‘लोकमंच’ या कार्क्रमाच्या माध्यमातून नवा उपक्रम

‘लोकमंच’ या कार्क्रमाच्या माध्यमातून नवा उपक्रम

लोकमंच कार्यक्रम

सगळीकडेच सार्वत्रिक निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. कॉलेजच्या कट्ट्यापासून गावातील चावडीपर्यंत आणि युट्यूब चॅनल पासून वृत्तवाहिन्यांच्या पॅनलपर्यंत सध्या निवडणूक, राजकारण, मतदान, विकास आणि सर्वसामान्यांच्या समस्या यावर जोरदार चर्चा होताना दिसते. मग या सगळ्या पार्श्वभूमीवर मनोरंजनाचा एक भक्कम डिजिटल मंच निर्माण करून देणारी भाडिपा अर्थात ‘भारतीय डिजिटल पार्टी’ ही संस्था मागे कशी राहील? आजूबाजूला घडणाऱ्या घटनांवर खुमासदार शैलीत टीका करत निखळ विनोदनिर्मिती करणे हा भाडिपाचा यु.एस.पी. आहे. पण आता केवळ मनोरंजनापुरती मर्यादित न राहता ‘लोकमंच’ या कार्क्रमाच्या माध्यमातून या संस्थेने एक नवा उपक्रम हाती घेतला आहे. निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर तरुण मतदार आणि राजकीय नेते यांच्यातील संवादाचा दुवा साधण्यासाठी भाडिपाने ‘विषय खोल’ हे नवीन युट्यूब चॅनल सुरु केले आहे.

मुख्यमंत्र्यांशी साधणार संवाद

‘आरडा-ओरडा, भांडण, गोंधळ थांबवूया आता एकत्र येऊन चर्चा करूया!’ असं म्हणत ‘विषय खोल’ चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांना ते तुमच्या शहरात घेऊन येणार आहेत. आमचे प्रश्न, आमच्या समस्या आम्ही कोणासमोर मांडायच्या? त्या ऐकणार कोण? या सर्वसामान्यांचा प्रश्नाचं उत्तर म्हणजे ‘भाडिपा लोकमंच’चं ‘विषय खोल’ हे युट्युब चॅनल. ‘लोकमंच’ उपक्रमाची सुरुवात नागपूर शहरातून होत असून येत्या २ फेब्रुवारीला नागपूर येथील यशवंतराव चव्हाण अभियांत्रिकी महाविद्यालयात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ‘देवेंद्र फडणवीस’ यांच्याशी ‘विषय खोल’चे ‘निपुण धर्माधिकारी’ संवाद साधणार आहेत.

युट्युबवरून कार्यक्रम पाहता येणार लाईव्ह

रस्ते, दळणवळण, शिक्षण, रोजगार, पाणी, स्वच्छता, अशा विविध मुद्द्यांवर तुमचं म्हणणं तुम्ही ‘विषय खोल’च्या मंचावरून थेट महाराष्ट्रातल्या नामवंत नेत्यांसमोर मांडू शकणार आहात. युट्युबवरून हा कार्यक्रम लाईव्ह पाहता येणार असल्याने तुम्ही त्याद्वारेही तुमचे प्रश्न मांडू शकता. सध्या ‘विषय खोल’ची रिसर्च टीम तुमच्या शहरातल्या तुम्हाला भेडसावणाऱ्या प्रश्नांचा शोध घेत आहे. राजकारणापासून सुरुवात करत इतरही अनेक विषयांच्या मूळाशी जाण्याचा प्रयत्न ‘विषय खोल’ची टीम करणार आहे. ते तयार आहेत, तुम्ही तयार आहात ना?

 

First Published on: February 1, 2019 10:08 AM
Exit mobile version