बिग बींच्या ‘या’ मराठी चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात

बिग बींच्या ‘या’ मराठी चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात

बिग बी अमिताभ बच्चन यांच्या मराठी चित्रपटाची उत्सुकता आता प्रेक्षकांमध्ये आहे. मराठी चित्रपटसृष्टीत होणारे बदल, हाताळले जाणारे नाविण्यपूर्ण विषय यामुळे बॉलिवूडकरांमध्येही मराठी चित्रपटांची क्रेझ वाढली आहे. असाच काहीसा वेगळ्या विषयावर आधारीत ‘AB आणि CD’ हा चित्रपटाचा मुहूर्त पार पडला. ‘AB आणि CD’ या चित्रपटाची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आहे कारण या चित्रपटात खुद्द बिग बी दिसणार आहेत. या सिनेमाच्या निमित्ताने तब्बल २५ वर्षांनी बिग बी मराठीचित्रपटात काम करणार आहेत.

नुकताच, या सिनेमाचा मुहुर्त सोहळा माननीय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थितीत पार पडला. त्यांच्यासह विक्रम गोखले, सागर तळाशिलकर, सीमा देशमुख, लोकेश गुप्ते, जयंत सावरकर, सुनिल गोडबोले, अरुण पटवर्धन, प्रशांत गोखले, सुभाष खुंडे, मुक्ता पटवर्धन, अक्षय टंकसाळे, सायली संजीव आणि साक्षी सतिश हे देखील यावेळी उपस्थित होते.

डिजीटल मिडीयावर नेहमीच नवनवीन उपक्रम घेऊन येणा-या प्लॅनेट मराठी आणि अक्षय बर्दापूरकर यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे मिलिंद लेले दिग्दर्शित ‘AB आणि CD’ या सिनेमात अमिताभ बच्चन, विक्रम गोखले, सुबोध भावे, सायली संजीव आणि अक्षय टंकसाळे यांच्या भूमिका आहेत. अमिताभ बच्चन यामध्ये कॅमिओ रोल साकारणार असून विक्रम गोखले यांच्या मित्राच्या भूमिकेत दिसतील. सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे आणि लवकरच ‘AB आणि CD’ प्रेक्षकांच्या भेटीस येईल.

First Published on: May 22, 2019 1:20 PM
Exit mobile version