हे आहेत २०१८ चे ‘संगीत नाटक अकादमी पुरस्कारा’चे मानकरी

हे आहेत २०१८ चे ‘संगीत नाटक अकादमी पुरस्कारा’चे मानकरी

संगीत नाटक अकादमी पुरस्कार

प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर, नाटककार राजीव नाईक आणि प्रसिद्ध अभिनेत्री सुहास जोशी या महाराष्ट्रातील कलाकारांना वर्ष २०१८चा ‘संगीत नाटक अकादमी पुरस्कार’ जाहीर झाला आहे. शास्त्रीय गायक समीहन कशाळकर यांची ‘उस्ताद बिस्मील्ला खाँ युवा पुरस्कारा’साठी निवड झाली आहे. तर, तबला नवाज झाकीर हुसेन यांना ‘अकादमी रत्न’ ही मानाची फेलोशीप जाहीर झाली आहे.

कला क्षेत्रात सर्वोच्च समजल्या जाणाऱ्या संगीत नाटक पुरस्कारांची आज घोषणा करण्यात आली आहे. दरवर्षी एका शानदार सोहळ्यात राष्ट्रपतींच्या हस्ते संगीत नाटक अकादमी पुरस्कार आणि फेलोशीप प्रदान करण्यात येते. संगीत, नृत्य, नाट्य आणि लेाककला क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान देणाऱ्या कलाकारांचा संगीत नाटक अकादमीतर्फे गौरव केला जातो. ‘वर्ष २०१८च्या संगीत नाटक अकादमी पुरस्कारासाठी’ देशभरातील ४० कलाकारांची तर ‘उस्ताद बिस्मील्ला खाँ’ युवा पुरस्कारासाठी ३२ कलाकारांची निवड करण्यात आली आहे. चार कलाकारांना उल्लेखनीय योगदानासाठी ‘अकादमी रत्न’ ही फेलोशीप जाहीर झाली आहे.

‘संगीत नाटक अकादमी पुरस्कार’

सुरेश वाडकर यांच्या सुगम संगीतातील योगदानाची दखल ‘मेघारे मेघारे’, ‘चप्पा चप्पा चरखा चले’, ‘ए जिंदगी…’ यांसारख्या अनेक सुपरहिट गाण्यामुळे चाहत्यांच्या मनावार गारुड करणारे प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांना सुगम संगीतातील योगदानासाठी ‘संगीत नाटक अकादमी पुरस्कार’ जाहीर झाला आहे. सुरेश वाडकर यांनी अनेक मराठी व हिंदी चित्रपटांतून पार्श्वगायन केले आहे. यासोबतच त्यांनी भोजपुरी, कोकणी, मल्याळी, गुजराती, बंगाली, सिंधी चित्रपटांतूनही आणि उर्दू भाषेतूनही गाणी गायली आहेत. नाट्य क्षेत्रातील योगदानासाठी प्रसिद्ध नाटककार राजीव नाईक यांनासुद्धा पुरस्कार जाहीर झाला आहे. नाटककार आणि कथाकार म्हणून राजीव नाईक यांनी मराठी साहित्यात वेगळे स्थान निर्माण केले आहे. नाईक यांनी लिहिलेली ‘अनाहत’, ‘वांधा’, ‘अखेरचं पर्व’, ‘साठेंचं काय करायचं’ आदी नाटकं प्रसिद्ध आहेत. राजीव नाईक लिखित ‘नाटकातलं मिथक’, ‘खेळ नाटकाचा’, ‘नाटकातला काळ आणि अवकाश’,’न नाटकाचा’ आदी पुस्तके नाटकाच्या अभ्यासकांसाठी उपयुक्त ठरली आहेत. त्याचप्रमाणे ज्येष्ठ अभिनेत्री सुहाश जोशी यांनासुद्धा नाट्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी ‘संगीत नाटक अकादमी पुरस्कार’ जाहीर झाला आहे. अनेक नाटकं, चित्रपट आणि मालिकांतून आपल्या अभिनयाने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. १ लाख रूपये रोख, ताम्रपत्र आणि शाल असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

हेही वाचा – ‘वॉर’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

तबला नवाज झाकीर हुसेन यांना ‘अकादमी रत्न पुरस्कार’

अवघ्या जगाला तबल्याच्या तालात बांधाणारे भारतीय शास्त्रीय संगीताला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणारे तबला नवाज उस्ताद झाकीर हुसेन यांना यावर्षी संगीत नाटक अकादमीची मानाची ‘अकादमी रत्न’ फेलोशिप जाहीर झाली आहे. ३ लाख रूपये रोख, ताम्रपत्र आणि शाल असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

समीहन कशाळकर यांना ‘युवा पुरस्कार’

शास्त्रीय संगीत क्षेत्रातील योगदानासाठी ग्वाल्हेर घराण्याचे प्रसिद्ध गायक व पंडीत उल्हास कशाळकर यांचे पूत्र समीहन कशाळकर यांना २०१८चा ‘उस्ताद बिस्मील्ला खाँ’ युवा पुरस्कार जाहीर झाला आहे. २५ हजार रूपये रोख, ताम्रपत्र आणि शाल असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

First Published on: July 16, 2019 9:16 PM
Exit mobile version