अखेर ‘पीएम नरेंद्र मोदी’ प्रदर्शित

अखेर ‘पीएम नरेंद्र मोदी’ प्रदर्शित

पंतप्रधानांच्या जीवनावर आधारित बायोपिक अखेर प्रदर्शित

१७ व्या लोकसभा निवडणुकीत विरोधकांचा दारुण पराभव केल्याने नरेंद्र मोदी दुसर्‍यांदा भारताच्या पंतप्रधानपदी आरूढ होणार आहेत. या विजयामुळे भाजप आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. हाच उत्साह आजपासून द्विगुणित होणार आहे. कारण शुक्रवारी पंतप्रधानांच्या आयुष्यावर आधारित ‘पीएम नरेंद्र मोदी’ चित्रपट प्रदर्शित झाला. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या चाहत्यांना पंतप्रधानांच्या वैयक्तिक, राजकीय जीवनातील चढ-उतार या चित्रपटाद्वारे अनुभवता येणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावर आधारित दिग्दर्शक ओमंग कुमार ‘पीएम नरेंद्र मोदी’ या नावाचा बायोपिक घेऊन आला आहे. हा बायोपिक सर्वप्रथम ११ तारखेला म्हणजेच लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रदर्शित होणार होता. मात्र, ‘पीएम नरेंद्र मोदी’ या चित्रपटाला निवडणूक आयोगाने निवडणूक होईपर्यंत बंदी घातली होती.

बायोपिक विषयी थोडक्यात…

अभिनेता विवेक ओबेरॉय यामध्ये मोदींची भूमिका साकारत आहे. ‘मेरी कॉम’ आणि ‘सरबजीत’ यांसारख्या बायोपिकचे दिग्दर्शन करणार्‍या ओमंग कुमारने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. यापूर्वी दिग्दर्शक ओमंगचे दोन बायोपिक आले आहेत. ‘मेरी कॉम’ आणि ‘सरबजीत’ हे ते बायोपिक. मात्र, त्या बायोपिकच्या तुलनेत ‘पीएम नरेंद्र मोदी’ चित्रपट काही प्रमाणात मागे पडतो. चित्रपटाची पटकथा, दिग्दर्शन, सिनेमॅटोग्राफी यामध्ये कमतरता जाणवते. तसेच मोदींच्या जीवनातील वादविवाद आणि चढउतार यांचं संतुलन चित्रपटात राखता आलं नाही. विवेक ओबेरॉयने मोदींची भूमिका ठीकठाक साकारली आहे. चित्रपटाच्या उत्तरार्धात मोदींची रॅली आणि त्यांचा पंतप्रधान होण्याच्या आधीचा काळ दाखवण्यात आला आहे. यादरम्यान मोदींच्या भाषणाची दृश्ये व्यवस्थित चित्रित करण्यात आली आहेत. मोदींचा अंदाज विवेकने प्रभावीपणे कॉपी केला आहे.

First Published on: May 25, 2019 9:04 AM
Exit mobile version