‘धर्मवीर मु.पो. ठाणे’ चित्रपटात अभिनेता प्रसाद ओक साकारणार आनंद दिघे यांची भूमिका

‘धर्मवीर मु.पो. ठाणे’  चित्रपटात अभिनेता प्रसाद ओक साकारणार आनंद दिघे यांची भूमिका

‘धर्मवीर मु.पो. ठाणे’ हा बहुचर्चत आगामी चित्रपट येत्या १३ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. प्रवीण विठ्ठल तरडे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून, या चित्रपटाची निर्मिती अभिनेते मंगेश देसाई यांनी केली आहे. हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित असून यामध्ये जनसामान्यांचा नेता नाही तर जनसामान्यांचा आधार अशी कीर्ती असलेले आणि आपले संपूर्ण आयुष्य सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी खर्च करणारे ‘लोककारणी’ म्हणजे आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित आहे. आभाळाएवढं कर्तृत्व आणि व्यक्तिमत्त्व असलेल्या या लोकनेत्याचा जीवनप्रवास चित्रपटाच्या माध्यामातून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच यात आनंद दिघे यांची भूमिका कोण साकारणार याबद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता होती. या प्रश्नाचे उत्तर आता मिळाले असून आनंद दिघेची दमदार व्यक्तिरेखा अत्यंत ताकदीचा अभिनेता प्रसाद ओक साकारणार आहे.

आनंद दिघे यांचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य होतं ते म्हणजे तळागाळातील लोकांचा विचार. गरीब, शोषितांच्या अन्यायाला वाचा फोडणे आणि जुलूमाची भाषा करणाऱ्यांवर आपली जरब बसवणे. इतकंच नाही तर माणसं जोडण्याची कला सुद्धा त्यांना अवगत होती. सामान्य माणसाची कितीही छोटी किंवा कितीही मोठी समस्या असू दे ती सोडवणं हेच त्यांच्या जीवनाचं जणू व्रतच होतं. आनंद दिघे आज हयात नसले तरी सर्वसामान्यांच्या मनात ते आजही जिवंत आहेत.

अशा ‘लार्जर दॅन लाईफ’ व्यक्तिमत्वावर चित्रपट बनवण्याचे काम हे शिवधनुष्य पेलण्याइतकंच जिकरीचं आणि त्यातही त्यांची व्यक्तिरेखा साकारणं हे त्याहूनही अवघड काम. परंतु या दोन्ही जबाबदाऱ्या अतिशय सक्षमपणे आपल्या खांद्यावर घेतल्या त्या दिग्दर्शक प्रवीण तरडे आणि अभिनेते प्रसाद ओक यांनी. आनंद दिघे यांचा एवढा मोठा जीवनप्रवास चित्रपटात मांडणं तसं अवघडच काम होतं. या चित्रपटासाठी आता झी स्टुडिओज निर्माते आणि प्रस्तुतकर्ते अशी दुहेरी जबाबदारी पार पाडणार आहे.

 

हेही वाचा :“इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी” हा बहुचर्चित चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

First Published on: April 19, 2022 4:38 PM
Exit mobile version