माझ्या नावापुढे मला डॉक्टर ही पदवी हवी… छोट्या बयोची मोठ्ठी गोष्टं !

माझ्या नावापुढे मला डॉक्टर ही पदवी हवी… छोट्या बयोची मोठ्ठी गोष्टं !

आजपर्यंत छोट्या पडद्यावर अनेक मराठी बालकलाकारांनी हजेरी लावली आहे. ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेतील परी म्हणजे मायरा वैकुळ, ‘नवा गडी नवं राज्य’मधील चिंगी म्हणजे साईशा भोईर, ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मधील लक्ष्मी म्हणजेच साईशा साळवी ही काही नजिकची उदाहरणं आहेत. असंच आणखी एक चुणचुणीत उदाहरण आहे, रुची नेरुरकर म्हणजेच सोनी टीव्हीवरील ‘छोट्या बयोची मोठ्ठी स्वप्नं’ मालिकेतील बयो. या ‘बयो’समोरचं आव्हान म्हणजे मालिकेची मुख्य नायिका ती आहे. आणि हे आव्हान तिनं बखुबी निभावलं आहे. येत्या आठवड्यात या मालिकेचे दोनशे भाग पूर्ण होत आहेत.

बयोला, मी काय हाक मारू? असं विचारलं असता, ती म्हणाली की, “ मला रुचीच म्हणा, म्हणजे मला आवडेल. कारण आता सगळीकडेच मला बयो-बयो-बयो म्हणतात.” या ‘रिल लाईफ’ बयोच रियल नाव आहे, रुची संजय नेरुरकर. रुची सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कुडाळ तालुक्यातील नेरुर गावात राहते आणि तिथल्याच जिल्हा परिषदेच्या शाळेत सहावी इयत्तेत शिकते. तिची आई गृहिणी आहे तर बाबांचं गावातच किराणा मालाचं दुकान आहे. घरामध्ये आई-बाबा, छोटा भाऊ, काका-काकू, चुलत भावंड, असं एकत्र कुटुंब आहे.

रुची एक गमतीदार प्रसंग सांगत होती. बर्‍याचदा ती बाबांच्या दुकानात बसते तेंव्हा तिथे येणारे गावकरी तिची आपुलकीने चौकशी करतात. त्यांना ‘बयो’मध्ये पुढे काय होणार हे जाणून घ्यायचं असतं. तर काहीजण मालिकेत तिच्यासोबत वाईट वागणाऱ्या पात्रांना चक्क दूषणं देतात. कोकणातल्या या भोळ्याभाबड्या लोकांना आपल्या गावातल्या मुलीसोबत मालिकेत जे वाईट वागलं जातं याचा राग येतो. मग रुचीच त्यांना सांगते की, “अरे बाबांनो, ते सगळं काही खरं नसतं. ती फक्त अॅक्टींग आहे. तिथे सगळी चांगली मंडळी आहेत !”

मालिकेमध्ये तिच्या आईच्या भूमिकेत असलेली वीणाताई म्हणजे वीणा जामकर हे तिचं लाडकं व्यक्तिमत्व आहे. रुची वीणाबद्दल सांगते की, वीणाताई माझ्या आईसारख्याच आहेत. माझं काही चुकंल तर त्याच मला समजावून सांगतात. वीणाताईंकडून मला प्रॉपर काम कसं करायचं हे शिकायला मिळालंय. वीणाताई मला प्रत्येक वेळी कोणती न कोणती गोष्ट शिकवतच आल्या आहेत. मालिकेतील तिच्या बाबांच्या भूमिकेतील अभिनेता विक्रम गायकवाड यांच्याबद्दल ती म्हणते की, समोरचा माणूस कितीही चुकत असला तरी त्याच्यासोबत चांगलं वागायला मला विक्रमदादांनी शिकवलं.

‘बयो’मध्ये काम करण्यापूर्वी रुचीने दोन शॉर्ट फिल्मस् केल्या होत्या. सोबतच ‘द्रोणाचार्य’ हा रमाकांत आचरेकर सरांवर आधारित असलेला लघुपट केला होता. ज्यामध्ये ती छोट्या रमाकांतची लहान बहीण होती. तिला ‘बयो’ मालिकेबद्दल सुरुवातीला काहीच माहित नव्हतं. तिच्या निलेश दादाने सोनी टीव्हीच्या दांडेकर सरांना तिचं ऑडिशन पाठवलं होतं. या मालिकेमध्ये बयो नावाची एक मुलगी असते आणि ही मालिका रखमाबाई राऊतांवर आहे एवढंच तिला माहीत होतं. तिला लीड रोल मिळणार आहे याबद्दल तर ती पूर्णपणे अनभिज्ञ होते. या मालिकेसाठी प्रयत्न करत असलेल्या तब्बल ३०० मुलींमधून रुचीची निवड झाली.

