नेटफ्लिक्सची ‘She’: लय भारी फेम आदिती पोहनकरची होतेय प्रशंसा

नेटफ्लिक्सची ‘She’: लय भारी फेम आदिती पोहनकरची होतेय प्रशंसा

मराठी अभिनेत्री आदिती पोहणकर

कोरोनामुळे सध्या देश आणि जगभरातील अनेक लोक घरीच क्वारंटाइन झालेले आहेत. अशावेळी अनेकांनी ओटीटी प्लॅटफॉर्मवर आपला वेळ घालवायला सुरुवात केली आहे. नुकतीच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेली She ही वेबसिरीज सर्वांच्या चर्चेचा विषय ठरतेय. या वेबसिरीजमध्ये मराठमोळी अभिनेत्री आदिती पोहनकर मुख्य भुमिकेत असून तिच्या अभिनयाची अनेक चाहते प्रशंसा करत आहेत.

लोकांकडून होत असलेले कौतुक मला आणखी काम करण्यासाठी प्रेरीत करत असल्याची प्रतिक्रिया आदितीने दिली आहे. इम्तियाज अली लिखित आणि दिग्दर्शित या वेबसिरीजमध्ये आदितीने मुंबई पोलीस दलातील एका शिपाई पोलिसाची भूमिका साकारली आहे. भूमिका परदेशी नावाचे हे पात्र थोडेसे भित्रे दाखवले आहे. मात्र वरिष्ठ पोलिसांनी जेव्हा तिच्यावर एक अंडरकव्हर ऑपरेशनची जबाबदारी टाकली, त्यानंतर हे पात्र खुलत जाते.

गली बॉय फेम विजय वर्मा या सिरीजमध्ये खलनायकाचे पात्र रंगवत आहेत. विजय वर्मा हा ड्रग पेडलर असून त्याला पकडण्यासाठी मुंबई पोलीसांकडून एक ट्रॅप लावला जातो आणि तेव्हापासून ही सिरीज तुमच्या मनाचा ठाव घ्यायला सुरुवात करते. आदितने सांगितले की, “भूमिका परदेशी हे पात्र साकारल्यानंतर अभिनयाच्यादृष्टीने मी आणखी सशक्त झाले, असे मला वाटत आहे.”

खरंतर आदितीने रितेश देशमुखच्या लय भारी या सिनेमात काम केले आहे. मात्र त्यानंतर ती मराठी सिनेमांमध्ये फारशी झळकली नव्हती. मात्र इम्तियाज अलीच्या या वेबसिरीजमध्ये तिला संधी मिळाली आणि संधीचे सोने आदितीने केलेले दिसून येते. “आता मी कोणत्याही दिग्दर्शकासमोर बसून आधी मला स्क्रिप्ट द्या, त्यानंतर आपण बोलू असे सांगू शकते इतका आत्मविश्वास मला भूमिकाच्या भुमिकेने दिला असल्याचे आदिती सांगते.

हायवे, जब वी मेट, तमाशा अशा एकापेक्षा एक चित्रपट देणाऱ्या इम्तियाजने She च्या माध्यमातून स्वतः चौकटीबाहेर येण्याचा प्रयत्न केलेला दिसतोय.

First Published on: March 31, 2020 9:59 PM
Exit mobile version