कांबळी मालवणातून आले आणि बोलीभाषेतील नाटक त्यांनी सातासमुद्रापार नेले. वस्त्रहरण सारख्या नाटकाचे त्यांनी तब्बल पाच हजार प्रयोग केले याचे राहुलला अप्रूप वाटते. मराठी रंगभूमीवर वेगवेगळे विषय धाडसाने मांडणाऱ्या लता नार्वेकर बाई देखील राहुलला तेवढ्याच प्रेरणादायी वाटतात. एक नट म्हणून उंची गाठलेले प्रशांत दामलेसुद्धा राहुलला आदर्श वाटतात. निर्माता म्हणून त्यांच्याकडे असलेली शिस्तप्रियता आणि व्यवस्थापन कौशल्य या शिकण्यासारख्या बाबींकडे तो लक्ष वेधतो.

मधल्या काळात राहुलची ‘नाट्य निर्माता संघा’च्या सेक्रेटरी पदावर निवड झाली. पूर्वी ज्याप्रमाणे राजाश्रय मिळायचा त्याप्रमाणे आजच्या नाटकांना, त्यातील कलाकारांना आणि इतर रंगकर्मींना महाराष्ट्र शासनाने राजाश्रय दिला पाहिजे अशी त्याची मागणी आहे. कारण आज जर मराठी भाषा किंवा संस्कृती कुणी जपत असेल, तर त्यात मराठी रंगभूमीचा सिंहाचा वाटा आहे. इथल्या रंगकर्मींसोबतच रसिका प्रेक्षकांनीही गेल्या १८२ वर्षांचा मराठी रंगभूमीचा इतिहास मनामनात जपला आहे. म्हणूनच टीव्ही चॅनल्स किंवा ओटीटी प्लॅटफॉर्म अशा विविध माध्यमांचा पसारा वाढला असला तरी मराठी रंगभूमी पाय रोवून उभी आहे, असे राहुलचे म्हणणे आहे.

2022 ची सांगता होत असतानाच निर्माता राहुल भंडारे,निखिल रत्नपारखी लिखित थँक्स डियर हे, त्याचे पंचविसावे धमाल नाट्यपुष्प आज रसिक प्रेक्षकांना अर्पण करीत आहे. बहुदा आजपर्यंत ज्या रसिक प्रेक्षकांनी प्रेम दिले त्यांना ‘थँक्स डियर’ म्हणण्याचा राहुलचा हा एक वेगळा प्रयत्न असावा

First Published on: December 25, 2022 1:47 PM
Exit mobile version