मेघा, सई आणि पुष्करच्या मैत्रीत फूट

मेघा, सई आणि पुष्करच्या मैत्रीत फूट

बिग बॉस मराठी

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सध्या बरेच वाद विवाद होत आहेत. पुष्कर, मेघा आणि सई यांच्यातील वाद आता चर्चेचा विषय बनला आहे. इतके आठवडे असणाऱ्या त्यांच्या मैत्रीत फूट पडलेली प्रेक्षकांना प्रकर्षानं जाणवत आहे. यासंदर्भात मेघाने आता पुष्कर आणि तिच्यातील मैत्री परत पहिल्यासारखी होऊ शकत नाही असं सईशी आणि शर्मिष्ठाशी बोलताना स्पष्ट केलं. तर आजही मेघाला आस्ताद, रेशम, पुष्कर, सई यांच्या रागाला सामोरं जावं लागणार आहे. मेघाने जे काही पुष्करसोबत केलं ते चुकीचं आणि माणुसकीला सोडून होते असं त्यांचं म्हणणे असणार आहे.

कोण होणार नवा कॅप्टन?

“घरोघरी मातीच्या चुली” या कार्यामध्ये घरातील सदस्यांनी बरेच हिरे पटकावले. आज कॅप्टनसीच्या उमेदवारीसाठी मेघा, शर्मिष्ठा, स्मिता आणि नंदकिशोरमध्ये वाद होणार आहेत. मेघा आणि शर्मिष्ठा दिलेला टास्क नीट खेळल्या नाहीत असं मत नंदकिशोर मांडणार असून यावरून त्यांच्या वाद होताना दिसणार आहे. तर दुसऱ्या बाजूला आज घरामध्ये कॅप्टनसीच्या निवडीचे कार्य पार पडणार आहे. महेश मांजरेकर यांनी दर आठवड्याला या घरामध्ये स्पर्धेबरोबरच खेळाडूवृत्ती देखील तितकीच महत्वाची आहे असे नेहमीच नमूद केलं आहे, त्यामुळं आठवड्याचे कॅप्टनसीचे कार्य महेश मांजरेकरनं आखून दिलेलं आहे. आज घरामध्ये हटके पद्धतीने पूल वॉलीबॉल खेळण्यात येणार आहे. या कार्यानिमित्त घरातील सदस्यांची चार टीम्समध्ये विभागणी करण्यात आली असून आता बिग बॉस मराठीच्या घराचा नवा कॅप्टन कोण बनेल याचीच उत्सुकता आहे.

मेघा आणि पुष्करमध्ये पुन्हा वाद

मेघा, सई आणि पुष्कर यांचे त्रिकूट प्रेक्षकांना चांगलेच आवडत होते. पण गेल्या आठवड्यापासून त्यांच्यामध्ये बरेच वाद होत आहेत. हे वाद गुरुवारीदेखील दिसून आले. सईला मेघाचे म्हणणे पटत नाही तर पुष्करला मेघाचे म्हणणे ऐकून घ्यायचे नाही. आज देखील हा वाद विकोपाला जाणार असून पुष्कर, मेघा, सई, आस्ताद आणि रेशम यांच्यामध्ये बरेच वाद होणार आहेत. परंतु या वादामध्ये नक्की कोण माघार घेईल ? घराचा नवा कॅप्टन कोण होईल? हे आजच्या भागात प्रेक्षकांना पाहता येईल.

First Published on: July 6, 2018 2:45 PM
Exit mobile version