पुण्यात बाल चित्रपट महोत्सव

पुण्यात बाल चित्रपट महोत्सव

Child Film Festival

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि फोर्ब्ज मार्शल यांच्या संयुक्त विद्यमाने 23 ते 25 नोव्हेंबर 2018 या तीन दिवसांच्या कालावधीत बाल चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सामाजिक दायित्व अंतर्गत आयोजित या बाल चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन 23 नोव्हेंबर रोजी झाले. या विनामूल्य महोत्सवात सहभागी होण्यासाठी नोंदणी आवश्यक आहे. हा महोत्सव कार्निव्हल सिनेमा चिंचवड येथे होत आहे. चित्रपटांच्या विषयानुसार 10 ते 15 वयोगटातील मुलांसाठी वेगवेगळे गट तयार करण्यात आलेले आहेत.

इयत्ता 4 थी ते 7 वीच्या गटासाठी चिल्ड्रन फिल्म सोसायटी ऑफ इंडियाचे हिंदी चित्रपट दाखवण्यात येणार आहेत. त्यात करामती कोट, हेडा होडा, हलो हे सिनेमा पाहता येणार आहेत. तसेच 5 वी ते 10 वी च्या गटांसाठी चित्रपटविषयातील अभ्यासक प्रसन्ना हुलीकवी यांच्या समवेत चर्चा व लघु चित्रपट सादरीकरण करण्यात येईल. या महोत्सवात आंतरराष्ट्रीय पातळीवर पुरस्कार प्राप्त चित्रपटांसोबतच काही लघु चित्रपट दाखवण्यात येणार आहेत. सिंग (हंगेरी), ग्रँडमास हीरो (डेन्मार्क), प्रेस्टो, पायपर आणि ला लुना (पिक्सार), रेड बलून (फ्रान्स), नेबर्स आणि चेरी टेल (कॅनडा) हे लघु चित्रपट दाखवले जातील. चित्रपटांविषयीचे चर्चासत्र मराठीमध्ये असेल.

या चित्रपटांमध्ये न्याय, सहकार्य, शांततापूर्ण संघर्ष, विवाद, दयाळूपणा, प्रेम, शांतता, मजा आणि मैत्री यासारख्या मूल्यांवर आधारीत कथानक आहेत. सिनेमा आणि सिनेमातील व्हिज्युअल इफेक्ट्सबाबत शिबिंगी दास आणि अभिनव कंदारप यांच्या समवेत चित्रपटविषयी कार्यशाळेचे आयोजन ग्लोबल इंडियन इंटरनॅशनल स्कूल, चिंचवड येथे होणार आहे. शिवाय चित्रपटातील व्हीएफएक्स विषयी ऑटोक्लस्टर ऑडिटोरियम आणि सिटी प्राईड स्कूल, निगडी येथे विद्यार्थ्यांना माहिती दिली जाणार आहे. या चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी महापौर राहुल जाधव, आयुक्त श्रावण हर्डीकर, शिक्षण समितीच्या सभापती सोनाली गव्हाणे, फोर्ब्ज मार्शलच्या संचालिका रती फोर्ब्ज यांची प्रमुख उपस्थिती होती.

First Published on: November 24, 2018 5:05 AM
Exit mobile version