सूर्यास्तानंतरचा रक्तरंजित तमाशा

सूर्यास्तानंतरचा रक्तरंजित तमाशा

Dusk till dawn

पोलीस आणि एफबीआय अधिकारी मागावर असल्याने सेथ गेको (जॉर्ज क्लुनी) आणि रिची (क्वेंटिन टॅरंटिनो) हे दोघे दरोडेखोर भाऊ टेक्सासमधून बाहेर पडण्याच्या प्रयत्नात आहेत. नुकतीच लुटलेली बँक, त्यातही पुन्हा एका लिकर शॉपचा मॅनेजर आणि आणखी एका पोलिसाचा खून यामुळे मेक्सिकोमध्ये पळून जाणे त्यांच्यासाठी अपरिहार्य बनलेले आहे. देशातून बाहेर पडण्यासाठी पर्यायांच्या शोधात असलेल्या गेको बंधूंकडे फादर जेकब फुलर (हार्वी कायटेल), त्याचा मुलगा स्कॉट (अर्नेस्ट लिऊ) आणि मुलगी कॅथरीन ऊर्फ केट (ज्युलिएट लुईस) यांच्या रूपात एक नामी संधी चालून येते नि ते दोघे फुलर कुटुंबाच्या आरव्हीमधून मेक्सिकोमध्ये जाण्याचं ठरवतात. पूर्वार्धाच्या शेवटाकडे येत असताना ते मेक्सिकोमध्ये पोचलेले असतात, मात्र इथून पुढे एका निराळ्याच प्रकरणाची सुरुवात होणार असते.

आपला मेक्सिकोमधील कॉन्टॅक्ट, कार्लोसला भेटण्यासाठी ‘टिटी ट्विस्टर’ नामक स्ट्रिप क्लबमध्ये भेटण्याची गेको बंधूंची प्राथमिक कल्पना असते. मात्र सलमा हायेकच्या मादक ‘लॅप डान्स’पासून सुरु झालेलं हे प्रकरण कधी व्हॅम्पायर्सपर्यंत येऊन पोचतं ते कळतच नाही. अल्पावधीतच चित्रपटाला व्हॅम्पायर्स आणि त्यांच्यापासून वाचण्याचं स्वरूप प्राप्त होऊन नवीनच अतर्क्य आणि हिंसक प्रकरणाला सुरुवात होते.

सदर चित्रपट प्रदर्शित होईपर्यंत अमेरिकन चित्रपटसृष्टीत आमूलाग्र बदल घडले होते. लेखक रॉबर्ट आणि क्वेंटिन हे दोघेही स्टुडिओ सिस्टीमच्या विरुद्ध अशा इंडी फिल्म चळवळीच्या प्रणेत्यांपैकी एक होते. या दोघांचंही पन्नास-साठच्या दशकातील बी-ग्रेड सिनेमावर विशेष प्रेम होतं. त्यामुळेच तरुणपणापासूनच अमेरिकन क्लासिक्ससोबत हाही सिनेमा पाहणारे हे दोघेही आपल्या कामातून कायमच सदर बी-ग्रेड चित्रपटांना ट्रिब्यूट देताना दिसतात.

या बी-ग्रेड फिल्म्स मुख्य प्रवाहातील अमेरिकन आणि जागतिक फिल्म्सपासून अगदीच वेगळ्या होत्या. प्रेक्षकांना खुश करतील अशी अ‍ॅक्शन असलेली दृश्यं, सॉफ्ट कोअर पॉर्नचा समावेश, गोअर सीन्स अशी वैशिष्ट्यं असलेल्या या फिल्म्स कुठल्याही प्रकारच्या आशय-विषयाच्या बंधनांपासून मुक्त होत्या. मॉन्स्टर आणि झॉम्बी फिल्म्सच्या निर्मितीमागे आण्विक शस्त्रं, परकीय शत्रू देश आणि मानवी जीवनास हानिकारक ठरणार्‍या तत्सम गोष्टींचे रूपकात्मक चित्रण करण्याचा उद्देश असला तरी बी-ग्रेड चित्रपट मात्र या तत्त्वापासून कैक मैल दूर होते. त्यांना या सर्व घटकांशी घेणं-देणं नव्हतं. त्यांचा प्रेक्षकवर्ग आणि मनोरंजनाचा उद्देश, कल्पना निराळ्या होत्या. अर्थात त्या कल्पना आणि फिल्म्स यशस्वी होत्या हे सांगणे न लगे.

‘फ्रॉम डस्क टिल डॉन’देखील सामान्य समकालीन थ्रिलर चित्रपटाच्या स्वरूपात सुरु होत, बी-ग्रेड सिनेमांमध्ये आढळणारे व्हॅम्पायर्ससारख्या घटकांचा समावेश होतो, आणि हळूहळू पुढे सरकत असताना त्याला अतर्क्य दृश्यं, अशा तर्‍हेच्या फिल्म्समध्ये आढळणारे क्लिशे, जॉर्ज ए. रोमिरो आणि इतर लोकांच्या सिनेमात आढळणारी खास रॉड्रिग्ज-टॅरंटिनो शैलीतील हिंसा अशा अनेक बाबी यातही हमखास दिसतात. याखेरीज टॅरंटिनो शैलीचे संवादही सोबत आहेतच. अर्थात हा काही या दोघांचा सर्वोत्तम सिनेमा आहे अशातला भाग नाही, किंवा अगदी या जान्रमधील सर्वोत्तम सिनेमा आहे असंही नाही. पण त्याच्या मुळाशी सदर चित्रपटांना ट्रिब्यूट देण्याचं आणि ‘ओव्हर द टॉप’ असूनही हमखास रंजक ठरण्याचं जे स्पिरिट आहे, ते कौतुकास्पद आहे. याखेरीज सदर लेखक-दिग्दर्शक जोडीचे फॅन असलेल्यांसाठी तर तो मेजवानी आहेच.

First Published on: November 22, 2018 5:02 AM
Exit mobile version