‘मणिकर्णिका’मध्ये अंकितासोबत दिसणार ‘हा’ मराठी हिरो

‘मणिकर्णिका’मध्ये अंकितासोबत दिसणार ‘हा’ मराठी हिरो

अभिनेत्री कंगना रणौतच्या ‘मणिकर्णिका – द क्वीन ऑफ झांसी’ या चित्रपटाची सध्या सगळीकडे जोरदार चर्चा सुरु आहे. चित्रपटाच्या ट्रेलरपासून ते कंगना रणौतच्या अभिनयापर्यंत आणि चित्रपटातील दमदार डायलॉग्जपासून ते कलाकारांची वेशभूषा आणि त्याच्या भव्य-दिव्य मांडणीपर्यंत सगळ्याच गोष्टींची चर्चा रंगते आहे. यासोबतच चर्चा आहे ती ‘मणिकर्णिका’ चित्रपटातील मराठी कलाकारांची. मणिकर्णिका चित्रपटाचा ट्रेलर पाहताना आपल्याला त्यामध्ये अनेक मराठी कलाकार दिसतात. अतुल कुलकर्णी आणि अंकिता लोखंडे हे दोन मराठी चेहरे चित्रपटात प्रमुख भूमिका साकारत आहेत. काही दिवसांपूर्वीच अंकिता लोखंडे साकारत असलेल्या ‘झलकारी बाई’चा लूक सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यापाठोपाठ आता मराठीतला डॅशिंग अभिनेता वैभव तत्ववादी याचाही ‘मणिकर्णिका’तील लूक समोर आला आहे. वैभवने स्वत: सोशल मीडियावर त्याच्या लूकचा एक फोटो शेअर केला असून, ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होते आहे. वैभव तत्ववादी मणिकर्णिकामध्ये झळकणार असल्याची बातमी अलीकडेच प्रसिद्ध झाली होती. तेव्हापासूनच वैभवच्या चाहत्यांमध्ये त्याच्या लूक्सविषयी उत्सुकता होती.


वैभव शूर योद्ध्याच्या भूमिकेत…

चित्रपटात वैभवने झलकारी बाईच्या (अंकिता लोखंडे) नवऱ्याची भूमिका साकारली आहे. लक्ष्मीबाई यांच्या सैन्यातील शूरवीर योध्दा पूरणसिंग यांच्या भूमिकेत तो झळकणार आहे. याआधीही वैभवने ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटात चिमाजी आप्पा हे पात्र साकारलं होतं. त्यामुळे आता ‘मणिकर्णिका’च्या निमित्ताने वैभव पुन्हा एकदा ऐतिहासीक पात्र साकारणार आहे. चिमाजी म्हणून हिंदी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाची छाप पाडलेला वैभव आता एक ‘शूर योद्धा’ म्हणून काय कमाल दाखवतो हे येणारी वेळच सांगेल.

चित्रपटाची प्रतिक्षा शिगेला

‘मणिकर्णिका’ चित्रपटामध्ये राणी लक्ष्मीबाई यांच्या प्रमुख भूमिकेत कंगना रनौत असून, तिचा लढाऊ बाणा प्रेक्षकांच्या चांगल्याच पसंतीस उतरला आहे. हा चित्रपट पुढील वर्षात २५ जानेवारी २०१८ रोजी प्रदर्शीत होणार आहे. या सिनेमासाठी तिने घोडेस्वारीसोबत तलवारबाजीचे धडे गिरवले आहेत. यामध्ये तिने अनेक स्टंटदेखील केले आहेत. अनेक स्टंट करण्यासाठी तिने बॉडी डबलची मदत घेतलेली नाही. अनेक स्टंट तिने स्वतः केलेले आहेत. युद्धभूमीवरील थरारक प्रसंग, मणिकर्णिका ते राणी लक्ष्मीबाईचा प्रवास आणि देशासाठी प्राण पणाला लावण्याची भावना याचे सुंदर चित्रण या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे.

First Published on: December 23, 2018 1:23 PM
Exit mobile version