‘खान’ आडनावामुळेच आमिर, नसीर टार्गेट – अमोल पालेकर

‘खान’ आडनावामुळेच आमिर, नसीर टार्गेट – अमोल पालेकर

अभिनेते नसरुद्दीन शहा यांनी बुलंद शहरामधील हिंसाचाराबाबत केलेल्या वक्तव्याचं प्रकरण अजूनही गाजत आहे. दरम्यान, याच मुद्द्यावरुन ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांनीही गंभीर आरोप केला आहे. ‘खान’ असल्यामुळेच आमिर आणि नसीरुद्दीन यांना टार्गेट केलं जात असल्याचा आरोप अमोल पालेकर यांनी केला आहे. पुण्यातील एका कार्यक्रमात पालेकर बोलत आहे. यावेळी आपलं मत व्यक्त करताना ते म्हणाले की, नसीरुद्दीन शाह आणि आमिर खान यांना केवळ खान असल्यामुळे ट्रोल केलं जातं. हे असंच सुरु राहिलं तर येणारा काळ कठीण असेल, अशी भीती त्यांनी बोलून दाखवली. पालेकर म्हणाले की, ‘एकंदर परिस्थीती पाहिली तर समाजात असहिष्णुता वाढते आहे. ही परिस्थिती अशीच राहिली तर भविष्यकाळ कठीण आहे.’ पुण्यामध्ये झेनिथ एशिया सन्मान पुरस्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी अन्य विषयांवरही पालेकर यांनी आपलं मत व्यक्त केलं. अर्बन नक्सल म्हणजे काय? त्याची व्याख्या मी शोधतो आहे असेही अमोल पालेकर यावेळी म्हणाले. याशिवाय टी. एम. कृष्णा यांचा कार्यक्रम रद्द करण्यामागे नेमकं काय कारण होतं? हे मला समजले नसल्याचंही ते म्हणाले.

आधीच नसीरुद्दीन शाह यांच्या त्या वक्तव्यामुळे सर्वच स्तरांत खळबळ माजली होती, अशातच आता त्यामध्ये अमोल पालेकरांनी केलेल्या या वक्तव्याची भर पडली आहे. त्यामुळे हे प्रकरण आता कोणतं नवीन वळण घेणार? पालेकरांनी केलेल्या आरोपाला कुणी प्रत्युत्तर देणार का? हे येणारी वेळच सांगेल.

नसीरुद्दीन शाह म्हणाले होते…

बुलंद शहरातील हिंसाचार प्रकरणी आपलं मत नोंदवताना, ‘देशात गायीच्या मृत्यूचे महत्त्व पोलिसाच्या मृत्यूपेक्षा जास्त आहे’, असं वक्तव्य शाह यांनी केलं होत. ‘एका गाईचा जीव माणसांपेक्षा महत्त्वाचा झाला आहे. देशातील हे वातावरण पाहता मला माझ्या मुलांची चिंता वाटते, असंही शाह म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यांवरुन सुरु झालेलं वाद-विवादांचं प्रकरण अद्याप गाजतं आहे.

मूळ प्रकरण काय?

३ डिसेंबरला बुलंदशहरात गोहत्येवरुन तणाव निर्माण झाला. ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर जमावानं हल्ला केला. यामध्ये पोलीस निरीक्षकासह एका तरुणाचा मृत्यू झाला.

First Published on: December 26, 2018 9:12 AM
Exit mobile version