ईशा अंबानीच्या संगीत सोहळ्यात गाणार बियोन्से

ईशा अंबानीच्या संगीत सोहळ्यात गाणार बियोन्से

पॉपस्टार बियोन्से

मागच्याच महिन्यात ईशा अंबानी आणि आनंद पिरामलचा इटलीतील लेक कोमोमध्ये थाटामाटात साखरपुडा झाला. तीन दिवस रंगलेल्या या साखरपुड्याच्या सोहळ्यात आपल्या लाडक्या लेकीसाठी अंबानी यांनी ए. आर. रेहमान, शान यांसारख्या दिग्गजांचा संगीत सोहळा ठेवला होता. या सोहळ्यात बर्‍याच मान्यवरांनी हजेरी लावली होती. साखरपुडा इतका मोठा तर लग्न किती थाटामाटात असेल याचा विचारही सर्वसामान्यांना कदाचित करता येणार नाही. दरम्यान ईशा आणि आनंदचे लग्न उदयपूरमध्ये अगदी शाही पद्धतीने १० डिसेंबरला होणार असून ८ पासूनच मेहंदी आणि संगीत ठेवण्यात आले आहे.

शाही लग्नामध्ये सर्वात मोठं आकर्षण

या शाही लग्नामध्ये सर्वात मोठं आकर्षण ठरणार आहे ती म्हणजे पॉपस्टार बियोन्से. ईशा अंबानी ही बियोन्सेची खूप मोठी चाहती असल्यामुळे मुकेश अंबानी यांनी तिचा विवाह अविस्मरणीय करण्यासाठी तिच्या संगीत पार्टीत गाण्यासाठी बियोन्सेला आमंत्रण दिल्याचे डीएनए या इंग्रजी वृत्तपत्राने सांगितले आहे. इतकंच नाही तर बियोन्से पहिल्यांदाच भारतात येऊन अशा तर्‍हेचा परफॉर्मन्स करणार असल्याचेही म्हटले जात आहे. एखाद्या खासगी शो साठी बियोन्से साधारण २ मिलियन डॉलर इतके मानधन घेते. त्यामुळे आता ईशाच्या लग्नासाठी बियोन्सेने किती मानधन घेतले असेल याचा अंदाज लावणेही कदाचित कठीण आहे.

डिसेंबरमध्ये करणार ईशा लग्न 

ईशा आणि आनंद बियोन्से येणार असल्यामुळे खूपच खूष असल्याचेही सांगण्यात आले आहे. ईशाच्या लग्नामध्ये बॉलीवूडमधील मोठे स्टार असणार याची सर्वांनाच खात्री आहे. मात्र आता या लग्नामध्ये हॉलीवूडमधील स्टार्सदेखील येण्याची शक्यता बियोन्सेच्या निमित्ताने दिसून येते आहे. ईशाने आपलं शिक्षण स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीमधून पूर्ण केलं असून व्यावसायिक अजय पिरामल यांचा मुलगा आनंद पिरामल याच्याबरोबर ती लग्न करणार आहे. महाबळेश्वरमधील एका मंदिरात आनंदने ईशाला प्रपोज केल्यानंतर नुकताच त्यांनी एक महिन्यापूर्वी इटलीमध्ये साखरपुडा केला असून डिसेंबरमध्ये ईशा आणि आनंद लग्न करत आहेत.

First Published on: October 23, 2018 5:38 PM
Exit mobile version