मनाचा तळ शोधणारा ‘गोदावरी’

मनाचा तळ शोधणारा ‘गोदावरी’

आजच्या व्हर्च्युअल जगात संवाद कुठे तरी हरवत चालला आहे. लोकांकडे सगळ्या सुखसुविधा असल्या तरी त्यांच्या आयुष्यात समाधान नाही. पूर्वी प्रचंड मोठी कुटुंब असायची. पण तरीही प्रत्येकाच्या आयुष्यात काय सुरू आहे; त्यांना कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागतेय, याविषयी एकमेकांना माहिती असायची. पण आता परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. आज नात्यातला संवाद हरवला आहे. अशाच एका कुटुंबातील तीन पिढ्यांच्या नात्यावर भाष्य करणारा हा चित्रपट आहे. नदी खळाळून वाहत असते. पण तिच्या खोलात काय आहे हे कोणालाच माहीत नसते. त्याचप्रमाणे गोदावरी या चित्रपटातील पात्र आहेत.

गोदावरी ही कथा आहे गोदावरी नदीच्या तीरावर राहणार्‍या एका कुटुंबाची. त्यांचा भला मोठा वाडा असला तरी कुटुंबातील मुलगा निशिकांत (जितेंद्र जोशी) तिथे न राहता एका छोट्याशा घरात एकटाच राहतो. अगदी पाहिल्या दृष्यापासून या कुटुंबात असलेले मतभेद आपल्याला पाहायला मिळतात. निशिकांत आणि त्याचे वडील (संजय मोने) एकमेकांशी एक शब्द देखील बोलत नाहीत तर त्याचे आजोबा (विक्रम गोखले) हे भ्रमिष्ट झाले असून त्यांच्या आजूबाजूला काय सुरू आहे, हे त्यांना कळत नाही.

या सगळ्यात फरफट होतेय, ती या कुटुंबातील स्त्रियांची. निशिकांतने घर सोडले असले तरी, त्याची पत्नी गौतमी (गौरी नलावडे) आपल्या कुटुंबासोबत वाड्यात राहत आहे. त्यांना एक मुलगी देखील आहे. सततच्या भांडणांमुळे गौतमी आणि निशिकांतची आई (नीना कुलकर्णी) यांना काय करायचे हेच कळत नाहीये, तर दुसरीकडे आपले घर असूनही वडील घरात का राहत नाही, हा प्रश्न त्यांची मुलगी सरिताला देखील पडलेला आहे. निशिकांतचे मुलीवर प्रचंड प्रेम असले तरी मुलीला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे देणे तो नेहमीच टाळतोय.

निशिकांत हा प्रचंड चिडखोर असून त्याला गोदावरी नदीच्या पात्रात घडणार्‍या अनेक गोष्टी पटत नसल्याने त्याची चिडचिड होत आहे. गोदावरी नदीच्या काठावर निशिकांत लहानाचा मोठा झाला आहे. पण नदीला लोक अस्वच्छ करत आहेत, त्यात कपडे-गाड्या धूत आहेत, त्यात अस्थी विसर्जन केले आहेत या गोष्टी त्याला आवडत नाहीत. सगळ्या समस्यांना तोंड देत असतानाच त्याच्यासमोर एक मोठे संकट उभे राहिले आहे. निशिकांतला ब्रेन ट्यूमर झाला असून त्याचे काहीच महिन्यात निधन होणार आहे. निशिकांतला त्याच्या शेवटच्या काळात आपली नाती कशाप्रकारे गवसतात, गोदावरीच्या बाबतीत असलेली त्याची मते कशाप्रकारे बदलतात हे या चित्रपटात दिग्दर्शक निखिल महाजन याने खूप चांगल्याप्रकारे दाखवले आहे.

आजकाल पिढ्यांमधला विसंवाद आपल्याला अनेक कुटुंबात पाहायला मिळतो. त्यामुळे चित्रपट पाहताना ही गोष्ट एखाद्या खऱ्याखुऱ्या कुटुंबातील असल्याचे आपल्याला वाटते. चित्रपटातील संवाद खूपच छान आहेत. गोदावरी अस्वच्छ झाली आहे त्यात आंघोळ करू नकोस असे निशिकांतने एका व्यक्तीला सांगितल्यावर आई अस्वच्छ होऊ शकते पण कधी घाणेरडी होते का असे ती व्यक्ती त्याला विचारते, हा संवाद आपल्या मनाला भिडतो. तसेच निशिकांत आणि त्याच्या आजोबांमधील शेवटचा संवाद, निशिकांत आणि त्याच्या वडिलांमधील शेवटच्या दृश्यतील संवाद या गोष्टी मस्त जमून आल्या आहेत. या चित्रपटाच्या अनेक दृश्यात संवाद नाहीयेत. पण चित्रपटाचा बॅकग्राऊंड स्कोर आणि सिनेमॅटोग्राफी यांच्या मदतीने चित्रपटाची कथा पुढे सरकत जाते. त्यामुळे बॅकग्राऊंड स्कोर आणि सिनेमॅटोग्राफीची कितीही स्तुती केली तरी ती कमी आहे.

चित्रपटाची गती काही ठिकाणी खूपच संथ असल्याचे जाणवते. तसेच चित्रपटाच्या कथेत काही उणीवा जाणवतात. मला माझे निर्णय कधीच घेऊन दिले नाहीत, असे निशिकांत बोलताना दिसतो. पण त्याचवेळी निशिकांतचे लग्न होईपर्यंत कुटुंबासोबत राहणारा निशिकांत अचानक घर सोडून का गेला? त्याच्या पत्नीने त्याच्यासोबत नव्हे तर, कुटुंबीयांसाठी राहण्याचे का ठरवले, या प्रश्नाची उत्तरे चित्रपटात मिळत नाहीत. निशिकांतच्या मनात सुरू असलेली चलबिचल दाखविण्यात आली आहे, पण त्यासोबत गौतमीचे या सगळ्यात मत काय, हे संपूर्ण चित्रपटात कळत नाही. तसेच, निशिकांत आजारी असल्याचे त्याच्या एकंदर देहबोलीतून कुठेच जाणवत नाही.

जितेंद्र जोशी, संजय मोने, नीना कुलकर्णी, गौरी नलावडे, प्रियदर्शन जाधव, विक्रम गोखले यांनी आपल्या व्यक्तिरेखांना खूपच चांगल्या प्रकारे न्याय दिला आहे. या सगळ्यांचाच अभिनय खूप चांगला झाला आहे. गोदावरीच्या काठावर लहानाचा मोठा झालेल्या अनाथ मुलाची व्यक्तिरेखा प्रियदर्शनने खूप चांगल्याप्रकारे साकारली आहे. गोदावरी हा चित्रपट पाहताना तुम्ही या कथेत, या व्यक्तिरेखेत नक्कीच गुंतून जाता.

First Published on: November 10, 2022 8:55 AM
Exit mobile version