हॅप्पी फिर भाग जाएगी; निखळ विनोदाचा सिक्वल कायम

हॅप्पी फिर भाग जाएगी; निखळ विनोदाचा सिक्वल कायम

हिंदी चित्रपट हॅप्पी फिर भाग जाएगी

दोन वर्षांपूर्वी ऑगस्ट महिन्याच्या १९ तारखेला हॅप्पी भाग जायेगी प्रदर्शित झाला होता. त्याचाच हॅप्पी फिर भाग जायेगी हा सिक्वल उत्तम जमून आलाय. त्याआधी अक्षय कुमार आणि दिपिका पादुकोनचा चाँदनी चौक टू चायना आठवत असेल. चायना म्हटलं की, ओठांच्या दोन्ही कोनांखाली उतरलेली छुपकेदार पांढरी मिशी आणि बारिक डोळ्यांच्या व्यक्तीरेखा. असं समीकरण डोक्यात फिट्ट असतं. मार्शल आर्टची बटबटीत हाणामारी ही चायनापटांची ओळख. चांदनी चौक टू…नं आणखीच गडद केली. या सर्व समजांना हॅप्पी फिर भाग जाएगी फाटा देतो. निखळ, मनोरंजन असलेल्या हॅप्पीचं कथानक घडतं ते अर्धअधिक चीनमध्ये तर त्याची पार्श्वभूमी भारतातल्या पंजाबची आहे.

जिमी शेरगीलने साकारलेला दमनसिंह बग्गा संयमी विनोदाचं उदाहरण आहे. त्याची लग्नाची पूर्ण तयारी झाल्यावर त्याची होणारी वधू लग्नमंडपातून पळून गेल्याची त्याची खंत सिक्वलमध्येही कायम आहे. मै घोडी चढा था…पुरी तय्यारी हो चुकी थी…पण लग्न होऊ शकलं नाही. आता या दुसर्‍या भागात त्याचं लग्न होतं का पुन्हा तीच खंत पुढच्या सिक्वलसाठी कायम राहते? हे पडद्यावर पाहायला हवं. चित्रपटांत कुठंही बाष्कळ विनोद नाही का हाणामारी, गोळीबार नाही.
पडद्यावर हॅप्पी, हरप्रित कौर नावाच्या दोन मुली पहिली डायना पेंटी आणि दुसरी सोनाक्षी सिन्हा. चीनमधला एक डॉन चुकून डायना पेंटी असलेल्या हॅप्पीच्या जागी सोनाक्षीला पकडून आणतो. आता डायनाला त्याच्या ताब्यात देऊन पंजाबातल्या हॅप्पीला सोडवण्याची जबाबदारी खुशवंत सिंग गिल (जस्सी गिल) आणि पियूश मिश्रा यांच्यावर आलेल्या परिस्थितीतून पडते. ही जबाबदारी ते पेलवतात का? हे पडद्यावर पहायला हवं.

जिमी शेरगील आणि जस्सी गिल यांच्यातली सोनाक्षीला पटवण्यासाठीची शर्यत धमाल आणते. चीनमधला माफिया डॉन हिंसक आणि क्रूर असल्याचा अनुभव याआधीच्या चायनापटांनी करून दिल्याने प्रेक्षकांचा धक्कादायक भ्रमनिरास होतो. हॅप्पी…मधला खलनायक डॉन चँग (जॅसोन थॅम) कमालीचा वेंधळा आहे. त्यामुळे हॅप्पीचा पडदा खुसखुशीत विनोदाने भरलेला आहे. वेंधळे नायक आणि त्याहून वेंधळा खलनायक अशी मूर्खपणाची विनोदीजुगलबंदी म्हणजे हा सिनेमा. १५ दिवसांपूर्वी जिमी शेरगिलची आक्रमक भूमिका असलेला साहाब बीवी और गँगस्टरचा चौथा भाग रिलिज झाला. त्यातला आक्रमक आणि खुनशी साहब रंगवणारा जिमी हॅप्पी…मध्ये कमालीचा संयत झाला आहे.

हॅप्पीच्या पहिल्या भागात आपल्या बोहल्यावरून पळून गेलेल्या वधूला शोधण्यासाठी जिमी पाकिस्तानात दर दर की ठोकरे खातो. दुसर्‍या भागात असंच पुन्हा तोंडघशी पडण्याची वेळ त्याच्यावर जागी चीनमध्ये येते. केवळ जागा बदलते त्याचं नशिब नाही. ही खंत असलेली गोष्ट तो मैं घोडी चढा था….असं बोलून जो भेटेल त्याला आत्मियतेने ऐकवत असतो.
मुदस्सर अजिजने सिनेमाचं संतुलन राखलं आहे. त्यामुळे वेग कायम राहतो. प्रसंग एकामागोमाग एक घडत जातात.खेळातील ब्रान्झ, सिल्वर आणि ब्रान्झ मेडलसाठीहीची ही प्रेमातली स्पर्धा असते. पियूश मिश्राने साकारलेला पाकिस्तानी ऑफिसर उस्मान आफ्रिदी लक्षात राहतो. भारत आणि पाकिस्तानच्या मध्यवर्ती असलेला काश्मीर प्रश्न अनेक वर्षांपासून सुटलेला नाही. यातून पियूश आणि इतरांसोबत उडालेले विनोदी खटके हसायला भाग पाडतात. जिमी शेरगिलच्या मोडलेल्या लग्नाची स्वप्नांची विनोदी गंमत आणि जीत सिनेमातल्या यारा ओ यारा…या सनी देओलच्या गाण्यावर त्याने केलेली कडी लक्षात राहते. मात्र कथानक पुढे सरकवताना जोडलेल्या कडीतील प्रसंगात काही ठिकाणी संदर्भांचा गोंधळ उडतो. पण ते तेवढ्यापुरतंच..त्याही पुढे अपारशक्ती खुरानाने जेलमध्ये उडवलेली नृत्याची धमाल हा सुद्धा चित्रपटात टोकाचा विनोदी अनुभव देतो. थोडक्यात हॅप्पी फिर भाग जायेगी..हा निखळ मनोरंजन पट आहे.

First Published on: August 25, 2018 3:30 AM
Exit mobile version