कॉफी विथ करण ६ मध्ये क्रिकेटर्स

कॉफी विथ करण ६ मध्ये क्रिकेटर्स

करण जोहर

कॉफी विथ करणचा सहावा सीझनदेखील सध्या चर्चेत आहे. करणचा हा चॅट शो नेहमीच चर्चेत असतो. या कार्यक्रमामध्ये नेहमीच मनोरंजन क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्ती येतात आणि काही ना काही मसाला या चॅट शो मध्ये प्रेक्षकांनाही मिळत असल्यामुळेच हा शो नेहमीच प्रसिद्ध ठरतो. यावेळी मात्र पहिल्यांदाच कॉफी विथ करणमध्ये भारतीय क्रिकेट टीमधील दोन फॅशनेबल क्रिकेटर्स के. एल. राहुल आणि हार्दीक पांड्या हे दोघेजण येत आहेत. करण, हार्दीक आणि राहुल या तिघांनीही याचे फोटो ट्टविटरवर शेअर केले आहेत. या शो मध्ये सर्वांनाच खूप मजा आल्याचं फोटोवरून दिसत असून अगदी त्याचप्रमाणे कॅप्शनही त्यांनी पोस्ट केल्या आहेत. आतापर्यंत दीपिका आलिया, अक्षय – रणवीर आणि आमिर खानचे भाग टेलिकास्ट झाले असून या तिन्ही भागांना चांगलंच यश मिळालं आहे.

काय म्हणत आहेत क्रिकेटर्स?

यावर्षीच मार्चमध्ये बीसीसीआयने एक व्हिडिओ व्हायरल केला होता. ज्यामध्ये केएल राहुलने हार्दीक आपला सर्वात जवळचा मित्र असल्याचं म्हटलं होतं. हार्दीकबरोबर राहुलचा फ्रेंडशिप बाँड फारच चांगला असल्याचंही त्यानं म्हटलं होतं. जेव्हा कधी बाहेर जाणं होतं तेव्हा हार्दीकला सर्वात जास्त लक्ष वेधून घ्यायचं असतं. सर्वांनी त्यालाच पाहावं असं त्याला वाटत असतं किंवा त्याला त्याचंच सर्वांनी ऐकावं असंही त्याला वाटत असतं. तेव्हा त्याच्या कोणत्याही गोष्टीत आम्हाला काहीही रस नसल्याचं आम्ही त्याला सांगतो असंही राहुल म्हणाला होता. त्यामुळे आता करण जोहरच्या या कार्यक्रमामध्ये हे दोन्ही क्रिकेटर्स नक्की काय आणि कशी धमाल करणार आहेत याची उत्सुकता लोकांना नक्कीच लागली आहे. ट्विटरवर फोटो शेअर करत असताना के. एल. राहुलने ‘Something Brewing’ असं कॅप्शन लिहिलं आहे, तर पांड्यानेही त्याचप्रकारे ‘Brew – Mance’ अशी कॅप्शन देत नेटिझन्सचं लक्ष वेधून घेतलं आहे. या दोघांचीही अगदी हटके फॅशनेबल स्टाईल असल्यामुळे आणि दोघांचेही अनेक चाहते असल्यामुळे आता कॉफी विथ करणमध्ये करणच्या प्रश्नांना नक्की हे दोघं कसे सामोरं जातील हे लवकरच कळेल.

First Published on: November 11, 2018 7:50 PM
Exit mobile version