या मालिकेसाठी रुची रोज १२ ते १३ तास शूटिंग करते. यादरम्यान तिची आई संजना तिची काळजी घेतात. नेरूरपासून, मालिकेचे शूट चालू असलेल्या पडेलपर्यंत तब्बल दोन तासांचं अंतर आहे. त्यातच महिन्याचे ३० दिवस तिचे शूटिंग असतं. त्यामुळे तिला शाळेत हजर राहता येत नाही. शाळेच्या अभ्यासाबद्दल ती सांगते की, जेंव्हा इतरांचे सीन शूट होत असतात किंवा शूट लवकर पॅकअप झालं की, हॉटेलच्या रूमवर जाऊन ती उरलेल्या वेळामध्ये शाळेचा अभ्यास करते. शाळेत हजर न राहता फक्त परीक्षेला बसण्याची सुविधा शाळेने तिला दिली आहे. रुची सांगत होती, “माझे सगळेच मित्र-मैत्रिणी मला कायम सपोर्ट करत असतात. शाळेमध्ये मॅडम जो काही अभ्यास शिकवतात, तो माझ्या मैत्रिणी आनंदी, नेहाका, मृण्मयी मला प्रत्येक वेळी सांगतात. माझ्या वीरजा साटेलकर मॅडमही प्रत्येक वेळी फोन करून अभ्यासातील प्रत्येक गोष्ट सांगत असतात. शाळेतील नोट्स स्क्रीनशॉट पाठवतात. ते सारं एक्सप्लेन करतात.”

बयो या भूमिकेसाठी रुचीला प्रेक्षकांचं अमाप प्रेम मिळालं आहे. मात्र दुसरीकडे रुची आणि तिचे मित्र-मैत्रिणी एकमेकांना खूप मिस करतात. याबाबत ती म्हणाली, “ माझ्या अॅक्टिंगबद्दल माझ्या मित्र-मैत्रिणी माझं खूप कौतुक करतात. परंतू तू केंव्हा येणार अशी नेहमी विचारणा करतात. कारण पूर्वी मी कायम त्यांच्या सोबत असायचे. “ आज रुची शूटिंगमधून वेळ मिळाल्यावर महिन्यातून दोन दिवस तरी त्यांच्यासोबत खेळायला जाते.

रुची सांगत होती की, “मालिकेमध्ये सोबत काम करणारे इरा, आरव, शैलू, गुड्डी, चैतन्याच्या भूमिकेतील सर्व बाळगोपाळ शूटिंगच्या दरम्यान सेटवर धुमाकूळ घालत असतात. या मज्जा-मस्करीमध्ये विक्रमदादा तर सेटवरचं सातवं लहान मुल आहेत. त्यात वीणाताईची भर पडते ती वेगळीच !… इथे येण्याआधी मला शूटिंगमधील काहीच माहित नव्हतं. मी टीव्हीवर वेगवेगळ्या मालिका पाहायचे तेंव्हा मला वाटायचं की, हे खरोखरच घडतंय. पण इथे आल्यावर मला खूप सार्‍या गोष्टी पाहायला मिळाल्या, शिकायला मिळाल्या. आमचे डीओपी हरीश सावंत सरांकडून लुक कसे द्यायचे, लाईटचे वेगवेगळे प्रकार या गोष्टी मला शिकायला मिळाल्या.

तीची रिल लाईफ आई वीणा जामकर तिच्याबद्दल सांगत होती की,” नुकतंच या मालिकेतील बयोच्या भूमिकेसाठी रुचीला ‘सुधा करमरकर स्मृती पुरस्कार’ मिळाला. जो तिला अगदी सहज मिळालेला नाही. गेले सात महिने या मालिकेसाठी घेतलेले तिचे अपार कष्ट मी स्वतः पाहिले आहेत. तीच या मालिकेची खरी नायिका आहे. कितीतरी वेळा तिची धावपळ बघून माझ्या मनामध्ये कालवा-कालव झाली आहे… मी आवंढे गिळलेत… एवढीशी पोर कशी काम करते !… समजून -उमजून, न थकता मोठे मोठे डायलॉग पाठ करते. चेहऱ्यावरचे भाव सांगू तसे बदलते. कधी-कधी डोळ्यातली झोप दडवून तिनं शूटिंग केलं आहे.” खरंतर वीणा जामकर सुधा करमरकरांची शिष्या पण आज मालिकेतील ही चिमुरडी बयो, जिनं कधी सुधा करमरकरांना पाहिलंही नाही, तिला त्यांच्या नावाचा पुरस्कार मिळालाय याचा वीणालाही खूप आनंद आहे !

रुचीला मोठं होऊन डॉक्टर होण्याची इच्छा आहे. यावर सध्या तू अॅक्टिंग करतेस, तुला अभिनयाची आवड आहे, मग तू डॉक्टर कशी होणार?… असं विचारलं असता रुची म्हणाली, “ मला डॉक्टर तर व्हायचंच आहे. खरोखरची डॉक्टर नाही झाले तरी माझ्या नावामागे मला डॉक्टरची पदवी हवी आहे ! “

 


हेही वाचा :

रिंकू राजगुरू, ललित प्रभाकर यांच्या ‘खिल्लार’मधून होणार बैलगाडा शर्यतीचा जल्लोष

First Published on: May 1, 2023 4:08 PM
Exit mobile version