जगभर ‘फिल्मीदेश’चा अनोखा उपक्रम होणार

जगभर ‘फिल्मीदेश’चा अनोखा उपक्रम होणार

बीएमएमचे चेअरमन आशिष चौघुले आणि चित्रपट निर्माते नितीन केणी

मराठी चित्रपटसृष्टीतील दर्जेदार कलाकृतींना, भारताबाहेर मोठी पसंती मिळत असली तरी वितरण निर्बंधनामुळे हे सिनेमे हवे तितक्या प्रमाणात भारताबाहेरील मराठी प्रेक्षकांपर्यंत पोहोचत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे, मराठी चित्रपटांच्या जागतिक प्रसारणासाठी चित्रपट निर्माते नितीन केणी आणि मनीष वशिष्ट यांचा ‘फिल्मीदेश’ हा अनोखा उपक्रम जगभर मोठ्या प्रमाणात राबवला जाणार आहे.

मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीत निर्मिती आणि वितरणक्षेत्रात नितीन केणी यांचे नाव मोठे आहे. त्यांनी ‘गदर’, ‘रुस्तम’, ‘लंचबॉक्स’ यांसारख्या हिंदीतील सुप्रसिद्ध सिनेमांसाठी आणि ‘सैराट’, ‘कट्यार काळजात घुसली’, ‘दुनियादारी’, ‘टाइमपास’, ‘लयभारी’ यांसारख्या सुपरहिट मराठी चित्रपटांमध्ये त्यांचा महत्त्वपूर्ण सहभाग होता. ‘फिल्मीदेश’ या उपक्रमांतर्गत परदेशातील स्थानिक मराठी प्रेक्षकांच्या नजीकच्या सिनेमागृहात मराठी सिनेमा प्रदर्शित केला जाणार आहे. त्यासाठी जागतिक स्तरीय ‘बृहन्महाराष्ट्र मंडळ’ चा कार्यभाग सांभाळणारे बीएमएमचे चेअरमन आशिष चौघुले यांचे सहकार्य त्यांना मिळाले आहे.

याद्वारे मराठी चित्रपट जगभरातील प्रसिद्ध सिनेमागृहात दाखवले जाणार असून, चित्रपट वितरणाबरोबरच जनसंपर्क आणि प्रसारमाध्यमाचे कार्यदेखील याअंतर्गत पार पाडले जाणार आहे. भारतातील प्रादेशिक चित्रपटांना भारताबाहेर हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देणारा ‘फिल्मीदेश’ हा उपक्रम मराठी चित्रपटांच्या निर्मात्यांची गुंतवणूक सत्कारणी लावणारा ठरेल, असे त्यांचे म्हणणे आहे.

First Published on: August 16, 2018 3:30 AM
Exit mobile version