मनोरंजन सृष्टीतल्या कामगारांचे मुख्यमंत्र्यांना गाऱ्हाणे; ”मजुरांसोबतच सेटवरील इतर कामगारांनाही अर्थसहाय्य करा!’

मनोरंजन सृष्टीतल्या कामगारांचे मुख्यमंत्र्यांना गाऱ्हाणे; ”मजुरांसोबतच सेटवरील इतर कामगारांनाही अर्थसहाय्य करा!’

राज्यातील कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारने १५ दिवसांची संचारबंदी लागू केली आहे. १४ एप्रिल ते ३० एप्रिल पर्यंत हे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मात्र याचा सर्वात मोठा फटका मनोरंजन विश्वाला बसला आहे. संचारबंदीमुळे मनोरंजन विश्वातील सर्व कामकाज बंद राहणार असल्याने त्याच्या परिणाम येथील सर्वांना होणार आहे. यामुळे चित्रपटसंदर्भातल्या अनेक संघटनांनी मिळून मुख्यमंत्र्याकडे काही मागण्या केल्या आहेत. मनोरंजन विश्वातील सर्व संघटनांच्या प्रतिनिधींनी मिळून मीडिया-एंटरटेन्मेंट कमिटी स्थापन केली आहे. या कमिटीतर्फे मुख्यमंत्र्यांना पत्र पाठविण्यात आले आहे. व या पत्राद्वारे संचारबंदीचा मनोरंजन विश्वाला कसा विपरित परिणाम होत आहे हे स्पष्ट केले आहे. तसेच विशेष सवलती देण्याची विनंतीही केली आहे.

प्रशासनाच्या नव्या निर्बंधानुसार, चित्रीकरण आणि त्यानंतरच्या सर्व प्रक्रियेवर निर्बंध घालण्यात आले आहेत. मुख्यमंत्र्यांना दिलेल्या या पत्रात या संघटनांनी बंदिस्त जागेतल्या पोस्ट प्रॉडक्शनच्या कामाला परवानगी देण्याची विनंती केली आहे. जेणेकरुन मालिकांच्या किंवा चित्रपटांच्या ज्या भागांचे काम पूर्ण झाले आहे, त्यांचे संकलन आणि आवश्यक त्या तांत्रिक गोष्टींची पूर्तता करता येईल. सध्या ज्या मालिका टेलिव्हिजनवर सुरु आहेत त्यांचे पुढचे भाग प्रेक्षकांना पाहता येतील. जेणेकरुन प्रेक्षकांचा लॉकडाऊनचा कालावधी सुसह्या होईल. यामुळे आताच्या या ताणतणावाच्या व कंटाळवाण्या वातावरणात त्यांचे मनोरंजन होऊ शकेल. त्यासोबतच कमिटीने दुसरी मागणी केली आहे त्यामध्ये, सेट बांधण्याच्या कामालाही परवानगी देण्याची विनंती केली आहे. जेणे करुन निर्मात्यांचेही नुकसान टळेल. जसे मजुरांना तिथेच राहून काम करण्याची परवानगी सरकारने या लॉकडाऊनच्या काळात दिली आहे. त्याच पार्श्वभूमीवर सेटवर राहणाऱ्या सर्व कलाकारांना, सेटवरील सर्व कर्मचाऱ्यांना अशी परवानगी द्यावी. त्यामुळे त्यांच्या रोजगारावर कोणताही परिणाम होणार नाही.

यासोबतच फिल्मसिटीच्या भागात लसीकरण केंद्र उभारण्याची विनंतीही या पत्राद्वारे करण्यात आली आहे. तसेच तिसरी मागणी करताना, ते असे म्हणाले आहे की, रोजंदारीवर असलेल्या कामगारांना सरकारने आर्थिक मदत जाहीर केली आहे. त्यामध्ये मनोरंजन सृष्टीतील कामगारांचाही समावेश केला जावा अशी मागणी कमिटिने दर्शवली आहे.


हे वाचा- लोकप्रिय ‘रामायण’ मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस

First Published on: April 16, 2021 2:19 PM
Exit mobile version