गुगल डूडलकडून मीना कुमारीचं स्मरण

गुगल डूडलकडून मीना कुमारीचं स्मरण

अभिनेत्री मीना कुमारी

भारतीय चित्रपटाच्या इतिहासात ‘ट्रॅजेडी क्वीन’ नावानं ओळखल्या जाणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्री मीना कुमारी यांचा आज १ ऑगस्टला जन्मदिवस असतो. आपल्या सुंदर चेहरा आणि अभिनयानं प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या या अभिनेत्रीचं स्मरण करत गुगलनं डूडल बनवलं आहे. तीन दशकांपेक्षा जास्त बॉलीवूडवर राज्य करणारी अभिनेत्री मीना कुमारीचे चित्रपट आजची पिढीही तितक्याच उत्साहाने पाहते. ‘साहब, बीवी और गुलाम’ सारख्या चित्रपटातील ‘न जाओ सैय्या छूडाके बय्या’ हे गाणं आजही फक्त मीना कुमारीचा चेहराच समोर आणतं.

‘ट्रॅजेडी क्वीन’ म्हणून ओळख

मीना कुमारीचा जन्म मुंबईत १ ऑगस्ट, १९३२ मध्ये झाला. त्यांचं मूळ नाव होतं महजबीं बानो. मीना कुमारीचे वडील अली बख्स हे पारसी रंगमंचावरील कलाकार होते तर त्यांची आई या थिएटर कलाकार होत्या. मीना कुमारीचं संपूर्ण आयुष्य हे दुःखातच गेलं अशा कथा नेहमीच ऐकायला मिळतात. संपूर्ण आयुष्य दुःखात गेल्यामुळं चित्रपटातही त्यांनी जास्त चित्रपट हे दुःखी कहाणी असलेलेच केले. त्यामुळं त्यांचा अभिनय जीवंत वाटत असे. त्याचमुळं त्यांना ‘ट्रॅजेडी क्वीन’ म्हणून ओळख मिळाली. विजय भट्ट यांच्या ‘लैदरफैस’ या चित्रपटात बेबी महजबीं नावानं मीना कुमारीनं १९३९ मध्ये पदार्पण केलं. तर १९४० मध्ये आलेल्या ‘एक ही भूल’मध्ये विजय भट्ट यांनी त्यांचं नाव बेबी मीना असं केलं. त्यानंतर केवळ १३ व्या वर्षीच १९४६ मध्ये आलेल्या ‘बच्चों का खेल’ चित्रपटात अभिनेत्री म्हणून मीना कुमारी नावानं त्यांचा प्रवास सुरु झाला.

कशी होती मीना कुमारी यांची परिस्थिती?

मीना कुमारीचे कुटूंब दादरच्या रूपतारा स्टुडिओ समोरच रहात असे. लहान असताना तिला चित्रपटात काम मिळावे म्हणून आई रोज तिला तिच्या समोरच्या स्टुडिओत घेऊन् जात असे. मीना कुमारीने बाल कलाकार म्हणून नई रोशनी, कसोटी, बहन, विजय, गरीब, प्रतिज्ञा, लाल हवेली अशा चित्रपटातून कामं केली. तिला बाल कलाकार म्हणून जी पहिली रक्कम मिळाली ती होती फक्त २५ रूपये. १९४६ मध्ये “बच्चों का खेल” या चित्रपटात ती सर्व प्रथम नायिका म्हणून चमकली त्यावेळी ती फक्त १३ वर्षांची होती. १९४७ मध्ये मीना कुमारची आई खूप आजारी पडली आणि वर्षभरात तिचा मृत्यू झाला. जाणत्या मीना कुमारीने अनुभवलेली ही पहिली जखम होती. खरं इतर मुली सारखं शाळेत जावे धमाल करावी असे तिला नेहमी वाटायचं. चित्रपटातील कामे करणे ही तिच्या आवडीची बाब नव्हती. मात्र, आता रोजी रोटीचा हाच एक मार्ग होता. सुरूवातीला तिने हनुमान, पाताल विजय, वीर घटोत्कच, श्री गणेश महिमा अशा पौराणिक चित्रपटात भूमिका केल्या. लहानपणापासूनच दुःखानं कधीही मीना कुमारी यांचा पिछा सोडला नाही. चित्रपटानं त्यांना खूप संपत्ती आणि यश दिलं. मात्र, आपल्या सौंदर्य, अदा आणि उत्कृष्ट अभिनयानं लोकांना वेड लावणाऱ्या मीना कुमारीचं आयुष्य शेवटच्या श्वासापर्यंत दुःखीच राहिलं. आयुष्यभर त्या एकटेपणाशी लढत राहिल्या.

पुरस्कारांच्या बाबतीत केला रेकॉर्ड

१३ जून १९६३ ला मीना कुमारीने फिल्मफेअर पुरस्काराच्या सोहळ्यात एक अनोखा विक्रम मीना कुमारी यांच्या नावे आहे. हा फिल्मफेअरचा १० वा पुरस्कार वितरण सोहळा होता. सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी नॉमिनेशन जाहीर झाले त्या यादीत साहब बीबी और गुलाम, आरती, मै चूप रहूँगी अशा तीन चित्रपटांची नावे जाहीर झाली आणि तिनही चित्रपट मीना कुमारी यांचेच होते. यामध्ये साहब बीबी और गुलामसाठी मीना कुमारी यांना पुरस्कार मिळाला होता.

आयुष्यभर पाहिली प्रेमाची वाट

मीना कुमारी यांनी कमाल अमरोही यांच्याबरोबर प्रेम विवाह केला. मात्र त्यांना नेहमीच त्यांच्या दुसऱ्या पत्नीचा दर्जा मिळाला. तरीही दोघं १० वर्ष एकमेकांबरोबर राहिली. नंतर दोघांमधील दरी वाढत गेली आणि मीना कुमारी १९६४ मध्ये कमालपासून वेगळ्या झाल्या. त्यांच्या वेगळं होण्याचं कारण धर्मेंद्र होता असं मानलं जातं.

First Published on: August 1, 2018 8:14 AM
Exit mobile version