अशोक सराफ आणि पद्मिनी कोल्हापुरेचा एकत्र ‘प्रवास’

अशोक सराफ आणि पद्मिनी कोल्हापुरेचा एकत्र ‘प्रवास’

प्रवास मराठी चित्रपट

प्रवास करणं बहुतेकांना आवडतं. हा ‘प्रवास’ आपल्या प्रत्येकाच्याच जगण्याचा एक अविभाज्य भाग असतो. जन्मापासून सुरु झालेला हा ‘प्रवास’ प्रत्येक वळणावर आपल्याला काही ना काही नवं शिकवत असतो आणि सोबत अनुभवसंपन्न करत असतो. आयुष्याच्या प्रवासाचा एक आगळावेगळा दृष्टिकोन दाखविणाऱ्या ‘प्रवास’ या आगामी मराठी चित्रपटाचा मुहूर्त नुकताच दिमाखात संपन्न झाला. प्रवास या विषयावर जगभरातल्या विविध भाषांमध्ये दर्जेदार चित्रपट येऊन गेलेत. काही चित्रपट आजही लोकांच्या मनात घर करुन बसलेत. ‘इन टू दी वर्ल्ड’, ‘दी मोटारसायकल डायरीज’, ‘दी दार्जिलिंग लिमिटेड’, ‘दी वे’, ‘वाईल्ड’ ही त्यापैकीच काही उत्तम उदाहरणे आहेत. हिंदीतही जिंदगी ना मिलेगी दोबारा, पिकू, करीब करीब सिंगल हिदेखील चांगली उदाहरणे आहेत. आता असाच प्रयोग मराठीतही होताना पहायला मिळणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि अभिनेत्री पद्मिनी कोल्हापूरे अशी वेगळी जोडी पहिल्यांदाच प्रेक्षकांसमोर येणार आहे. त्याचबरोबर या चित्रपटात विक्रम गोखले, शशांक उदापूरकर अशी तगडी स्टारकास्ट आहे. त्यांच्या जोडीला हिंदीत नावाजलेले अभिनेते रजत कपूरही आपल्याला पहायला मिळणार आहेत.

अशोक सराफ म्हणतात…

५० वर्षाच्या कारकिर्दीमध्ये एका वेगळ्या प्रकारची भूमिका करायला मिळत असल्याचा आनंद व्यक्त करतानाच हा ‘प्रवास’ प्रेक्षकांनाही एक वेगळी अनुभूती देईल, असा विश्वास अभिनेते अशोक सराफ यांनी व्यक्त केला. ‘प्रवास’ च्या निमित्ताने मोठ्या कालावधीनंतर मराठीत काम करायला मिळाल्याचा आनंद अभिनेत्री पद्मिनी कोल्हापूरे यांनी व्यक्त केला. ‘जे शेष आहे ते विशेष आहे’ असं सांगणारा हा ‘प्रवास’ माझ्यासाठी ही तितकाच महत्त्वपूर्ण असून माझ्या या दिग्दर्शकीय प्रवासात दिग्ग्जांची मला मिळालेली साथ मला बरंच काही शिकवून जाईल, असा विश्वास दिग्दर्शक शशांक उदापूरकर व्यक्त करतात.

या चित्रपटाचे चित्रीकरण लवकरच सुरु होणार आहे. ओम छंगानी फिल्म्स निर्मित ‘प्रवास’ या चित्रपटाच्या लेखनाची व दिग्दर्शनाची जबाबदारी शशांक उदापूरकर यांनी सांभाळली आहे. हिंदीतील सुप्रसिद्ध संगीतकार जोडी सलीम सुलेमान यांचा मराठी चित्रपटसृष्टीतला ‘प्रवास’ या निमित्ताने सुरु झाला आहे. गीतलेखन गुरु ठाकूर यांचे आहे.

First Published on: October 16, 2018 8:10 PM
Exit mobile version