मुलाला मिळवण्यासाठी ‘बाबा’ ची धडपड

मुलाला मिळवण्यासाठी ‘बाबा’ ची धडपड

अभिनेता संजय दत्तची पहिली निर्मीती असलेला बाबा या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. नुकताच संजय दत्तच्या हस्ते या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे.

मूक बधिर जोडप्याची आणि त्यांच्या आठ वर्षाच्या मुलाची शंकरची कथा चित्रपटात मांडण्यात आली आहे. छोट्याशा गावात शकंर त्याच्या आई-बाबांसोबत राहत असतो. त्याचे आईवडिल बोलू शकत नाहीत मात्र तरीही ते त्यांच्या छोट्याशा विश्वात खूश असतात. अचानक शहरातील एक दाम्पत्य शंकरवर त्यांचा हक्क सांगते. तिथूनच पुढं शंकरच्या आई-वडिलांचा लढा सुरू होतो. आपल्या मुलाला मिळवण्यासाठी बाबानं केलेला संघर्ष ट्रेलरमध्ये पाहायला मिळतोय.

गुरूनाथ सुभेदारनंतर अशा पध्दतीची भुमिका करायला मिळणं हे माझ्यासाठी भाग्याचं आहे. या चित्रपटाचा विषय प्रत्येकाच्या खूप जवळचा आहे. चित्रपटात सगळेच मोठे कलाकार आहे. त्यांच्याबरोबर काम करताना खूप काही शिकायला मिळालं.- अभिजीत खांडकेकर, अभिनेता

अशा विषयाचा चित्रपट करायला मिळणं यापेक्षा मोठा आनंद कलाकारासाठी नाही. माझा पहिला चित्रपट असा आहे की ज्यात मला एकही वाक्य नाहीये. ही भाषा शिकण्यासाठी आमचे वर्कशॉप झाले. एकूणच चित्रपटातून खूप काही शिकायला मिळालं.- नंदिता पाटकर, अभिनेत्री

चित्रपटात दीपक डोब्रीयाल, नंदिता पाटकर, स्पृहा जोशी, अभिजित खांडकेकर, चित्तरंजन गिरी, जयवंत वाडकर, शैलेश दातार, जयंत गाडेकर आणि बालकलाकार आर्यन मेंघजी अशी मोठी स्टारकास्ट आहे. तर, चित्रपटाचं दिग्दर्शन राज. आर. गुप्ता यांनी केलंय. २ ऑगस्टला हा सिनेमा प्रदर्शित होतोय.

First Published on: July 18, 2019 1:39 PM
Exit mobile version