हिचकॉक, धक्कातंत्र आणि मेजवानी!

हिचकॉक, धक्कातंत्र आणि मेजवानी!

Hitchcock

आल्फ्रेड हिचकॉक…
नुसतं नाव ऐकूनच दचकलात की काय?
शक्य आहे. कारण हिचकॉक म्हटलं की, त्याच्या बहुतेक चित्रपटांतील धक्कातंत्र आठवतं आणि अनेकांना दचकायलाच होतं. कारण प्रेक्षकांना अगदी कशात तरी तो गुंतवून ठेवायचा आणि एकदम धक्का द्यायचा. असा की त्यांना त्यातून सावरायला बराच वेळ लागायचा.

खरं तर त्याचे चित्रपट म्हणजे काही भयपट, अरिष्टपट असे लोकांच्या अंगावर काटा आणणारे नसत. तर ते बहुतेक होते रहस्यपट. पण ते रहस्य अचानक अशा तर्‍हेनं उलगडायचं की, प्रेक्षकांना धक्काच बसायचा. हिचकॉकला त्यात आगळंच समाधान वाटत असणार. कारण असं, त्याला अनुभवानं माहीत झालं होतं की, त्यामुळंच प्रेक्षक तो अनुभव घ्यायला, म्हणजेच तो चित्रपट बघायला पुन्हा पुन्हा येतील. आता कधी ते रहस्य साधं वाटलं तरीही शेवटी भयकारी व्हायचं. म्हणजे बर्डसमध्ये नाही का, पक्षांचे हल्ले त्यानं अशा प्रकारे दाखवले होते की अंगावर काटाच यायचा आणि त्याचा परिणाम असा व्हायचा की, थिएटरमधून बाहेर पडल्यानंतरदेखील काही काळ प्रेक्षक कुठं पक्ष्यांचा मोठा आवाज ऐकू आला की एकदम दचकायचे,घाबरायचे.

अशा चित्रपटांमधून प्रेक्षकांना धक्का देणार्‍या या हिचकॉकला प्रत्यक्ष आयुष्यात देखील लोकांना अचानक धक्का बसेल, असं काहीतरी करायची आवड होती. खरं तर त्याची ती सवयच होती म्हणा ना. त्याला तो एक प्रकारचा खेळच वाटत असे. पण ते सोसायला लागायचं मात्र त्याच्या जिवलगांना, मित्रमैत्रिणींना. बघा नं, एकदा त्याचा जवळचा एक मित्र बाहेरगावी गेलेला असताना हिचकॉकनं काय करावं? त्यानं त्या मित्राच्या घरामध्ये खूप मोठ्या आकाराचं म्हणजे अगदी राक्षसी वाटावं असं फर्निचर गच्च भरून ठेवलं, टेबलं, खुर्च्या, कपाटं, कोच सारं काही जायंट साईज! तो मित्र सहकुटुंब घरी परतला आणि त्यानं घरात पाऊल टाकलं आणि त्याच्या नजरेला जे काही पडलं त्यानं त्या बिचार्‍याची आणि त्याच्या कुटुंबियांचीही काय अवस्था झाली असेल. याची फक्त कल्पनाच करायची. आपण आत कसं जाणार आणि गेलं तरी काय करणार असंच त्यांना वाटत असणार.

अशा खर्चिक गमती जमती करायला हिचकॉकला आवडायचं. म्हणून तर एका मित्राच्या वाढदिवसाला म्हणून त्यानं खास भेट पाठवली. अर्थात हिचकॉकचीच ती भेट. त्यातून खास वाढदिवसासाठी पाठवलेली. ती काय असावी? त्यानं त्या मित्राकडं दोन चार नाही, तर तब्बल चारशे ससे खरपूस भाजून पाठवले होते. त्या मित्राला सारा वाढदिवसाचा काळ या भेटीचं करायचं काय? असाच प्रश्न पडला असणार, खरं ना? कधीतरी कुणाकडून तरी उसने घेतलेले पैसे त्यानं परत केले, हे वेगळं सांगायला नकोच. पण त्यानं ते ज्याप्रकारे परत केले तो प्रकार मात्र आगळा होता. त्यानं ती पूर्ण रक्कम लहानात लहान नाण्यांच्या स्वरुपात परत केली होती. प्रचंड आकाराच्या थैलीत. घ्या मोजून! तर असा हा विक्षिप्त माणूस. महान दिग्दर्शक. प्रेक्षकांना आणि जवळच्या लोकांनाही या वागण्यानं थक्क करायचा, धक्का द्यायचा. पण कुणाला दुःख होईल, असं मात्र कधीच काही करायचा नाही.

