birthday boy विराट कोहली सहपत्नीक करतोय ‘या’ गावाची सफर!

birthday boy विराट कोहली सहपत्नीक करतोय ‘या’ गावाची सफर!

सुप्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली आज ३१ वर्षांचा झाला. वाढदिवसानिमित्त विराट कोहली पत्नी अनुष्का शर्मा हिच्यासोबत भूतानच्या दौऱ्यावर गेले आहेत. भूतानच्या नयनरम्य निसर्गाचा ते आस्वाद घेत आहेत. त्याबाबतची माहिती खुद्द अभिनेत्री अनुष्का शर्मा हिने सोशल मीडियाद्वारे दिली आहे. विराटच्या वाढदिवसाला स्पेशल बनवण्यासाठी विरुष्का त्यांच्या व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढत शहरी धकाधकीपासून दूर गेले आहेत. विशेष म्हणजे भूतानमधील ज्या गावाला विरुष्काने भेट दिली तेथील स्थानिकांनी त्यांना ओळखलेच नसल्याची माहितीसुद्धा अनुष्काने दिली.

अनुष्काच्या इन्स्टाग्रामवर भूतान व्हेकेशनचे फोटो

अनुष्काने पती विराट कोहलीसोबतचे भूतान व्हेकेशनचे फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केले आहेत. येथील स्थानिकांनी आपल्याला ओळखलेच नसल्याचे सांगताना अनुष्का लिहिते की, ‘आज जवळपास ८.५ किमीचा ट्रेक करत असताना एका गावात थांबलो. तिथे एका गायीच्या बछड्याला चाराही खाऊ घातला. ४ महिन्यांपूर्वीच त्याचा जन्म झाला होता. त्याचवेळी आम्ही थकलो असू, तर घरात काही क्षण विसावू शकतो असं तेथे असणारा घरमालक आम्हाला सांगू लागला. त्यांनी आम्हाला चहा पिणार का? असंही विचारलं…..’, असं सांगत तिने एक सुंदर अनुभव सर्वांसमोर आणला.

कायम स्मरणात राहील असा अनुभव

भूतानच्या सहलीवर असलेले विरुष्का तेथील स्थानिकांच्या आदरातिथ्याने सुखावून गेले. याबाबतचा अनुभव सांगताना अनुष्का लिहिते की, ‘ज्या कुटुंबाच्या घरी आम्ही गेलो होतो, त्यांना आम्ही कोण आहोत याची कल्पनादेखील नव्हती. मात्र तरीसुद्धा त्यांनी अतिशय सुरेख पद्धतीने आमचं स्वागत, आदरातिथ्य केलं. त्यांच्यासोबत चहा पित गप्पा मारल्या. या संपूर्ण वेळेत त्यांनी आम्हाला केवळ ट्रेकर्स असल्याच्या भावनेनेच आमचे आदरातिथ्य केले. जे कोणी मला आणि विराटला जवळून ओळखतात त्यांना माहीत आहे की, आम्हाला असे खरे क्षण जगणं फार आवडतं. कोणतीही अपेक्षा न करता दोन परदेशी प्रवाशांचे प्रेमपूर्वक स्वागत करावे एवढेच या कुटुंबाला माहीत होते. आणि याला जर आपण खरे जगणं म्हणणार नसू तर कशाला म्हणायचं? हे मला माहीत नाही. असे सांगत अनुष्काने माणुसकीच्या या सुरेख नात्याची बाजू चाहत्यांसमोर ठेवली.

First Published on: November 5, 2019 10:59 AM
Exit mobile version