अस्वस्थ भवतालचा शोध

अस्वस्थ भवतालचा शोध

Mrinal Sen

माणसांचं जगणं शोधण्याची माझी गरज संपलेली नाही, ती संपणारही नाही. कारण त्याला अंत नाही. कुठलासा असा एक मैलाचा दगड इथं मला दिसत नाही, जिथं मी थांबेन, दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाल्यावर मृणाल सेन यांनी उच्चारलेले हे शब्द त्यांच्या अनेकांगी व्यक्तीमत्वाचा एक पैलू दर्शवतात. माणसाला माणूस सापडतो म्हणजे नक्की काय होतं. आपलं जगणं, समाज, राजकारण हे माणसापासून वेगळं असतं का, याचा शोध मी घेतोय. असं ते म्हणायचे, वयाच्या ऐंशीव्या वर्षीही त्यांचा हा शोध थांबलेला नव्हता. पडद्यावर सर्व थरातल्या माणसांचं जे दिसतं जगणं तसंच असतं का? ते तस्सच असायला हवं. आपण कोण असतो त्यात सिनेमॅटीक लिबर्टीच्या नावाखाली दखल देणारे, असं परखड मत सेन यांनी मांडलं. हा काळ तो होता ज्या काळात हिंदी पडदा व्यावसायिक सिनेमांनी पुरता ताब्यात घेतला होता. चित्रपट हा व्यावसाय आहे. गुंतवणुकीच्या दृष्टीने निर्मात्याने व्यावसायिक मूल्य लक्षात घेऊनतच तो करायला हवा. त्याला माणसांच्या वास्तववादी जगण्याच्या मूल्यांचा अडसर तयार होता कामा नये.

चित्रपटांच्या निर्मितीमूल्याबाबत असा व्यावसायिक दृष्टीकोन हिंदी सिनेमाचा आज आहे तसा तो त्याकाळाही होताच. त्याला नाकारता येणं कुठल्याही काळाला कधीही शक्य नसतं, पण सेन हे काळात बांधले जाणारे नव्हते. एकीकडे हे व्यावसायिक निर्मितीमूल्य असताना मानवी जगण्याला खर्‍याखुर्‍या समांतर जाणार्‍या चित्रपटांनी जवळपास ५० सिनेमे आणि पाच दशकं आणि व्यापून टाकणं हे मृणाल सेन यांच्या मानवी जगण्याच्या शोधामुळेच शक्य झालं. चकाकत्या सिनेसृष्टीतील व्यावसायिक सिनेमांचं आर्थिक यश त्यांना भुरळ घालू शकलं नाही, त्यामागे त्यांच्या या शोधक वृत्तीचा मोठा वाटा होता. स्वतःच्या कलाकृतींसोबत कुठलाही व्यावसायिक तडजोड करायला ते कधीही तयार झाले नाहीत. व्यावसायिक सिनेमांची व्यवहारी भाषा त्यांना समजत नव्हती असं नाही, मात्र यात माणसांच्या समाज नावाच्या समुदायातली खरीखुरी भाषा येत नाही. सेन यांनी चित्रपटांना अशी भाषा पुन्हा प्रदान केली.

बंगालची फाळणीच्या घटनेने समाजासोबतच मानवी मनांचीही फाळणी झाली होती. या घटनेचा खोल, गडद परिणाम सेन यांच्यावर झालाच. त्यातून पुढे कम्युनिस्ट विचारांनी त्यांनी सामाजिक आणि राजकीय घटनांमागील तथ्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. अशा घटनांमुळे समाजावर कसा, कोणता परिणाम होतो. हे ते तटस्थपणे पाहत होते. आता त्यांच्या चित्रपटांत त्याचं प्रतिबिंब उमटणार होतंच. यात शोषित, दुर्लक्षित किंवा पिडीतांच्या वेदनेचा शोध घेण्याचा जाणीवपूर्वक केलेला प्रयत्न नव्हता तर तो त्यांच्या सहज जगण्याचा भाग होता. भवतालंच वास्तव जे जसं आहे ते तसंच पडद्यावर यायला हवं. याबाबत केली जाणारी व्यावसायिक तडजोड त्यांना मान्य नव्हती. समाजात विद्रोह असतो, वेदना असते, शोषण असते, पिळवणूक असते, आंक्रदन असते, एकाच्या श्रमावर मजा मारणारा दुसराही असतो. हे दुसरे कोण असतात ? माणसंच तीही यात स्त्री पुरुष असा भेद नसतो. सरकार, समाज, भांडवलदार, वतनदार, धर्ममार्तंड, अधिकारी किंवा राजकीय नेतेही असू शकतात. त्यांना जाणीवपूर्वक खलनायकी ढंगात पेश करण्याचा प्रयत्न त्यांनी कधी केला नाही. त्यासाठी सेन यांच्याकडून प्रसंगी शूटींगच्या ठिकाणी व्यक्तीरेखेच्या संवादात, पटकथेत गरज पडल्यास संपूर्ण संहितेत बदल करण्यात येत असे. आता व्यावसायिक निर्मितीमूल्यांचा विचार करणार्‍या निर्मांत्यासोबत त्यांचे खटके उडत. मात्र, मी काय करायला हवं, हे मी ठरवणार ? असा ठामपणा त्यांच्यात होता तो त्यांच्या प्रत्येक कलाकृतीत जशाच्या तसाच उतरला.

