मिका सिंग देतोय ‘डोक्याला शॉट’

मिका सिंग देतोय ‘डोक्याला शॉट’

मिका सिंगच पहिल मराठी गाण मराठी चित्रपट डोक्याला शॉटमध्ये

‘डोक्याला शॉट’ नावाचा धमाल कॉमेडी सिनेमा १ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. चित्रपटाच्या हटके नावावरून या सिनेमात काहीतरी धमाकेदार आणि मजेशीर पाहायला मिळणार हे नक्कीच. चित्रपटातील ‘जोरू का गुलाम’ या पहिल्या गाण्याला प्रेक्षकांनी जबरदस्त प्रतिसाद दिला. आता या सिनेमाचे टायटल सॉंग रिलीज झाले आहे. या गाण्यातून प्रेक्षकांना एक सरप्राइज मिळाले आहे. ते म्हणजे बॉलीवूडमध्ये आपल्या भारदस्त आवाजामुळे ओळखला जाणारा आणि असंख्य लोकप्रिय हिंदी गाण्यासाठी आपला आवाज देणारा ‘मिका सिंग’ याने ‘डोक्याला शॉट’ हे गाणे गायले आहे. तर मराठी मधील आघाडीचा संगीतकार अमितराज याने या गाण्याला संगीत दिले आहे.

मिका सिंगचा डोक्याला शॉट

ते म्हणतात ना, चित्रपटाची सुरुवातच धमाकेदार झाली पाहिजे. म्हणूनच चित्रपटाच्या सुरुवातीला हे जबरदस्त गाणे दिसते. त्यामुळे सुरुवातीचे गाणे जोशपूर्ण असावे, अशी इच्छा चित्रपटाचे निर्माते उत्तुंग ठाकूर आणि दिग्दर्शक शिवकुमार पार्थसारथी यांनी व्यक्त केली आहे. चित्रपटाच्या सुरुवातीलाच या गाण्यामुळे प्रेक्षकांच्या डोक्याला शॉट बसल्यामुळे पुढच्या दोन तासांत प्रेक्षक खळखळून हसतील यात शंका नाही. उत्तुंग ठाकूर यांनीच मिका सिंग यांचे नाव संगीतकार अमितराज यांना सुचवले. अमितराज यांनी देखील या नावाला आनंदाने हो म्हणत हे गाणे मिका सिंग यांच्या आवाजात स्वरबद्ध केले.

टायटल साँगमध्ये काय?

या गाण्यातून चार मुलांची एकमेकांशी असलेली घट्ट मैत्री अगदी स्पष्ट दिसून येत आहे. शिवाय सुव्रत, रोहित, ओमकार हे तिघे गणेश पंडित या त्यांच्या चौथ्या मित्राला किती त्रास देतात, हे अनेक दृश्यातून दिसते. चहा टपरीवर चहा पिताना अंड खाली ठेऊन त्यावर त्याला बसवतात, तसेच बॅटने त्याला मारहाण देखील करतात. इतका त्रास देऊनही गणेश पंडित न चिडता खिलाडू वृत्तीने त्या सर्व मजा मस्तीचा आनंद घेतो.

चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

या गाण्याच्या निमित्ताने मिका सिंग यांचे मराठी सिनेसृष्टीतील पाहिले गाणे प्रदर्शित झाले आहे. ‘डोक्याला शॉट’च्या निमित्ताने ‘अ व्हिवा इनएन प्रॉडक्शन’ पुन्हा एकदा प्रेक्षकांना मनोरंजनाची परिपूर्ण मेजवानी देण्यासाठी सज्ज आहे. उत्तुंग ठाकूर निर्मित ‘डोक्याला शॉट’ हा चित्रपट १ मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शिवकुमार पार्थसारथी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळत आहेत.

First Published on: February 23, 2019 6:54 PM
Exit mobile version