आता ‘या’ कलाकाराचा मुलगा झळकणार रुपेरी पडद्यावर

आता ‘या’ कलाकाराचा मुलगा झळकणार रुपेरी पडद्यावर

अभिनेता परेश रावल आणि मुलगा आदित्य रावल

स्टार किड्सच्या बॉलीवूड एंट्रीमध्ये आता आणखी एका कलाकाराच्या मुलाचा समावेश होणार आहे. हिंदी सिनेमातील चरित्र अभिनेता म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ अभिनेता परेश रावल यांचा मोठा मुलगा आदित्य आता सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे. निर्माता आनंद एल. राय आणि राजन चांडेल यांनी दिग्दर्शनात बनणाऱ्या आगामी सिनेमात आदित्य रावल दिसणार आहे. २०१७ साली आदित्यने परदेशात पटकथा लेखक म्हणून काम पाहिले होते. त्यावेळी त्याने लिहिलेले ‘क्विन’ हे नाटक रंगभूमीवर सादर झालं होतं. आदित्यला गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात यात नाटकाच्या लेखनाकरता ‘न्यूयॉर्क इनोवेटीव थिएटर अॅवॉर्ड’ने सन्मानित करण्यात आले होते. त्याने एक ‘चायनिज लघुपटा’चीही पटकथा लिहिली आहे. ‘मेलबॉक्स’ नावाचा हा लघुपट ‘एनबीयुसी लघुपट महोत्सवात’ दुसऱ्या क्रमांकावर आला होता. सध्या विशाल भारद्वाज यांच्या ‘पटाखा’ सिनेमात दिसणारी सन्या मल्होत्रा ही आदित्य रावलच्या सोबत आगामी चित्रपटात काम करणार असल्याच्या चर्चा सिनेसृष्टीत होत आहे.

अभिनेता परेश रावल कुटुंबियांसह (सौजन्य- मिड डे)

सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेता 

सिनेमा, रंगभूमीवरील कसदार अभिनेता आणि भाजपचे आमदार असलेल्या परेश रावल यांचा मुलगा आदित्यच्या पदार्पणाबाबत अद्याप अधिकृत घोषणा झाली नसली तर मोठ्या प्रमाणात चर्चा सिनेसृष्टीत होत आहे. एकेकाळी सिनेमा आणि छोट्या पडद्यावर सातत्याने दिसणाऱ्या अभिनेत्री स्वरूप संपत आणि परेश रावल यांचा आदित्य हा मोठा मुलगा आहे. तर त्यांच्या लहान मुलाचे नाव अनिरुद्ध हे आहे.

सारा आणि जान्हवी (सौजन्य-इंडिया टुडे)

इतरही स्टार किड्स सिनेसृष्टीत दाखल

या वर्षाची सुरूवात श्रीदेवी आणि बोनी कपूर यांच्या मुलीच्या पदार्पणातील चित्रपटाने झाली असून जान्हवीच्या ‘धडक’ चित्रपटातच शाहिद कपूरचा भाऊ इशान खट्टरही झळकला होता. तर सैफ अली आणि अमृता सिंग यांची लाडकी कन्या सारा अली खान हिच्या ‘केदारनाथ’ आणि ‘सिंबा’ चित्रपटाचीही जोरदार चर्चा आहे. आता या शर्यतीत आदित्य रावलचेही नाव सामील झाले आहे. लवकरच त्याच्या सिनेमाची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.

First Published on: September 5, 2018 4:45 PM
Exit mobile version