बंगाल आणि कोलकात्यातील राजकारणावर ७०, ८० च्या दशकात नक्षलवादी चळवळीचा प्रभाव होता. इतिहासाच्या फाळणीतून आलेलं सामाजिक दुभंगलेपण बंगाली जनता अनुभवत होती. या दुभंगलेपणातून स्वतः विस्थापितांची वेदना सेन यांनी अनुभवली होती. सेन यांनी तत्कालीन वर्तमानातला हा परिणाम आपल्या कॅमेर्‍यात अचूक टिपला. बंगालमध्ये बाईशेष राबोन या बंगाली चित्रपटातून त्यांनी या वेदनेला वाट करून दिली. ३० लाख लोकांचा बळी घेणारा बंगालमधला भीषण दुष्काळ निसर्गापेक्षा हा इंग्रजांच्या कुटील नितीचा परिणाम असल्याचं त्यांनी आपल्या कलाकृतीतून दाखवून दिलं. पल्लेदार टाळ्यापिटू संवाद, रोमँटीसिझम, तद्दन व्यावसायिक पटकथेची मूल्ये त्यांनी स्वीकारली नाहीत. जे मनाला पटेल तेच त्यांनी स्वीकारलं आणि चित्रपटातून दाखवलं. व्यावसायिक चित्रपटांच्या दावणीला त्यांनी स्वतःला बांधून घेतलं नव्हतं तरी बर्लिन, कान्स, शिकागो अशा अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपटमहोत्सवात त्यांच्या चित्रपटांची होणारी चर्चा ही नेहमीची बाब झाली. या चित्रपटांच्या कौतूकसोहळ्यातही सेन रमले नाहीत. तिथंही त्यांनी अनेकदा फेस्टिव्हलच्या ज्युरींच्या चित्रपट समजून घेण्याच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं. त्यांच्या अभिव्यक्तीचा आदर करतानाच त्यांनी चित्रपट समजण्यासाठी किंवा आकलन होण्यासाठी ज्युरींनी आपले पूर्वग्रह बाजूला ठेवावेत, आपली सामाजिक धारणा, उंची, मते बाजूला ठेवून कुठल्याही परिणामांच्या कक्षेत न येता अगदी निर्वात पोकळीत बसून कलाकृतींचं मूल्यमापन करावं, असं त्यांच मत असे. कलाकृतीचा कुठलाही ठोकताळा नाही, परिमाण नाही ज्यातून त्याचं मूल्यमापन करता येईल, असे ते म्हणत. मी तीन ते चार पिढ्यांसोबत काम केलंय, या पिढ्यांच्या तत्कालीन वर्तमानातल्या परिणामांचं, जगण्याचं मूल्यमापन मी कसं करू शकतो ? हा मला पडलेला प्रश्न आहे मात्र त्याचं समाधानही आहे. असे सेन म्हणत.

सेन म्हणतात, आपल्या धारणा सिनेमॅटीक असू शकतात. पण भवतालचं जग असं नाही. असं त्यांना वाटे. मला सिनेमा पुरेसा समजलेला नाही, आजही मी तो समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. त्यासाठी एकूणच सिनेकलाकृतींवर आधारलेल्या पुस्तकांचा अभ्यास करून मी फारफारतर सिनेमाचं बेसिक शिकू शकेन, पण कलाकृतीचा शोध कधीही संपणारा नाही, असं सेन यांच मत होतं. मी ज्यावेळी माझ्याच चित्रपटकाळांत डोकावून पाहतो. त्यावेळी मी समाधानी नसतो. जे मिळालंय, लौकिक अर्थाने नाही, पण अजूनही बरंच काही शोधायचं, सापडायचं बाकी आहे हेच मला दिसतं. जगण्याचे, कलाकृतीचे, घटनांचे कुठलेही निष्कर्ष नसतात. ते परिणाम असतात. एका परिणामातून दुसरा परिणाम होतो. या परिणामांच्या कारणांचा शोध मी घेत राहाणार आहे. त्यामुळे मला कधीच निवृत्ती घेता येणार नाही. त्यामुळेच हा मनातला कोलाहल भवतालच्या परिस्थितीमुळे कायम असल्याने कदाचित तुम्हाला मी गोंधळलेला वाटेन, पण त्याला माझा नाईलाज आहे. मला वेढून असलेल्या भवताली असलेला हा गोंधळ जोपर्यंत माझ्या मनात आहे तोपर्यंत मी जिवंत आहे, असं मला वाटतं…

First Published on: December 31, 2018 5:55 AM
Exit mobile version