‘संजू’:देशद्रोही व्यसनाधीन तरुणाचं ग्लोरिफिकेशन’!

‘संजू’:देशद्रोही व्यसनाधीन तरुणाचं ग्लोरिफिकेशन’!

अभिनेता रणबीर कपूरने 'संजू'मध्ये संजय दत्तची भूमिका साकारली आहे.

तुरुंगातून सुटून बाहेर आल्यानंतर संजय दत्त पुन्हा उभारी घेऊ शकेल का? अशी शंका अनेकांनी उपस्थित केली होती. मात्र, तुरुंगात असतानाही संजय दत्तवर अनेक निर्मात्यांनी पैसे लावलेले होते, दिग्दर्शकांनी भिस्त ठेवली होती. त्याचाच परिणाम म्हणून तुरुंगातून सुटल्यानंतर अवघ्या वर्ष-दीड वर्षात संजय दत्त पुन्हा एकदा त्याच ‘लाईम लाईट’मध्ये दिसायला लागला. त्याच्या चाहत्यांचं तेच प्रेम त्याला पुन्हा मिळायला लागलं. एवढंच नव्हे, तर त्याच्या ‘संघर्षपूर्ण’ आयुष्यावर आधारित सिनेमाही आला. ज्यात रणबीर कपूरने संजय दत्तची व्यक्तिरेखा साकारली आहे. मात्र, हा सिनेमा आल्यानंतर एकीकडे जसे त्याचे चाहते त्याच्यावर आणि रणबीर कपूरवर कौतुकाचा वर्षाव करत आहेत, तसेच काही समीक्षक टीकाही करत आहेत. आणि त्यांचा प्रश्न आहे देशद्रोहाच्या खटल्यात नाव असलेल्या, गुन्हेगार राहिलेल्या, तुरुंगात शिक्षा भोगून आलेल्या व्यसनाधीन व्यक्तीच्या आयुष्याचं ग्लोरिफिकेशन करायचं तरी कशाला?

तुरुंगातून सुटून थेट प्रसिद्धिच्या शिखरावर

व्हिडिओतून टीका आणि इशाराही!

या समीक्षकांमध्ये आणि टिकाकारांमध्ये एक नाव आहे लेखक-अभिनेते योगेश सोमण यांचं. योगेश सोमण यांनी त्यांच्या फेसबुक वॉलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी ‘संजू’बद्दल परखडपणे मत व्यक्त केलं आहे. अगदी थेट शब्दांमध्ये प्रश्न उपस्थित केले आहेत. आणि पालकांना जाहीर पोटतिडकीचा इशाराही दिला आहे.

‘संजू’ म्हणजे व्यसनाधीन व्यक्तीचं ग्लोरिफिकेशन!

व्हिडिओच्या सुरुवातीलाच योगेश सोमण यांनी संजूवर कडाडून टीका केली आहे. हा एकप्रकारे त्यांचा ‘संजू’ चित्रपटाचा रिव्ह्यूच म्हणावा लागेल. या चित्रपटामध्ये एका देशद्रोह्याच्या, व्यसनाधीन तरुणाच्या आयुष्याला ग्लोरीफाय केल्याचं म्हटलं आहे. शिवाय हे ज्या स्वरूपात आणि जितक्या प्रखरपणे आपल्या मुलांपर्यंत पोहोचवलं जात आहे, तितक्याच प्रखरपणे संजय दत्तच्या व्यक्तिमत्वाबद्दल, त्याच्या चुकांबद्दल, त्याने केलेल्या गुन्ह्यांबद्दल, त्याच्यावर दाखल असलेल्या पोलीस प्रकरणांबद्दलही मुलांपर्यंत माहिती पोहोचायला हवी असंही ते म्हणतात. ‘आपल्या मुलांपर्यंत दोन्ही बाजू पोहोचवा’ असं आवाहन ते पालकांना करत आहेत.

‘संजू’ चित्रपटामध्ये संजय दत्तच्या आयुष्यातल्या विविध छटा दाखवण्यात आल्या आहेत.

आपण कुणी खासदार नाहीत!

सिनेमामध्ये संजय दत्तला असलेल्या वाईट सवयींमुळे किंवा त्याने केलेल्या चुकीच्या कृत्यांमुळे कसा त्रास सहन करावा लागला, हे दाखवल्याचा दावा त्याच्या चाहत्यांकडून केला जात आहे. पण  ‘हे सर्व दाखवलं, तरी शेवटी टॅगलाईन मात्र ‘मी देशद्रोही नाही’ अशीच आहे. पण देशद्रोहाच्या खटल्यामध्येच शिक्षा झाली आहे’, असंही सोमण या व्हिडिओमध्ये म्हणत आहेत. ‘उद्या आपल्या मुलांनी असं काही करण्याआधी आपल्यालाच त्यांना यातून बाहेर काढावं लागेल, कारण आपल्याकडे कुणी खासदार नाहीत’, असंही ते व्हिडिओमध्ये म्हणत आहेत.

सलमानलाही मारला टोमणा

दरम्यान, एकीकडे संजू आणि पर्यायाने संजय दत्तवर परखड टीका करत असतानाच योगेश सोमण यांनी अशाच कायदे प्रविष्ट प्रकरणांमुळे वादात असलेला अभिनेता सलमान खान यालाही टोमणा मारला आहे. सोमण म्हणतात, ‘काही दिवसांनी असाही सिनेमा येईल..अर्धी चड्डी घातलेला माणूस अंधारातून येईल..बथ्थड चेहऱ्याने चित्रपटाचं नाव सांगेल भाईजान..म्हणेल हाँ मैंने ऐश्वर्यासे प्यार किया..मेरा ब्रेक-अप हुआ..फिर मैं दारू पीने लगा..और शायद रात को नशे में फुटपाथ पर सोये दो-चार लोगों को कुचला भी होता…लेकिन मैं खूनी नहीं हूँ..प्यार करने वाला हूँ’!

First Published on: July 2, 2018 3:47 PM
Exit mobile version