‘सुबह ७ बजे दूधवाला आता है, अॅक्टर नहीं’, खास ऋषी कपूर स्टाईल!

‘सुबह ७ बजे दूधवाला आता है, अॅक्टर नहीं’, खास ऋषी कपूर स्टाईल!

ज्येष्ठ अभिनेते आणि बॉलिवूडचा पहिला चॉकलेट बॉय म्हणून प्रसिद्ध असलेले ऋषी कपूर यांचं आज सकाळी कर्करोगाने निधन झालं. मात्र, त्यांच्या काही खास आठवणी आजही ताज्या आहेत. त्यांच्या आयुष्यात घडलेल्या अशाच एका किश्श्यातून ते किती शिस्तप्रिय होते आणि त्यांची ‘रॉयल’ स्टाईल किती भिनलेली होती, याचं प्रत्यंतर आलं. खरंतर दमदार अभिनयासोबत आपल्या परखड स्वभावासाठी देखील ऋषी कपूर प्रसिद्ध होते. त्यामुळे अनेकदा सेटवरच्या स्टाफला ते झापूनही टाकत असत. पण नंतर तितक्याच प्रेमाने ‘जिंदगी थोडी है यार, वक्त की अहमियत को समझो’ असं म्हणून समोरच्याचं मन देखील जिंकून घ्यायचे!

काय आहे किस्सा?

हा किस्सा आहे अर्थातच ऋषी कपूर यांच्या एका शूटिंगच्या सेटवरचा. वेळेच्या बाबतीत ऋषी कपूर प्रचंड आग्रही असत. तरुणपणी त्यांनी वेळकाळाचं भान न ठेवता झोकून देऊन काम केलं होतं. पण जसजसं वय वाढत गेलं, तसतसं त्यांना तितक्या मेहनतीने काम करणं अशक्य होऊ लागलं. त्यानंतर तर डॉक्टरांनी देखील त्यांना थोडं आरामातच काम करण्याचा सल्ला दिला. त्यावरून मग ऋषी कपूर यांनी स्वत:चं वेगळं टाईम-टेबल तयार केलं. त्यानंतर कधीही त्यांनी मॉर्निंग शिफ्टमध्ये काम केलं नाही. तर झालं असं, की एकदा एक नवोदित सहाय्यक दिग्दर्शक ऋषी कपूर यांच्यासोबत काम करत होता. आदल्या दिवशीचं शूटिंग संपल्यावर त्यानं दुसऱ्या दिवशीचं टाईमटेबल बनवलं. आता त्या बापड्याला ऋषी कपूर यांचं टाईमटेबल माहिती नव्हतं. मग काय, व्हायचं तेच झालं!

सुबह सात बजे आना होगा…!

त्या नवोदित सहाय्यक दिग्दर्शकानं ऋषी कपूर यांना सांगितलं की, ‘तुम्हाला उद्या सकाळी ७ वाजता यावं लागेल. कारण सकाळचे काही सीन शूट करायचे आहेत’. आता मॉर्निंग शिफ्टमध्ये काम न करणाऱ्या ऋषी कपूर यांनी लागलीच त्याला ऐकवलं. आपल्या खास स्टाईलमध्ये त्याच्याकडे रोखून बघत ऋषी कपूर म्हणाले, ‘सुबह सात बजे दूधवाला और पेपरवाला आता है..अॅक्टर नहीं आते है’. असं म्हणून ते जोरजोरात हसायला लागले. पण त्या सहाय्यक दिग्दर्शकाला मात्र घाम फुटला. शेवटी ऋषी कपूर त्याच्यादवळ गेले आणि त्याला धीर देत म्हणाले, ‘डरने की बात नहीं है. मैंने तो मेरा प्रॉब्लेम बताया और यार तुम डर गए. तुमने तुम्हारा काम किया!’ एवढंच बोलून ते निघून गेले. त्यानंतर कुठे त्या सहाय्यक दिग्दर्शकाने सुटकेचा निश्वास सोडला!

First Published on: April 30, 2020 1:42 PM
Exit mobile version