‘देवदास’ – १०० वर्ष जुनी कथा आता रंगमंचावर

‘देवदास’ – १०० वर्ष जुनी कथा आता रंगमंचावर

देवदास - नाट्यकलाकृती

‘देवदास’ ही शरदचंद्र चट्टोपाध्याय यांची महाकादंबरी ही भारतीय साहित्यातील सर्वात प्रसिद्ध प्रेमकथा आहे. जवळपास सर्व महत्त्वाच्या भाषांमध्ये भाषांतरीत झालेल्या या कथेल्या भारतीय सिनेमातही नावाजले गेले आहे. आता एजीपी वर्ल्ड ही कथा रंगमंचावर आणत आहेत. या नाटकातील मुख्य पात्र असलेली सुंदर वारांगना चंद्रमुखी ही कथा सांगणार आहे. यामध्ये नृत्य आणि संगीताच्या माध्यमातून देवदास आपला वारसा प्रेक्षकांसमोर मांडणार आहे.

१५० मिनिटांची कलाकृती

सैफ हैदर हसन यांनी या नाटकाचे दिग्दर्शन केले असून यामध्ये गौरव चोप्रा, मंजिरी फडणीस, सुनील पालवाल, सुखदा खांडेकर, भावना पाणी, स्मिता जयकर यांच्या प्रमुख भूमिका पाहायला मिळणार आहे. साधारण १५० मिनिटांचा हा नाटकाचा प्रयोग असणार आहे. देवदासनंतर चंद्रमुखी आणि पारोचे काय झाले, अशी वेगळीच बाजू या नाटकात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

देवदासची कथा

१९०० सालातील कोलकात्यात घडणारी ही कथा दृश्यात्मक आणि सांगीतिक स्वरुपावर अतिशय भव्य असणार आहे. त्या काळी भारतात असणाऱ्या भव्य हवेल्या, गॅस बत्त्यांच्या प्रकाशातील कोलकात्यातील रस्ते असा सगळा सरंजाम घेऊन त्या काळातील चित्र साकारले जाणार आहे. आकर्षक कलाकुसर, आठवणी ताज्या करणारी प्रकाशयोजना, तपशीलवार कपडेपटण् संस्मरणीय संगीत आणि श्वास रोखायला लावणारे नृत्यदिग्दर्शन या नटलेला हा प्रयोग असणार आहे. मेरी कोम, भूमी, सरबजीत आणि सावरिया या सारख्या सिनेमांचे राष्ट्रीय पुरस्कार विजेते आर्ट आणि सिनेमॅटिक दिग्दर्शक ओमंग कुमार यांनी नाटकाचा सेट उभारला आहे.

संगीत ही जमेची बाजू 

शंपा सोनथालिया (प्रसिद्ध कथक गुरू पद्मश्री गोपी कृष्ण यांच्या कन्या) यांनी दिग्दर्शित केलेले शास्त्रीय आणि समकालीन फ्युजन नृत्य हे या नाटकाचे आणखी एक ठळक वैशिष्ट्य आहे. शिवाय, देवदासला लाइव्ह संगीत दिले आहे बर्टविन रवी डीसूझा यांनी. शैल हाडा, भूमी त्रिवेदी, शान, अलका याज्ञिक, सुरेश वाडकर आणि अंतरा मित्रा यांच्यासारख्या प्रसिद्ध गायकांनी गायलेल्या ओरिजिनल गाण्यांमधून देवदासमधील अमर, एकतर्फी प्रेमकथा सजली आहे.

First Published on: October 26, 2018 11:13 AM
Exit mobile version