‘इंडियन आयडॉल 13’ मध्ये हेमा मालिनींची उपस्थिती

‘इंडियन आयडॉल 13’ मध्ये हेमा मालिनींची उपस्थिती

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील इंडियन आयडॉल सत्र 13 मध्ये ‘ड्रीम गर्ल’ विशेष भाग सादर होणार आहे, ज्या भागात खुद्द ड्रीम गर्ल हेमा मालिनी आपली मुलगी ईशा देओल हिच्या समवेत उपस्थित राहणार आहे. परीक्षक विशाल दादलानी, नेहा कक्कड आणि हिमेश रेशमिया यांच्या समक्ष आपले 11 सर्वोत्तम स्पर्धक एकापेक्षा एक सरस परफॉर्मन्स देताना दिसतील. कोलकाताहून आलेली सोनाक्षी कर किनारा (1977) चित्रपटातील ‘नाम गुम जाएगा’ हे गाणे सादर करणार आहे,जे ऐकून सर्व परीक्षक आणि आमंत्रित पाहुणी हेमा मालिनी देखील थक्क झालेली दिसेल.

या परफॉर्मन्सनंतर सोनाक्षीच्या आवाजाचे कौतुक करून हेमा मालिनीने या गाण्याच्या चित्रीकरणाच्या वेळेसच्या आठवणी सांगितल्या. हेमा मालिनी म्हणाली, “सोनाक्षी, लता जींचे गाणे म्हणणे ही काही सोपी गोष्ट नाही. हे गाणे तू ज्या सहजतेने म्हटलेस, त्याबद्दल मी तुझे कौतुक करते. खूप छान.लता जी आपल्या सर्वांसाठी मा सरस्वती आहेत. हे गाणे गुलझार साहब यांनी कथानकास अनुरूप जरी लिहिले असले, तरी ते लताजींसाठीच रचलेले गाणे आहे! मी भाग्यवान आहे की, मला ते गाणे मिळाले आणि त्यावर परफॉर्म करता आले. हे गाणे 1977 मध्ये आलेल्या किनारा चित्रपटातले आहे. या चित्रपटात मी एका नेत्रहीन मुलीची भूमिका केली होती. तुझ्या आवाजात हे गाणे ऐकताना मी आज पुन्हा ते गाणे जगले. आम्ही मध्य प्रदेशात या गाण्याचे चित्रीकरण केले होते आणि आज देखील जीतू जी,धरम जी आणि माझ्यावर चित्रित झालेल्या या चित्रपटाच्या आठवणी आजही माझ्या मनात ताज्या आहेत.”

पुढे आदित्य नारायणने विचारले की हे गाणे जिकडे चित्रित झाले होते, तिथे कोणते झपाटलेले घर होते का? त्यावर हसत हसत हेमा मालिनी म्हणाली,“या गाण्याचे चित्रीकरण मध्य प्रदेशात झाले होते. गुलझार साहब यांनी ती जागा शोधली होती. त्याकाळी, आजच्या सारखी मोठमोठी हॉटेल्स नव्हती. अशाच एखाद्या मोठ्या काळोख्या बंगल्यात आम्ही सर्व एकत्र राहायचो. या बंगल्याच्या जवळ एक तलाव होता. रात्री अनेक चित्रविचित्र आवाज ऐकायला याचे आणि त्यात जीतू जी आणि गुलझार साहब आम्हा सगळ्यांच्या खूप खोड्या काढायचे. मला सकाळी खाता यावेत, म्हणून रात्री 5-6 बदाम भिजवलेले असायचे. मी जेव्हा सकाळी बदाम घ्यायला जायचे,तेव्हा ते आधीच कुणी तरी खाऊन टाकलेले असायचे. आणि मला ते चिडवायचे की, भूत आले होते आणि त्याने बदाम खाल्ले. सेटवर आम्ही अशी खूप मस्ती करायचो.”

ड्रीम गर्लच्या आगमनाने आधीच भारलेल्या वातावरणात इंडियन आयडॉल-13चे 11 स्पर्धक अयोध्येचा ऋषी सिंह, कोलकाताचे बिदीप्ता चक्रवर्ती, अनुष्का पात्रा, देबोस्मिता रॉय, सोनाक्षी कर, सेंजुती दास, जम्मूचा चिराग कोतवाल, लखनौचा विनीत सिंह, अमृतसरचा नवदीप वडाली आणि गुजरातचे शिवम सिंह आणि काव्या लिमये आपल्या सुमधुर गळ्याने सर्वांना मोहित करून हा वीकएंडही म्युझिकाना करून सोडतील.


हेही वाचा : 

कार्तिक आर्यन ते दीपिका पादुकोणपर्यंत ‘हे’ कलाकार ठरले 2022 चे सर्वात मोठे न्यूजमेकर्स

First Published on: December 8, 2022 4:40 PM
Exit mobile version