छत्रपतींवर हिंदीत चित्रपट नसणे दुर्दैवी – डॉ. अमोल कोल्हे

छत्रपतींवर हिंदीत चित्रपट नसणे दुर्दैवी – डॉ. अमोल कोल्हे

डॉ. अमोल कोल्हे

भारतीय चित्रपट सृष्टीत अनेक मनोरंजनात्मक चित्रपट दरवर्षी मोठ्या संख्येने प्रदर्शित होतात. परंतु, छत्रपती शिवाजी महाराजांवर हिंदी भाषेत एकही मोठा चित्रपट नसणे हे दुर्दैवी असल्याची खंत डॉ. अमोल कोल्हे यांनी नागपुरात व्यक्त केली. नागपूरात २२ डिसेंबरपासून होणाऱ्या ‘शिवपुत्र संभाजी’ महानाट्याची माहिती देण्यासाठी शहरात आले असता ते बोलत होते.

‘शिवपुत्र संभाजी’ महानाट्याचे प्रयोग नागपुरात

‘शिवपुत्र संभाजी’ महानाट्याचे आजवर  १३६ प्रयोग झाले आहेत. मात्र, आजपर्यंत विदर्भात एकही प्रयोग झालेला नव्हता. विदर्भात पहिल्यांदाच हा प्रयोग होणार असल्याने शिवभक्त म्हणून ही माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे, असेही कोल्हे म्हणाले. पूर्व विदर्भात संभाजी महाराजांचे चरित्र कमी लोकांपर्यंत पोहचले अशी आजवर खंत होती. आता या नाटकाच्या प्रयोगाने तीही दूर होणार आहे. प्रत्येकाच्या नसानसांत संभाजी महाराज भिनले पाहिजे, हा संस्कार येणाऱ्या पिढीला मिळायला हवा म्हणून या महानाट्याविषयी मोठी आस्था असल्याचे अमोल काल्हे यांनी सांगितले. नागपुरात २२ ते २८ डिसेंबर या कालावधीत ‘शिवपुत्र संभाजी’ महानाट्याचे प्रयोग नागपुरात आयोजित करण्यात आले आहेत. नागपुरातील रेशीमबाग मैदानात उभारलेल्या भव्य सेटवर रोज सायंकाळी ५.३० ते रात्री ९.३० या वेळेत महानाट्याचे प्रयोग होणार आहे. महाराजा शंभू छत्रपती प्रॉडक्शन पुणेची निर्मिती असलेल्या या महानाट्याचे लेखक व दिग्दर्शक शिवशंभूशाहीर महेंद्र महाडिक हे आहेत. विशेष म्हणजे, हे महानाट्य नि:शुल्क असून रोज सुमारे ४० हजार लोक एकाच वेळी पाहू शकतील, असे त्यांनी सांगितले. या महानाट्यात सुमारे २५० कलावंत असून यातील १२५ कलावंत मुंबईचे तर, उर्वरित स्थानिक आहेत.

First Published on: December 13, 2018 10:13 PM
Exit mobile version