‘धप्पा’ भंबेरी उडवणारं भावविश्व

‘धप्पा’ भंबेरी उडवणारं भावविश्व

Dhappa Marathi Movie

आपले अस्तित्त्व, वर्चस्व दाखवायचे असेल तर आवाज हा उठवलाच पाहिजे. चांगले-वाईट, हिताचे याचा विचार न करता विरोध करायचा. त्यामुळे चर्चा घडून येते. प्रसिद्धी माध्यमं याची दखल घेत आहेत म्हणताना विरोध करणार्‍याला आपला हेतू साध्य झाल्याचे समाधान मिळते. पण या स्वार्थी विरोधाचा सर्वसामान्य माणसाला अधिक त्रास होत असतो. आजची सामाजिक परिस्थिती लक्षात घेता विरोध म्हणजे प्रसिद्धी मिळवण्याचे एक साधन झालेले आहे. पूर्वी राज्य, राष्ट्रीय पातळीवर असे काहीसे प्रश्न उद्भवत होते. पण आता परिस्थिती बदललेली आहे. गल्लीबोळातले, राजकारणात येऊ पहाणारे गुंड प्रवृत्तीचे नेते आपल्या अस्तित्त्वासाठी प्रश्न उपस्थित करून विरोध करू लागलेले आहेत.

प्रदर्शित झालेल्या ‘धप्पा’ या चित्रपटात एका सोसायटीवर उद्भवलेली समस्या अधोरेखित केली गेलेली आहे. याचे लेखक गिरीश कुलकर्णी असून त्याचे दिग्दर्शन निपुण धर्माधिकारी याने केलेले आहे. कथेचा आवाका तसा छोटा आहे. निसर्गाचे संवर्धन व्हावे यादृष्टीने सोसायटीतील मुलं, त्यांचे पालक प्रयत्न करत आहेत आणि त्याला सोसायटी बाहेरील गुंड प्रवृत्तीचे नेते विरोध करीत आहेत. हे करत असताना दिग्दर्शकाने कथेत येणार्‍या पात्रांतील वृत्ती, प्रवृत्तींना अधिक प्राधान्य देऊन चित्रपट मनोरंजक कसा होईल हे पाहिलेले आहे. यातले काही प्रसंग वस्तूस्थितीशी सुसंगत आहेत तर काही प्रसंगांत विसंगतीही जाणवायला लागते. गुंड प्रवृत्तीच्या नेत्यांची भंबेरी उडवणार्‍या मुलांचे भावविश्व यात पहायला मिळते. आवर्जून नजरेखालून घालावा असा हा ‘धप्पा’ आहे.

अनुराधा देवधर ही या सोसायटीतली एक रहिवासी. गणेशोत्सवात नेहमीपेक्षा वेगळा काहीतरी कार्यक्रम व्हावा यादृष्टीने स्वत:हून पुढाकार घेऊन सोसायटीतल्याच लहान मुलांना घेऊन निसर्गाच्या संवर्धनाविषयी नाटक बसवायला घेते. तुकाराम महाराजांनी जसे निसर्गाविषयी जागृती दाखवली तसे येशू ख्रिस्ताचेही निसर्ग संवर्धनाविषयी कार्य होते. या दोघांचा समन्वय साधून एक नाटक करावे असे अनुराधा यांची इच्छा होती. मुलं तयारीही दाखवतात, तालीमही होते. परंतु सोसायटीच्या आजुबाजूला रहाणारी नेते मंडळी केवळ नाटकात येशू ख्रिस्त आणला म्हणून नाटक करायला देत नाहीत. मुलांना धमकावले जाते, तोडफोड केली जाते, पालकांना वेठीस धरले जाते. एका नाटकामुळे संपूर्ण सोसायटीला त्रास होत आहे म्हटल्यानंतर अनुराधा स्वत:हूनच माघार घेते. याचा अर्थ हा चित्रपट इथेच थांबतो असे नाही. गुंडांची ही दडपशाही मुलांना काही स्वस्थ बसू देत नाही. ही मुलं संघटित होतात. छुप्या मार्गाने नाटक बसवण्याची तयारी करतात. त्यासाठी कोडभाषेचा अवलंब करतात. म्हणून अडथळे येण्याचे काही थांबत नाही. शेवटी या मुलांचा जो हेतू आहे तो साध्य होतो. तो कसा, यासाठी आपल्याला चित्रपट पहावा लागेल.

मुलांचे असे स्वत:चे भावविश्व आहे. त्यांच्यात समजुतदारपणा वाढला असला तरी हट्ट करण्याची वृत्ती काही थांबलेली नाही. सामूहिकपणे जेव्हा ही मुलं एकत्र येतात तेव्हा त्यांच्यात महत्त्वाकांक्षा ही अधिक असते. ती पूर्ण करण्यासाठी वाट्टेल ते करण्याची त्यांची तयारी असते. आजवर अनेक चित्रपटांत मुलांच्या जिद्दीची कहाणी ही चितारलेली आहे. काळाप्रमाणे त्याच्यात बदलही झालेला दिसतो. निपुणने आपल्या दिग्दर्शनात ‘धप्पा’ हा जो चित्रपट हाताळलेला आहे, तशी काहीशी स्थिती काही वर्षांपूर्वीच्या चित्रपटात दाखवली जात होती. ‘धप्पा’ची कथा आजची आहे म्हटल्यानंतर त्याचे स्वरुप थोडेफार बदलायला हवे होते. कथेतले नावीन्य सोडले तर त्याचे सादरीकरण पूर्वीच्याच रचनेतले आहे.

या चित्रपटात सहभागी झालेले बालकलाकार नवीन असले तरी त्यांच्या पालकांची भूमिका ज्यांनी केलेली आहे ते सर्व सेलिब्रिटी कलाकार आहेत. त्यामुळे चित्रपट पाहण्यासाठी येणार्‍या प्रेक्षकांसाठी या सेलिब्रिटी कलाकारांचे असणे हा आकर्षणाचा भाग असणार आहे. अनुराधाची मुख्य व्यक्तीरेखा वृषाली कुलकर्णी यांनी केलेली आहे. इरावती हर्षे, सुनिल बर्वे, गिरीश कुलकर्णी, श्रीकांत यादव, उमेश जगताप, ज्योती सुभाष, चंद्रकांत काळे यांचा या चित्रपटात सहभाग आहे. आकाश कांबळे, शारवी कुलकर्णी, अक्षय यादव, शर्व वढवेकर, श्रीहरी अभ्यंकर, दीपाली बोरकर, अभिजित शिंदे, नीला देशपांडे या बालकलाकारांनी उत्सवामागची धडपड आपल्या अभिनयातून दाखवून दिलेली आहे. गंधार याचे संगीत या चित्रपटाला लाभलेले आहे. इंक टेल्स, अरभाट फिल्म्स यांनी या चित्रपटाची निर्मिती केलेली आहे.

First Published on: February 2, 2019 5:15 AM
Exit mobile version