 एकदा काय झालं … बहुधा त्यावेळी त्याचं लक्ष निळ्याशार आभाळाकडं गेलं असावं. तसा रंग निळा लख्ख आभाळाचा कुणाला आवडत नाही? त्यालाही निळा रंग आवडायचा. पण त्या दिवशी त्याला तो जास्तच आवडून गेला असणार. आणि त्याच वेळी त्याच्या मनात काही विचार येऊन तो अस्वस्थ झाला. त्याला वाटलं हा निळा रंग एवढ्या प्रचंड छटा असूनही प्रत्येक छटा ही आकर्षक कशी वाटते, प्रत्येक छटेचा मोह वेगवेगळाच असतो. प्रत्येक छटेमुळं मनात उठणारे विचारही वेगळे असतात.प्रत्येकाला तो आवडतोच. तरीही आपण त्याच्यापासून इतके फटकून का राहातो? असा प्रश्नही त्याला पडला. म्हणजे कपडे, घरे, मोटारी वगैरे अनेक गोष्टींसाठी लोक निळा रंग वापरतात पण …

त्याच्या मनात हा विचार आला आणि मग काय विचारता .. मग काय हिचकॉकच तो. त्यानं एका प्रचंड मेजवानीचा बेत केला. सर्व बड्या असामींना, मित्रमैत्रिणींना निमंत्रणं गेली. हिचकॉकची मेजवानी म्हटल्यावर कुणी नकार देण्याचा प्रश्नच नव्हता. कारण त्याची ती आवड अनेकांना ठाऊक होती आणि नुसत्या आमंत्रणानंच त्यांच्या तोंडाला पाणी सुटलं होतं आणि ते कधी एकदा ती वेळ होतेय याची वाट बघत होते. आणि अखेर तो दिवस उजाडला .. ती वेळ जवळ आली. पाहुण्यांची पावलं हिचकॉकच्या मेजवानीच्या ठिकाणकडं आपसूकच कळली.

हिचकॉकनं तर अगदी मनापासून तयारी केली होती. नेहमीप्रमाणंच मेजवानीमध्ये अनेक पदार्थांची रेलचेल होती. ते आकर्षक पद्धतीनं सजवून, छानपैकी सजावट केलेल्या टेबलांवर मांडले जात होते. सुरुवातीचे पाहुणे त्या मोठ्या हॉलमध्ये शिरले. त्यांची या सार्‍याकडं नजर गेली आणि ते चमकले. थक्क झाले. जागीच खिळून राहिले. त्यांना ते सारं पाहून धक्काच बसला होता. कारण ते सारे पदार्थ निळ्या रंगाच्या वेगवेगळ्या छटांमध्ये होते. काही गडद काही फिके. पण सर्वच्या सर्व. निळेच. अपवाद म्हणूनही तेथे दुसरा रंग दिसत नव्हता.

सुरुवातीचं सूप काय आणि नंतरचे एकामागून एक येणारे वेगवेगळे पदार्थ काय.. प्रत्येक पदार्थ निळ्या रंगाचाच होता. निळे ट्राऊट मासे, निळं चिकन इतकंच काय, अगदी आइसक्रीमदेखील गडद निळ्या रंगांचं होतं! त्याकेळी हिचकॉक म्हणाला होता, ते मेजवानीचं दृश्य इतकं सुंदर दिसत होतं म्हणून सांगू!आणि त्यानंतर बोलताना त्यानं या सार्‍यामागचं रहस्यही सांगून टाकलं. तो म्हणालाः मला खरोखरच प्रश्न पडला होता की, आपण इतके वेगवेगळ्या रंगाचे पदार्थ खातो. पण त्यात निळ्या रंगाचं मात्र काहीच का नसतं? अगदी एकही पदार्थ निळ्या रंगाचा का असू नये? म्हणून मग मी निळ्या रंगाला न्याय द्यायचं ठरवलं आणि ही निळी मेजवानी आयोजित केली.

मात्र त्याच्या मेजवानीला आलेल्या पाहुण्यांचं याबाबत काय मत होतं, ते मात्र सांगितलं गेलेलं नाही. हिचकॉकला त्याची आवश्यकताच भासली नसेल. कारण त्याचं काम केव्हाच झालं होतं.जरा विचार करा. तुम्ही कुठं जेवायला गेला आहात आणि ताटात सारे असे अनोख्या रंगाचे पदार्थ आहेत …

 


आ. श्री. केतकर

First Published on: October 16, 2018 12:32 AM
Exit mobile version