‘चला हवा येऊ द्या’ वर आगरी समाजाचा आक्षेप

‘चला हवा येऊ द्या’ वर आगरी समाजाचा आक्षेप

'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमात आगरी पात्राचे चुकीचे प्रदर्शन केल्यामुळे आगरी समाजाने आक्षेप घेलता आहे.

झी मराठी वरील सुप्रसिध्द कार्यक्रम ‘चला हवा येऊ द्या’वर आगरी- कोळी भूमिपूत्र संघटनेने आक्षेप घेतला आहे. कार्यक्रमाच्या एका भागात आगरी व्यक्तिरेखेचे चुकीचे चित्रण केले गेले आहे. यामुळे आगरी समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप त्यांनी केला.आगरी-कोळी भूमिपूत्र संघटनेने मालिकेच्या निर्मात्यांना पत्र लिहून ही तक्रार केली आहे. शिवाय, संपूर्ण टीमने कार्यक्रमात जाहीर माफी मागावी अशी मागणी त्यांनी पत्राद्वारे केली आहे.

‘चला हवा येऊ द्या’ च्या ५ आणि ६ नोव्हेंबर रोजी प्रसारित झालेल्या भागात एक आगरी पात्र दाखवण्यात आले होते. आगरी पात्राद्वारे विनोद निर्मिती करणे चुकीचे नाही. पण, आगरी पात्राद्वारे आगरी समाजावर चुकीची टीका – टीप्पणी करण्याचा अधिकार कोणालाही नाही, असे संघटनेचे अॅड. भारद्वाज चौधरी यांनी पत्रात म्हटले आहे.

आगरी समाज भरभरुन दागिने घालतो, ही आगरी समाजाची परंपराच आहे. मात्र, फक्त आगरी समाजचं नव्हे तर इतरही समाज भरभरुन दागिने घालतात. त्यावर आगरी समाजालाच का लक्ष्य केले जाते? हा मुद्दा पत्रात उपस्थित करण्यात आला. आगरी समाजातील व्यक्ती मेहनत, संघर्ष करतात, कोणाची फसवणूक, लुबाडणूक करत नाही. मात्र, मालिकेतील पात्र वेगळ्या पद्धतीने रंगवले जात असल्याचे चौधरी यांनी म्हटले.

आगरी समाजाच्या भावना दुखावल्या गेल्यामुळे ‘चला हवा येऊ द्या’च्या टीम ने येत्या सात दिवसांत त्यांची माफी मागावी, अन्यथा त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही केली जाईल असा इशारा त्यांनी पत्रातून केला आहे. मात्र यावर, आत्तापर्यंत झी वाहिनी आणि कार्यक्रमाच्या निर्मात्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

First Published on: November 10, 2018 5:32 PM
Exit mobile version