‘तो’ चित्रपट न केल्याची अशोक सराफ यांना खंत

‘तो’ चित्रपट न केल्याची अशोक सराफ यांना खंत

ज्येष्ठ अभिनेता अशोक सराफ (सौजन्य-झी टॉकिज)

लेखक-साहित्यिक पु. ल. देशपांडे आणि दिग्दर्शक जब्बार पटेल यांच्या अजरामर कलाकृती म्हणजे ‘एक होता विदूषक’ हा मराठी चित्रपट. या १९९२ साली आलेल्या या चित्रपटाला विविध पुरस्काराने गौरवण्यात आले होते. या चित्रपटातील अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे यांची आबूराव ही भूमिका प्रेक्षक-समीक्षकांच्या पसंतीस पडली होती. मात्र ही भूमिका आधी ज्येष्ठ अभिनेता अशोक सराफ यांनी ऑफर करण्यात आली होती. परंतू त्यांनी ती नाकारली. याबाबतची खंत स्वतः अशोक सराफ यांनी तब्बल २६ वर्षानंतर व्यक्त केली आहे. पु. ल. परिवार आणि आशय सांस्कृतिकच्यावतीने आयोजित पुलोत्सवातील चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन ज्येष्ठ अभिनेता अशोक सराफ यांच्या हस्ते रविवार, १८ नोव्हेंबर रोजी करण्यात आले. त्यावेळी त्यांनी ही खदखद व्यक्त केली.

काय म्हणाले अशोक सराफ

‘पु. ल. देशपांडे यांच्या एक होता विदूषक या चित्रपटाविषयी आपणापैंकी बहुतेकांना माहीतच असेल. एक अतिशय चांगली कलाकृती असणाऱ्या या चित्रपटात खरे तर मुख्य भूमिका मी साकारणार होतो. पण काही कारणांनी त्यावेळी मला हा चित्रपट करता आला नाही. पुढे तो लक्ष्याने केला. त्याने त्याची भूमिका अतिशय उत्तम साकारली. पण एवढा चांगला चित्रपट आणि विशेषतः पुलंच्या लेखणीतून साकारलेला हा चित्रपट आपल्याला करता आला नाही, ही सुवर्णसंधी हुकल्याची रुखरुख मला पुढे नेहमीच वाटत राहिली.’

विविध पुरस्काराने गौरवण्यात आले

तमाशा, लोकनाट्य या विषयावर आधारीत एक होता विदूषक चित्रपटाक लक्ष्मीकांत बेर्डेसह नीळू फुले, मधू अंबिये, मोहन आगाशे, वर्षा उसगांवकर, दिलीप प्रभावळकर, तुषार दळवी, सयाजी शिंदे यांच्याही महत्त्वाच्या भूमिका होत्या. चित्रपटाची निर्मिती रवी गुप्ता आणि रवी मलिक यांनी केली. लक्ष्मीकांत बेर्डे यांचा विदूषकाच्या मागील धीर गंभीर चेहरा त्यांनी उत्तमरित्या साकारला. जब्बार पटेल यांच दिग्दर्शन लाभलेल्या चित्रपटाला दोन राष्ट्रीय पुरस्कार तर पु. ल. देशपांडे यांना लेखनासाठी, जब्बार पटेल यांना पटकथेसाठी आणि विविध विभागांतील पुरस्कारांसाठी गौरवण्यात आले होते.

First Published on: November 19, 2018 1:23 PM
Exit mobile version