ज्येष्ठ अभिनेत्री चित्रा नवाथे काळाच्या पडद्याआड

ज्येष्ठ अभिनेत्री चित्रा नवाथे काळाच्या पडद्याआड

मराठी चित्रपटसृष्टी गाजवणाऱ्या नायिका चित्रा म्हणजेच कुसुम नवाथे यांचे निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या 87 व्या अखेरचा श्वास घेतला. लाखाची गोष्ट, गुळाचा गणपती, देवबाप्पा, मोहित्यांची मंजुळा, बोलाविता धनी, कोर्टाची पायरी आदी चित्रपटांमुळे त्यांना ओळख मिळाली. ग. दि. माडगूळकर यांनी चित्रपटसृष्टीत कुसुम नवाथे यांचे चित्रा असे नामकरण केले होते. एकेकाळी चित्रा व रेखा (कामत) या दोन बहिणींनी मराठी चित्रपटसृष्टी गाजवली होती. चित्रा यांनी निर्माते, दिग्दर्शक दिवंगत राजा नवाथे यांच्याशी त्यांचा विवाह झाला होता.

पूर्वी जुहू येथील बंगल्यात त्या एकट्याच राहत होत्या. मधल्या काळात त्यांनी काही चित्रपटातून आज्जीच्या भूमिका साकारल्या होत्या त्या भूमिकांचे पुरस्कार देऊन कौतुक केले होते. परंतु गेल्या काही वर्षांपूर्वी पायाला दुखापत झाल्याने त्यांना सरला नर्सिंग होममध्ये ठेवलं होतं. मात्र कोरोनाच्या काळात तेथून त्यांना निघून जाण्यास सांगितले. त्यानंतर मधल्या काळात त्या कुठे होत्या याची माहिती त्यांच्या नातेवाईकांना सुद्धा नव्हती. मात्र त्यानंतर त्या मुलुंड येथील “गोल्डन वृद्धाश्रमात” असल्याचे समोर आले होते. चित्रा नवाथे यांची सख्खी बहीण “रेखा कामत” या देखील प्रसिद्ध अभिनेत्री होत्या. जवळपास वर्षभरापूर्वी त्यांचे देखील निधन झाले होते.

दोन बहिणींनी गाजवली मराठी चित्रपटसृष्टी

1952 मध्ये प्रदर्शित झालेला ‘लाखाची गोष्ट’ हा चित्रा यांचा पहिला चित्रपट होता यामध्ये त्यांची बहिण दिवंगत रेखा कामत यांनीसुद्धा काम केले होते. राजा परांजपे, ग. दि माडगूळकर आणि सुधीर फडके यांचा हा सिनेमा होता. कुमुद आणि कुसुम ही जुन्या वळणाची नावे नकोत म्हणून सिनेमासाठी या दोघींची नावे बदलण्यात होती त्यावेळी ग.दि. माडगूळकर यांनी रेखा आणि चित्रा असे नामकरण केल्याची आठवण रेखा यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितले होती. त्याच नावाने या दोघीजणी पुढे ओळखल्या गेल्या.

First Published on: January 11, 2023 10:33 AM
Exit mobile version