अक्षयकुमारला मिळाला अजून एक ‘गोल्ड’

अक्षयकुमारला मिळाला अजून एक ‘गोल्ड’

अभिनेता अक्षय कुमार

अक्षयकुमार सध्या आपल्या ‘गोल्ड’ या चित्रपटाचं यश चाखत आहे. या चित्रपटासाठी सर्व स्तरातून अक्षयकुमारचं कौतुक करण्यात येत आहे. दरम्यान आता अक्षयकुमारसाठी अजून एक खुशखबर आहे, ती म्हणजे अक्षयकुमारला अजून एक ‘गोल्ड’ मिळालं आहे. म्हणजे नक्की काय असाच विचार करत असाल ना? तर अक्षयकुमार हा बॉलीवूडमधील असा एक अभिनेता आहे, ज्यानं इन्स्टाग्रामवर २० मिलियन अर्थात २ कोटी फॉलोअर्सची संख्या पार केली आहे. तो एकमात्र असा बॉलीवूडमधील कलाकार ठरला आहे. आतापर्यंत बऱ्याच अभिनेत्रींना इतके फॉलोअर्स मिळाले आहेत. मात्र अभिनेता म्हणून हा पहिला मान अक्षयकुमारला मिळाला आहे.

अक्षयकुमारनं शेअर केला फोटो

अक्षय कुमारच्या चाहत्यांकडून त्याला एक गोल्ड देण्यात आलं आहे. त्याचाच एक फोटो इन्स्टाग्रामवर अक्षयकुमारनं पोस्ट केला आहे. ‘इन्स्टाग्रामच्या छान लोकांकडून अजून एक ‘गोल्ड’. तुम्हाला सांगताना आनंद होत आहे की, इन्स्टाग्रामवर २० मिलियनचा आकडा पार करणारा मी पहिला अभिनेता बनलो आहे. तुमच्या सर्वांच्या प्रेमासाठी खूप धन्यवाद. सर्वांना खूप प्रेम आणि शुभेच्छा,’ अशी कॅप्शन देत अक्षयकुमारनं आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. दरम्यान १५ ऑगस्टला अक्षयचा ‘गोल्ड’ हा चित्रपट प्रदर्शित झाला असून बऱ्याच प्रेक्षकांना हा चित्रपट आवडत आहे. पहिल्यांदाच मौनी रॉयनं या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं असून आतापर्यंत गोल्डनं चांगली कमाई केली आहे. बुधवारी २५.२५ कोटी कमावून ओपनिंग करणाऱ्या या चित्रपटानं आतापर्यंत ७१.३० कोटी कमावले आहेत. लवकरच हा चित्रपट १०० कोटी क्लबमध्येदेखील दाखल होईल.

 

First Published on: August 20, 2018 8:15 PM
Exit mobile version