आपल्या आवडत्या सुपरस्टारची स्वाक्षरी घेण्यासाठी बिग बींना लागली ४६ वर्ष

आपल्या आवडत्या सुपरस्टारची स्वाक्षरी घेण्यासाठी बिग बींना लागली ४६ वर्ष

अमिताभ बच्चन

सिनेकलाकारांची क्रेझ जशी सर्वसामान्यांना असते तशी ती कलाकारांनाही इतर स्टारबाबत असते. याबाबत सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी एक खुलासा केला असून आपल्या आवडत्या सुपरस्टारची स्वाक्षरी घेण्यासाठी आपल्याला तब्बल ४६ वर्ष वाट पहावी लागली असल्याचे त्यांनी म्हटले आहेत. हा सुपरस्टार दुसरा तिसरा कोणी नसून हिंदी सिनेसृष्टीतील ट्रॅजेडी किंग दिपील कुमार आहेत. गेल्या चार दशकांहून अधिक काळ सिनेमांमध्ये काम करणाऱ्या अमिताभ बच्चन किशोर वयापासूनच दिलीप कुमार यांचे चाहते आहेत. मात्र त्यांची स्वाक्षरी घेण्याचे भाग्य त्यांना २००५ साली लाभले असल्याचे त्यांनी आपल्या ब्लॉगमध्ये नमूद केले आहे.

हेही वाचा – नैसर्गिकरित्या मासिक पाळी पुढे ढकलण्यासाठी करा ‘हे’ उपाय

अनेकदा स्वाक्षरी घेण्याची संधी हुकली 

काही वर्षांपूर्वी जेव्हा बिग बी आपले आई-वडिल तेजी आणि हरिवंश राय बच्चन यांच्यासोबत मुंबईत आले असताना त्याच हॉटेलमध्ये थांबले होते. तिथे दिलीप कुमारही होते. मात्र दिलीप कुमार यांच्या अवतीभवती असलेल्या चाहत्यांच्या घोळक्यातून जाऊन त्यांची स्वाक्षरी घेणे अमिताभ यांना शक्य झाले नाही. त्यानंतर काही वर्ष उलटली आणि पुन्हा एकदा बिग बी आणि दिलीप कुमार यांच्या भेटीचा योग आला. माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी आयोजित केलेल्या पार्टीमध्ये दिलीप कुमार यांच्यासह राज कपूर, देव आनंद असे सिनेसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकार उपस्थित होते. मात्र त्याहीवेळी त्यांना स्वाक्षरी घेणे शक्य झाले नाही.

२००५ साली आला योग 

अखेर २००५ साली हा योग जुळून आला. अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री राणी मुखर्जी यांच्या ब्लॅक चित्रपटाच्या प्रीमिअरकरता दिलीप कुमार आणि त्यांची पत्नी सायरा बानो यांनी उपस्थिती दर्शवली होती. बिग बींचा अभिनय पाहून दिलीप कुमार भारावून गेले होते. तसेच बिग बींचे कौतुक करणारे एक पत्र त्यांनी लिहीले असून त्यावर आपली स्वाक्षरी केली होती. अशा प्रकारे आपल्या आवडत्या सुपरस्टारची स्वाक्षरी अमिताभ बच्चन यांना मिळाली होती.

First Published on: June 2, 2020 8:52 AM
Exit mobile version