पर्सनल फोटो व्हायरल, आलिया भडकली, मुंबई पोलिसांकडे मदत मागितली

पर्सनल फोटो व्हायरल, आलिया भडकली, मुंबई पोलिसांकडे मदत मागितली

आलिया भट्ट तिचे खासगी फोटो पाहून प्रचंड संतापली आहे.

आलिया भट्ट तिचे खासगी फोटो पाहून प्रचंड संतापली आहे. तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर करत आलिया भट्टने एक पोस्ट शेअर करून आपली नाराजी व्यक्त केली आहे. या प्रकरणात तिने मुंबई पोलिसांचीही मदत घेतली आहे. दुसरीकडे, अर्जुन कपूर, अनुष्का शर्मा, जाह्नवी कपूर आणि करण जोहरसह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी आलिया भट्टच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत.

आलिया भट्ट ही तिच्या घरात खिडकीजवळ बसून आराम करत होती. त्याच वेळी तिच्या घरासमोरील इमारतीच्या गच्चीवरून दोन जण कॅमेरा घेऊन उभे असलेले तिला दिसून आले. ते दोघे जण कॅमेरात तिचे काही पर्सनल फोटोज क्लिक करत होते. त्यानंतर सोशल मीडियावर तिला तिचे पर्सनल फोटो व्हायरल झालेले दिसून आले. हे पाहून आलियाचा राग अनावर झाला. हा राग व्यक्त करण्यासाठी तिने एक पोस्ट शेअर केली. तिचे हे पर्सनल फोटोज पापाराझी कल्चरच्या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आले होते. पापाराझी कल्चरला या पोस्टमध्ये टॅग करत त्यांना त्यांची मर्यादा दाखवून दिली. सोबतच मुंबई पोलिसांना सुद्धा तिने या पोस्टमध्ये टॅग करून मदत मागितली. यावर मुंबई पोलिसांनीही रिअॅक्ट होत आलियाशी संपर्क साधला.

वृत्तसंस्था एएनआयने आपल्या ट्विटमध्ये सांगितले की, मुंबई पोलिसांनी या संदर्भात आलिया भट्टशी संपर्क साधला. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी आलिया भट्टला तिचे खासगी फोटो काढणाऱ्या फोटोग्राफर आणि ते प्रकाशित करणाऱ्या ऑनलाइन पोर्टलविरुद्ध तक्रार दाखल करण्यास सांगितले आहे.

या संदर्भात मुंबई पोलीस सतत आलिया भट्टच्या पीआर टीमशी संपर्कात आहेत. आलिया भट्टच्या आधी अनुष्का शर्मानेही मुलगी वामिकाची फोटो पोस्ट केल्याबद्दल फोटोग्राफर्सना फटकारलं होतं.

काय लिहिलंय आलियाने तिच्या पोस्टमध्ये?
आलियाने तिच्या इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केलीय. यात तिने लिहिलं की, “तुम्ही मस्करी करत आहात का? मी माझ्या घरी आहे आणि नेहमीप्रमाणे मी माझ्या लिव्हींग रूममध्ये बसले होते. तेव्हा मला वाटले की कोणीतरी मला पाहत आहे. मी वर पाहिले तर माझ्या शेजारच्या इमारतीच्या गच्चीवर दोन लोक चढले होते आणि त्यांचा कॅमेरा माझ्या दिशेने होता. हे कोणत्या दृष्टीने योग्य आहे? आणि तुम्हाला यासाठी परवानगी कोणी दिली? ही एखाद्याच्या वैयक्तिक आयुष्यात पूर्णपणे घुसखोरी आहे. एक मर्यादा असते जी तुम्ही ओलांडू नये, पण आज ती मर्यादाही तुम्ही ओलांडली आहे.”

First Published on: February 22, 2023 4:50 PM
Exit mobile version