गजेंद्र अहिरेचा ५० वा चित्रपट ‘बिडी बाकडा’!

गजेंद्र अहिरेचा ५० वा चित्रपट ‘बिडी बाकडा’!

एखादी कलाकृती दीर्घकाळ लक्षात राहते. पुन्हा पुन्हा आठवते. मनात रूंजी घालत राहते…असं कधी होतं तर जेव्हा ती कलाकृती आपल्याशी वैयक्तिक पातळीवर जोडली जाते. त्यातला भावनाविष्कार आपल्याला आपला स्वतःचा वाटू लागतो. त्यातला आनंद, त्यातली स्वप्नं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यातली वेदना आपल्याला आपली वाटते. एका संवेदनशील मनाला जाणवलेली संवेदना जेव्हा दुस-या संवेदनशील मनापर्यंत पोहचते तेव्हा ती दीर्घकाळ टिकून राहते. अशा अनेक संवेदना आपल्यापर्यंत पोहचवल्या आहेत लेखक, गीतकार आणि कवीमनाचा दिग्दर्शक असलेल्या गजेंद्र अहिरे यांनी.

१६ फेब्रुवारीला स्वतः गजेंद्र अहिरे आणि त्यांची फिल्म दोघांनी ५० वर्षांच्या मैलाचा दगड गाठला आहे. अवघ्या सतरा वर्षांमधे ५० फिल्म्स करणं आणि त्यातली प्रत्येक फिल्म ही अत्यंत संवेदनशील गोष्ट मांडणारी असणं ही आज आपल्या सिनेजगतात अप्रूप वाटण्यासारखी आणि म्हणूनच नोंदवून ठेवण्यासारखी गोष्ट आहे. ५० फिल्म्स मधल्या ५० वेगवेगळ्या गोष्टींचा विचार केला तर लक्षात येतं की गजेंद्र अहिरेंनी केवळ फिल्म्स नाही बनवल्या तर त्यातून एक नवीन स्त्रीसाहित्य निर्माण केलं आहे.

या समोर येणा-या ५० गोष्टींमागे समोर न येणा-या २५० गोष्टीही आहेत. केवळ कथा आणि दिग्दर्शनाशिवाय गीतकार म्हणून, नाटककार म्हणून आणि श्रीमान श्रीमती सारख्या मालिकांसाठी केलेलं लिखाण हे गजेंद्र अहिरेंच्या आजवरच्या कारकिर्दीतील अजून एक वेगळं पण अत्यंत महत्वाचं अंग आहे. जगभरच्या अनेक फिल्म फेस्टीवल्समध्ये असंख्य पारितोषिके गजेंद्र अहिरेंच्या फिल्म्सनी मिळवली आहेत. अत्यंत कमी वेळात दर्जेदार आणि प्रभावी फिल्म बनवण्याची त्यांची जी शैली आहे तिची विशेष दखल स्वीडन मधील एका प्रतिष्ठीत विद्यापिठाने घेतली. मराठी चित्रपट क्षेत्रात ही अत्यंत दुर्मिळ गोष्ट आहे.

गजेंद्र अहिरेंच्या ५० फिल्म्समधल्या ५० गोष्टी जरी वेगवेगळ्या माणसांभोवती फिरत असल्या तरी त्यांचा प्रवास समांतरच असतो. आणि तो वेदनेच्या हातात हात गुंफून होत असतो. ती पात्रं वर्षानुवर्षे आपल्या सोबत राहतात. त्यांच्या संघर्षानी वर्षानुवर्ष आपलं काळीज पिळवटत राहतं. कशा ना कशाच्या मागे सतत धावणा-या आपल्या सारख्या सामान्य माणसांच्या जगात जिथे आज संवेदना हरवत चालल्या आहेत. तिथे गजेंद्र अहिरेंचा सिनेमा त्या संवेदना पुन्हा रूजवण्याचं काम करतो आहे. आपल्या चित्रपटसृष्टीत या गुणी, प्रतिभावान दिग्दर्शकाचं असणं ही एक बहूमुल्य गोष्ट आहे.

त्यांच्या ‘द सायलेन्स’ या सिनेमातल्या रघुवीर यादवांनी साकारलेल्या भूमिकेतला बाप आपल्या लेकिने सोसलेल्या वेदनेनी व्याकूळ होऊन टाहो फोडतो. त्याची ती आर्तता प्रतिध्वनीत होत राहते. गजेंद्र अहिरेंच्या प्रत्येक सिनेमानंतर बरोब्बर हिच जाणीव होते. ती वेदना आपल्या आत प्रतिध्वनीत होत राहते… आयुष्यभर.

५०व्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी त्यांचा ५०वा सिनेमा ‘बिडी बाकडा’ चे पोस्टर प्रदर्शित केले आहे. आता या सिनेमाविषयी तपशीलात जाणून घेण्याची उत्सुकता अनेकांना नक्कीच असणार.

First Published on: February 20, 2020 2:26 PM
Exit mobile version