गलवान खोऱ्यातील भारतीय जवानांचे शौर्य येणार मोठ्या पडद्यावर!

गलवान खोऱ्यातील भारतीय जवानांचे शौर्य येणार मोठ्या पडद्यावर!

देशाचे राजकारण आणि बॉलिवूड यांचा अनोखा संबंध आहे. राजकारणात एखादी मोठी उलथापालथ झाली तर बॉलिवूडमध्ये त्यावर चित्रपट आल्याशिवाय राहत नाही. देशात कोणतीही मोठी घटना घडल्यास त्यावर चित्रपटही तयार केले जातात. दरम्यान बॉलिवूड अभिनेता आणि निर्माता अजय देवगण गलवान खोऱ्यातील शहीद झालेल्या २० जवानांच्या शौर्यावर चित्रपट बनवणार आहेत.

चित्रपट समीक्षक तरण आदर्शने सोशल मीडियावर जाहीर केले की, गलवान खोऱ्यात घडलेल्या या घटनेवर अजय देवगण चित्रपट बनवण्याचा विचार करत आहेत. अभिनेता अजय देवगण गलवान खोऱ्यात झालेल्या चकमकीवर चित्रपट बनवणार आहेत. चित्रपटाच्या नावाचा अद्याप विचार केलेला नाही. या चित्रपटात चिनी सैन्यासह जोरदार लढा देणाऱ्या २० भारतीय जवानांची शौर्यगाथा दाखविली जाणार आहे. मात्र या चित्रपटाच्या कलाकारांचादेखील अद्याप विचार केलेला नाही, असे ट्विट तरण आदर्श यांनी केले आहे.

आता गलवान खोऱ्यातील चकमकीवर येणारा अजय देवगणचा चित्रपट आश्चर्यकारक नसणार आहे, कारण अभिनेत्याने असे अनेक चित्रपट केले आहेत जे सत्य घटनांवर आधारित असून ज्यात देशभक्ती जागृत करण्याची शक्ती देखील असते.

दरम्यान गलवान खोऱ्यातील जवानांच्या शौर्यावर चित्रपट येणार असल्याने सगळ्याच चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. यापूर्वी पाकिस्तानविरूद्ध सर्जिकल स्ट्राईकवरही उरी चित्रपट तयार करण्यात आला होता. यात अभिनेता विक्की कौशल दिसला होता. बालाकोट एअरस्ट्राइकवर देखील चित्रपट येणार असल्याच्या चर्चा देखील सुरू आहे.


हेही वाचा- डान्स मास्टर
First Published on: July 4, 2020 4:25 PM
Exit mobile version